मिश्किल शेरे-ताशेरे!

0

विविध पक्षांची नेतेमंडळी एकमेकांना ‘विरोधक’ नव्हे तर ‘शत्रू’ म्हणूनच पाहतात. समोरासमोर येताच ‘खाऊ की गिळू?’ असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर असतात. खिलाडूपणाची भावना अभावानेच आढळते. एखाद्या वेळी दोन विरोधक एकमेकांवर स्तुतीसुमने उधळतात तेव्हा मात्र सर्वांच्या चेहर्‍यांवर प्रश्‍नार्थी भाव उमटतात. परवा पुण्यातील एका कार्यक्रमात दोन राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांमधील मिश्किल शेरे-ताशेरे पुणेकरांनी अनुभवले.

आपण परस्परांचे विरोधक, स्पर्धक अथवा ‘वैरी’ नसून आपल्यातही खिलाडूवृत्ती आणि विनोद लिलया झेलण्याची कला असल्याचे दोन कॉंग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी सप्रमाण दाखवून दिले. निमित्त होते माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित सत्कार समारंभाचे! राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

‘माजी राष्ट्रपती मुखर्जी उपस्थित नसले तरी भावी राष्ट्रपती शरद पवार हजर आहेत. भावी राष्ट्रपतींच्या हस्ते माजी राष्ट्रपतींचा गौरव होणार आहे’ अशी मार्मिक टिपण्णी शिंदे यांनी केली. त्याला पुणेकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. पवारांनी मात्र तात्काळ हाताने नकारार्थी इशारा केला. शिंदेंनी तोच धागा पकडून ‘पवारांचा ‘नाही’ असा इशारा होकारार्थी असतो. त्यांच्या बोटाला धरूनच मी राजकारणात आलो असल्याने मला ते ठाऊक आहे’ असे सांगताच सभागृहात हास्यफवारे उडाले.

शिंदे यांच्या मिश्किल चिमट्यांना पवार यांनी तसेच ‘जाणते’ प्रत्युत्तर दिले. ‘राष्ट्रपतिपदाचा मार्ग माझ्यासाठी नाही. मला नेहमीच लोकांमध्ये राहायला आवडते. राष्ट्रपती अथवा राज्यपाल झाल्यावर नेता सार्वजनिक जीवनातून निवृत्त होतो. त्याला केवळ सुशीलकुमार हेच अपवाद आहेत. कारण राज्यपाल म्हणून काम केल्यानंतरसुद्धा त्यांनी देशाचे गृहमंत्रिपद भूषवले. ती उडी मारणे मला जमणार नाही’ अशा शब्दांत पवार यांनी शिंदे यांच्या शब्दांची तेवढ्याच हलक्या-फुलक्या शब्दांत परतफेड केली. राजकीय जीवनातून एवढ्यात तरी निवृत्त होण्याची आपली इच्छा नसल्याचे पवारांनी सहजपणे जाहीर केले. दोन कॉंग्रेसच्या नेत्यांमधील कसदार शाब्दिक आतषबाजीने पुणेकरांचे पुरेपूर मनोरंजन झाले. अशा काही प्रसंगांमधून राजकीय नेतेमंडळींच्या विनोदी अंगाचे दर्शन घडते. पुणेकरांना तो जिवंतपणा अनुभवता आला. तरीही शेवटी पुणेकर ते पुणेकर! ते आता या सगळ्याचा काय व कसा अर्थ घेतात ते त्यांनाच ठाऊक!

LEAVE A REPLY

*