माहिती अधिकारातील गोपनियतेचा भंग;चांदवड नगरपरिषदेतील प्रकार

0
चांदवड | माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीबाबत अर्जदाराची दिशाभूल करणारा प्रकार ताजा असतांनाच चांदवड नगरपरिषद प्रशासनाकडून अजून एक प्रकरण समोर आले असून यात अर्जदाराचे नाव उघड करीत गोपनियतेचा भंग केला असल्याचा आरोप अर्जदार उदय वायकोळे यांनी केला आहे.
सविस्तर प्रकरण असे की, येथील उदय वायकोळे यांनी नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता शेषराव चौधरी यांच्या कार्यकाळात चांदवड शहरातील प्लॉट नोंदी, बांधकाम परवानगी, बांधकाम पूर्णत्वाचे दाखले याबाबत माहिती अधिकारात माहिती मागविली होती.
याला लेखी उत्तर देतांना नगरपरिषदेच्या वतीने सरसकट माहिती देणे अडचणीचे असून उपलब्ध संचिका निरीक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या जातील, त्यातून तुम्ही निवडलेल्या संचिका विहीत शुल्क आकारणी नंतर उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगण्यात आले.
एकिकडे असे उत्तर दिले असतांना दूसरीकडे मात्र, न. प. हद्दीतील काही लोकांना नोटीसा काढत तुमची प्लॉट नोंद, बांधकाम परवानगी, पूर्णत्वाचा दाखला याबाबत वायकोळे यांनी माहिती अधिकारात माहिती मागविली असल्याचे सांगत एकप्रकारे अर्जदाराच्या गोपनियतेचा भंग केला आहे.
या अगोदर देखील न. प. प्रशासनाकडून अर्जदार वायकोळे यांची दिशाभूल करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा नव्याने अर्जदार वायकोळे यांनी कुण्या एका व्यक्तीची माहिती मागितली अथवा तसा उल्लेख केला नसतांना न. प. प्रशासनाने मात्र काही लोकांना नोटीसा काढत मािंहती अधिकारातील अर्जदाराचा संदर्भ दिल्याने माझी सुरक्षितता धोक्यात आल्याचा आरोप वायकोळे यांनी करत चांदवड नगरपरिषदेचे संबंधित जनमाहिती अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मुख्याधिकारी राहूल मर्ढेकर यांच्याकडे केली आहे.

 

 

याबाबत चांदवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहूल मर्ढेकर यांच्याकडून माहिती घेतली असता जनमाहिती अधिकार्‍याकडून देण्यात आलेल्या नोटीसांबाबत पूर्वकल्पना नसल्याचे सांगत सदर प्रकार योग्य की अयोग्य याबाबत मला काही माहित नसून वरिष्ठांशी बोलणी करून पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल. असे सांगितले. मात्र, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी असलेल्या अधिकार्‍याने सदर प्रकाराबाबत मला माहिती नसल्याचे सांगणे कितपत व्यवहार्य आहे हा देखील प्रश्‍न येथे उपस्थित होतो.

LEAVE A REPLY

*