Type to search

ब्लॉग

मितभाषी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले

Share

पक्षकार्यानिमित्त अरुणजींशी चांगला परिचय होत गेला. त्यांच्याबरोबर प्रवास करण्याचे अनेक प्रसंग आले. बैठकांच्या निमित्ताने त्यांच्या कामाची पद्धत परिचित होत गेली. त्याकाळी मर्यादित लोकांची कमिटी असे. त्यामुळे एकमेकांशी वैयक्तिक मित्रत्वाचे, स्नेहाचे संबंध निर्माण होत असत. अशाचप्रकारे अरुणजींशी माझे स्नेहपूर्ण नाते निर्माण झाले. त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यातले ‘राजकीय मार्गदर्शक’ हे स्थान रिक्त झाले आहे.

बरोबर एक वर्षापूर्वी अटलबिहारी वाजपेयी, त्यानंतर मनोहर पर्रिकर, त्यानंतर सुषमाजी आणि आता अरुण जेटली… खरे सांगायचे तर काय बोलावे हेच समजत नाही. भारतीय जनता पक्षातले हे रथीमहारथी कोणाचे तरी बोलावणे आल्याप्रमाणे एकापाठोपाठ एक इतक्या तडक निघून गेले आहेत की, कोणाचीही मती गुंग व्हावी. १९९१ पासून जवळचा संपर्क असणार्‍या सुषमाजींच्या श्रद्धांजली सभेसाठी दिल्लीमध्ये उपस्थित होते त्याच दिवशी अरुणजींना एम्समध्ये दाखल केले. सहाजिकच शोकसभा झाल्यानंतर मी एम्समध्ये त्यांना भेटायला गेले आणि जवळपास तीन तास रुग्णालयात थांबले. त्यावेळी पंतप्रधानांसह सगळेच रुग्णालयात होते. पण तेवढ्यात अरुणजींच्या पत्नी आम्हाला भेटल्या आणि अरुणजी उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची सुवार्ता दिली. त्यानंतर सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला आणि आम्ही स्वस्थानी परतलो. मात्र त्यानंतर आठच दिवसांत अरुणजी निर्वतल्याची बातमी कानी येणे, ही कोणत्याही मोठा आघातापेक्षा कमी क्लेष देणारी बातमी नाही. ही वार्ता ऐकून गतस्मृती दाटून आल्या आहेत.

मी भाजपची राष्ट्रीय सचिव झाले तेव्हा ९, अशोका रोड येथील अरुणजींच्या ऑङ्गिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती. मला पाहिल्याबरोबर त्यांनी मनापासून स्वागत केले होते आणि आता राष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी सज्ज व्हा, असे म्हणत विश्‍वासही दर्शवला होता. चांगल्या वक्त्या, अभ्यासक असल्यामुळे तुम्ही चांगले काम कराल, असे म्हणत त्यांनी मला प्रोत्साहन दिलेच, त्याचबरोबर काहीही मदत हवी असल्यास विनासंकोच संपर्क साधण्याविषयीही सूचित केले. त्यावेळी त्यांनी दाखवलेला विश्‍वास वेळोवेळी माझ्या कामी आला.

पुढे पक्षाच्या कामानिमित्त अरुणजींशी चांगला परिचय होत गेला. त्यांच्याबरोबर प्रवास करण्याचे अनेक प्रसंग आले. बैठकांच्या निमित्ताने त्यांच्या कामाची पद्धत परिचित होत गेली. त्याकाळी कुठलीही कमिटी मर्यादित लोकांची असे. त्यामुळे एकमेकांशी वैयक्तिक मित्रत्वाचे, स्नेहाचे संबंध निर्माण होत असत. नरेंद्र मोदीजी, त्यांचे खरे नामक एक स्नेही, अरुणजी, प्रकाश जावडेकर, मी असा ग्रुप ११, अशोकाच्या डायनिंग रुममध्ये सगळ्यात शेवटी जेवायला असायचा. त्यावेळी मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. गोड पदार्थांवर ताव मारत आणि मोजके पण समर्पक बोलत अरुणजी त्यात सहभागी व्हायचे.

अरुणजींनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतरही मी बरेचदा त्यांना भेटले. एक अभ्यासू मंत्री असेच मी त्यांचे थोडक्यात वर्णन होऊ शकते. त्यांचे नेतृत्व दूरदृष्टी असणारे होते. न घाबरता, कोणाचीही पर्वा न करता ते समोरच्या माणसाला काय चुकीआणि काय बरोबर, हे सांगू शकत असत. सरकार स्थापनेच्या आधी मोदीची, बापू आपटे नामक एक पूर्णवेळ कार्यकर्ते आणि अरुण जेटलीजी हे तीन सख्खे मित्र बरेचदा एकत्र असायचे. त्यांच्या एकत्र असण्यावरून चिडवले असता अरुणजी ङ्गक्त गालातल्या गालात हसायचे तर बापू, का आमच्या मैत्रीवर जळताय? असे म्हणायचे. इतके सलोख्याचे आणि मित्रत्वाचे संबंध असणारे असे कोणी अचानक निरोप घेऊन गेले तेव्हा खरोखरच मन विदीर्ण होऊन जाते. सुषमाजींच्या रुपाने मी एक जवळची मैत्रीण गमावली आणि अरुणजींच्या रुपाने एक राजकीय मार्गदर्शक गमावला. ही पोकळी कोणीही भरून काढू शकणार नाही.

अर्थमंत्री म्हणून अरुणजींची कारकीर्द देशवासियांच्या कायमच लक्षात राहील. त्यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळातील जीएसटी, नोटबंदी यासारखे निर्णय अत्यंत निर्णायक ठरले. इतके महत्त्वाचे निर्णय घेतले जातात तेव्हा काही ना काही दुष्परिणाम समोर येतील, हे गृहीत धरावेच लागते. त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागते. हे लक्षात घेऊन पूर्वतयारीनिशी त्यांनी देशाच्या विकासाच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक असे दोन बदल स्वीकारले.

पंतप्रधानांनी हा निर्णय जनतेपर्यंत पोहोचवला आणि त्यानंतर अरुणजींनीही माध्यमांच्या सर्व प्रश्‍नांना चोख आणि रोखठोक उत्तरे दिली. त्याचबरोबर भाजपच्या सर्व प्रवक्त्यांना दिल्लीला बोलावून घेत प्रवक्ता म्हणून माध्यमांशी याविषयी कसे बोलायला हवे, याविषयी आम्हाला गाईडलाईन्स दिल्या. इतकेच नव्हे तर प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी प्रवक्त्यांनी देशातल्या अर्थस्थितीचा अभ्यास करावा, असा त्यांचा सल्ला असे.

दोन-तीन दिवस अभ्यास करून, बजेट नीट ऐकून, त्यातील महत्त्वाचे मुद्दे टिपून घेऊन प्रतिक्रिया कशा द्यायच्या, हे जेटलींजी मला वेळोवेळी सांगितले आहे. अरुणजी निष्णात वकील होते. त्यामुळे एखाद्या मुद्दा विषद करताना वकिली शिक्षणातले कौशल्यही त्यांच्या कामी येत असे. मेक इन इंडिया, कौशल्य योजना, मुद्रा योजना अशा सरकारने राबवलेल्या अनेक योजनांविषयी अरुणजी आमच्याशी सविस्तर बोलायचे.

प्रवक्ते म्हणून योजनांचा संदर्भ देताना हे मुद्दे अवश्य मांडा, कोणी याविषयी प्रश्‍न विचारला असता असे उत्तर द्या इतक्या बारकाईने त्यांनी मला मार्गदर्शन केले आहे. सध्याच्या युगात इतक्या चोख पद्धतीने काम करणारा नेता खात्रीने पहायला मिळणार नाही. माझ्यासारख्या राष्ट्रीय महिला मोर्चाची अध्यक्ष असणार्‍या महिलेच्या अंगचे गुण ओळखून त्याचे वर्धन होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करणारा स्नेही आता कायमचा निघून गेला आहे. केवळ मीच नव्हे तर त्यांनी अनेकांच्या गुणांची पारख करून उत्थापन देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच मी त्यांना रत्नपारखी म्हणते.

एकदा महिला मोर्चाच्या पदाधिकार्‍यांच्या एका बैठकीमध्ये मी सगळ्या सदस्यांना सांगितले होते की, तुमचे पुरुष मित्र वा पती कोणीही आल्यास त्यांना केबीनमध्ये भेटण्यास मज्जाव आहे. सबब त्यांना भेटण्यासाठी सदस्याने उठून बाहेर जावे. पण अन्य महिला सदस्यांच्या कामात व्यत्यय येऊ नये, या हेतूने घेतलेल्या या निर्णयाचा माध्यमांनी गहजब केला आणि त्याविरुद्ध तक्रारी नोंदवल्या. मुख्य म्हणजे आक्रमक होत माझ्यावर जोरदार हल्लाबोल केला. पण त्यावेळी अरुणजी मदतीला धावून आले. ते मीडियाला सामोरे गेले आणि कांताताईंनी बरोबर केले, असे ठामपणे सांगितले. महिलांनी शिस्तबद्ध कार्यपद्धती जोपासण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे, असे सांगत तेव्हा त्यांनी माझ्या या निर्णयाची खंबीरपणे पाठराखण केली. मीडियाला सुनावले. ही घटना मी कधीच विसरू शकणार नाही.

अरुणजी सतत कामात बुडालेले असत; पण निवांत असताना मात्र अरुणजींच्या भोवती नेहमी मित्रमंडळींचा गोतावळा असे. पत्रकार रजत शर्मा हे त्यांच्या मित्रवर्यांपैकी एक. त्यांची अगदी घट्ट मैत्री होती. गप्पा मारणे, वादविवाद याबरोबरच चित्रपट पाहणे हे या जोडगोळीचे आवडते छंद होते. एकदा जेटलीजी, सुषमाजी, अडवाणीजी, व्यंकय्या नायडू यांच्यासह आम्ही काही जणांनी ‘लगान’ एकत्र पाहिला होता. चित्रपटप्रेमी अडवाणीजींनी हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यानुसार अरुणजींनी सगळी व्यवस्था केली होती. त्यानंतर या विषयावर आमच्या बर्‍याच गप्पा रंगल्या. तेव्हा त्यांनी माझ्याशी संवाद साधला होता. पूर्वाश्रमी मी कबड्डीपटू होते, तसेच ग्रामीण भागातून आले होते हे ते जाणून होते. त्यावरून ते ‘तुम्ही आत्मचरित्र लिहायला हवे’ असेही म्हणाले होते. असा प्रेमळ आणि हट्टाने आग्रह धरणारा माणूस आपण गमावला आहे. अरुणजींची निर्णयक्षमता अङ्गाट होती. विशेषत: देशातल्या महिलांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणकोणत्या योजना अंमलात आणल्या पाहिजे, महिलांना त्या योजनांचा ङ्गायदा कसा मिळाला पाहिजे, यावर ते सखोल विचार करत असत. अटल कौशल्य योजना असो वा बचत गटांना आर्थिक मदत देण्याविषयीचा मुद्दा असो, ते तितक्यास अभ्यासूपणे वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करायचे.

वृद्धांसाठी लाभकारक असणार्‍या योजना राबवण्याकडेही त्यांचा कटाक्ष असायचा. मुख्य म्हणजे ग्रामीण भागातून आलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांकडून ते ग्रामीण भागांमधल्या समस्यांबद्दल जाणून घ्यायचे आणि त्या सोडवण्यासाठी कोणते निर्णय घ्यायला हवे, याविषयीदेखील चर्चा करायचे. अशाप्रकारे सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेत असल्यामुळे त्यामध्ये सर्वसमावेशकता येत असे. स्वत:ला मोठे न मानता लहानांकडून जाणून घेण्यासही मोठे मन असावे लागते जे अरुणजींकडे होते. म्हणूनच ते वयाने माझ्यापेक्षा लहान असले तरी मानाने खूप मोठे होते. जेटलीजी मितभाषी होते. चेहर्‍यावर हलके स्मितहास्य ही त्यांची ओळख होती. ते कोणीशी तावातावाने बोलत नसत. मात्र, बोलतील ते अत्यंत अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद असे. ङ्गाजिल बोलणे, टवाळी, विनोद यांना त्यांच्या बोलण्यात अजिबात स्थान नसे. या गुणवैशिष्ट्यांमुळेच संसदेतही त्यांच्या बोलण्याचा प्रभाव दिसत असे. असे हे सौम्य आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपल्याचे दु:ख खूप मोठे आहे.
– डॉ. कांता नलावडे
(लेखिका महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता म्हणून कार्यरत आहेत.)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!