‘मी भरून पावले!’

0
‘मी भरून पावले’ हे नुकत्याच दिवंगत झालेल्या महान सामाजिक कार्यकर्त्या आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या अध्यक्षा मेहरुन्निसा दलवाई यांच्या आत्मचत्रिाचे शिर्षक आहे. शब्द साधे आहेत, पण जीवनाची सार्थकता व्यक्त करतात. मेहरुन्निसा अखेरच्या श्‍वासापर्यंत सामाजिक कामात व्यस्त होत्या.

देहदानाचा निर्णय घेऊन त्यांनी मरणोत्तरसुद्धा कार्याचा वसा कायम ठेवला. ज्येष्ठ समाजसुधारक व मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या त्या पत्नी! पण त्यांची ओळख फक्त तेवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती. समाजाच्या भल्यासाठी वैचारिकदृष्ट्या सुधारणेची चळवळ चालवणार्‍यांना नेहमीच संघर्षाला, दहशतीला व समाजाकडून घेतल्या जाणार्‍या सत्वपरीक्षेला सामोरे जावे लागते.

हमीदभाई यांनी मुस्लीम समाजातील अन्याय्य रुढी-परंपरांविरुद्ध आजन्म लढा पुकारला होता. त्या जीवनप्रवासात त्यांना अनेक विपरित प्रसंगांना सामोरे जावे लागले. कधी-कधी जीवघेण्या हल्ल्यांनाही तोंड द्यावे लागले. सामाजिक सुधारणांच्या या प्रवासात मेहरुन्निसा आपल्या पतीच्या मागे सावलीसारख्या उभ्या राहिल्याच, पण त्यांच्या पश्‍चातसुद्धा त्या विचारांचा वसा प्राणपणाने जपला.

हे दाम्पत्य रुढार्थाने सहजीवन जगलेच नाही. फक्त इस्लामवर संशोधन करणारी एक संस्था स्थापन व्हावी, अशी अखेरची इच्छा हमीदभाई यांनी व्यक्त केली होती. त्या इच्छेप्रमाणे मेहरुन्निसा यांनी राहत्या घरात ‘हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च संस्था’ स्थापन केली होती.

दलवाईंचे सारे साहित्य जपून ठेवले होते. दलवाई यांच्या पश्‍चात त्यांचा विचारांचा वारसा मेहरुन्निसाजींनी हिरिरीने अजीवन चालवला. त्यांचा स्वभाव करारी होता. वय वाढत गेले. वृद्धावस्था जाणवू लागली तरी त्या अखेरपर्यंत आत्मनिर्भर होत्या. ‘तीन तलाक’चा विषय आज चर्चेत आहे. तथापि मेहरुन्निसाजींनी १९६६ सालीच ‘तीन तलाक’च्या अनुचित सामाजिक प्रथेविरुद्ध मोर्चा काढला होता.

सामाजिक सुधारणांसाठी दीर्घकाळ लढा सुरू ठेवणे ही एक तपश्‍चर्या असते. त्यासाठी कार्यकर्त्यांना सर्वस्वाचा होमही करावा लागतो. दलवाई दाम्पत्याने त्याबाबतचा आदर्श उभा केला आहे. ‘मी भरून पावले’ ही भावना व्यक्त करण्यामागे त्यांचा आत्मविश्‍वास व पत्करलेल्या आजीवन समाजकार्यावरील निष्ठेची कल्पना येते.

इतकेच नव्हे तर समाजसुधारणेचे काम सतत पुढे नेण्यासाठी जास्तीत जास्त आयुष्य मिळाले तरी हवेच आहे, अशी दुर्दम्य आकांक्षा त्या व्यक्त करीत. त्यांच्या निर्धाराप्रमाणे सर्व आयुष्य त्यांना स्वीकारलेल्या समाजसेवेसाठी कारणी लावता आले हे भाग्य क्वचितच कुणाला मिळते. त्यांच्या स्मृतीला आदरपूर्वक श्रद्धांजली!

LEAVE A REPLY

*