मी महादेव कोळीच ; माजी मंत्री मधुकर पिचड यांचे जात प्रमाणपत्र वैध

0
नाशिक : मी महादेव कोळी समाजाचा असून खरा आदिवासी आहे. आज आदिवासी जातपडताळणी समितीच्या संचालकांनी वैधता प्रमाणपत्र देवून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे माझा नाही तर संबंध आदिवासी बांधवांचा हा विजय असल्याची भावना माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केली. नाशिक येथील आदिवासी आयुक्तालयात जात वैधता प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मधुकर पिचड हे आदिवासी असण्याबाबत   सटाण्याचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी  शंका उपस्थित केली होती. त्यावर औरंगाबाद खंडपीठाने निकाल देत मधुकर पिचड हे महादेव कोळी असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले होते. तेथेही मधुकर पिचड यांची जात महादेव कोळीच असल्याचा निकाल न्यायालयाने दिला होता.
याशिवाय आदिवासी जातपडताळणी समितीने गुरूवारी त्यांना महादेव  कोळी (29) असल्याचे जातवैधता प्रमाणपत्र दिले. त्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर महादेव कोळी आदिवासी संघटनांकडून आयुक्तालयासमोर जल्लोष करण्यात आला. यावेळी पिचड म्हणाले की, बरे झाले माझया जातीबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या. त्यामुळे मी सन 1909, 1912, 1913 चे पुरावे मिळवले. हे सर्व पुरावे जातपडताळणी समितीसमोर सादर केले. त्यासाठी मला संघर्ष करावा लागला. परंतु समितीने माझी जात वैध ठरवत तसे प्रमाणपत्रही मला दिले आहे.
त्यामुळे हा माझा नाही तर संपुर्ण आदिवासींचा विजय आहे. माझे वैधता प्रमाणपत्र सबंध आदिवासी समाजासाठी एक इतिहास ठरणार आहे. भविष्यात खरया आदिवासी बांधवांची  अडवणुक कुणी केली तर त्यांना माझया जातवैधता प्रमाणपत्राचा दाखला मिळवता येईल. धनगर आरक्षणावर बोलतांना ते म्हणाले की 21 मार्चला मुंबईत राज्यसरकारने एक बैठक आयोजित केलेली आहे. त्यासाठी मला बोलावण्यात आलेले आहे. तेथे राज्य सरकारने नियुक्त केलेल्या टाटा सामाजिक  संस्थेचा विरोध करणार आहे. आमची जात ठरवणारी टाटा ही संस्था कोण.
जात ठरविण्याचे काम आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड येथील समित्यांना दिले असते तर ते योग्य होते. परंतु टाटा समाजिक संस्थेला हे अधिकार दिले कुणी. त्यांचा प्रखर विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणासाठी जी तत्वे लागू केलीत केवळ तीच तत्वे आम्हांला मान्य आहेत. त्यासाठी टाटा सामाजिक संस्थेची आम्हांला गरज नसल्याचेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
दरम्यान मधुकर पिचड यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळाल्यामुळे विविध आदिवासी संघटनांकडून त्यांचा सत्कार करण्याति आला. यावेळी सर्वच आदिवासी समाजाचे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याची विनंतीही  यावेळी काही समाजबांधवांनी केली. याप्रसंगी पांडुरंग गांगड, गिरीदास पाटील, बगाडे, झोले, लकी जाधव आदी उपस्थित होते.
आता राजकारणातून निवृत्ती : माझे वय आज 76 वर्षे असून मला समाजाने 7 वेळा विधानसभेत पाठविले. मंत्रीपदही दिले त्यामुळे आता भविष्यात कोणतीही निवडणुक लढविणार नसल्याचे पिचड यांनी स्पष्ट केले. परंतु समाजाच्या सेवेसाठी, आदिवासींच्या प्रश्नांसाठी कायम लढा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. केवळ महादेव कोळी नव्हे तर सबंध आदिवासी समाजाच्या प्रश्नांचा कायम पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*