मिनी मंत्रालयासाठी जळगावला रस्सीखेच सुरुच : भाजपासह राष्ट्रवादी, शिवसेनाही रिंगणात

0

जळगाव | प्रतिनिधी :  जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड उद्या दि.२१ रोजी होणार आहे. भाजपासह राष्ट्रवादी,शिवसेना अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरणार असल्याने अध्यक्ष निवडीची चुरस चांगलीची वाढली आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला ३३ जागा मिळाल्या असून सत्ता स्थापनेसाठी भाजपाला केवळ एका जागेची आवश्यकता आहे. भाजपाकडून पडद्याआड राजकीय डावपेच सुरु आहे. भाजपाने राष्ट्रवादीचे तीन तर कॉंग्रेसचे दोन सदस्य संपर्कात असल्याचे कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सांगितले.

दरम्यान जिल्हा परिषदेत भाजपाचाच अध्यक्ष होणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन यांनी दिली. दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी, शिवसेनाही अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरली आहे.

राष्ट्रवादीने व्हिप काढून अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला असून त्याअनुषंगाने राष्ट्रवादी व शिवसेनेच्या प्रमुखांची चर्चा देखील झाली आहे.

जिल्हा परिषदेत अध्यक्ष व सत्ता स्थापनेसाठी भापजासह राष्ट्रवादी, शिवसेना रिंगणात उतरणार असल्याने तिन्ही पक्षांच्या प्रमुखाकडून अध्यक्षपदावर दावा केला जात आहे. त्यामुळे जि.प. अध्यक्षपदाच्या निवडीकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात पिठासिन अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदासाठी सकाळी ११ ते १ नामनिर्देशन दाखल करणे, त्यानंतर दुपारी १ ते ३ छाननी व माघार व दुपारी ३ नंतर अध्यक्ष पदाची निवड होणार आहे.

जळगाव जि.प.तील असे आहे बलाबल

भाजपा – ३३

राष्ट्रवादी – १६

शिवसेना – १४

कॉंग्रेस – ४

LEAVE A REPLY

*