मावळा निघाला कावळा

0

मटक्यात पार्टनर, व्यावसायास विरोध करणार्‍या पोलिसांविरुध्द अर्जफाट्याचे तंत्र ,निलेश म्हसे, जीतेंद्र पाटोळेसह पंटर अटकेत

अहमदनगर (प्रतिनिधी)- मावळा संघटनेचा अध्यक्ष निलेश म्हसे हा जीतेंद्र गायकवाड याच्यासोबत मटका व्यावसायात भागीदार असल्याची माहिती पोलिसांच्या छाप्यातून समोर आली आहे. एमआयडीसी ते केडगाव असा विस्तार असलेल्या या मटका व्यावसायाच्या आड येणार्‍या पोलिसांविरुध्द वरिष्ठांकडे तसेच कोर्टात अर्जफाटे करून दबाव टाकण्याच्या त्याच्या षडयंत्राचाही छाप्यात पर्दाफाश झाला. एसपी रंजनकुमार शर्मा, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतूक होत आहे. ‘ मावळा मटक्यात पार्टनर’ या नगर टाइम्स’च्या वृत्तानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

निलेश म्हसे, जितेंद्र पाटोळे या बुकींसह आजमुद्दीन गुलाब सय्यद, महेंद्र शिवराम कदम, भाऊसाहेब वरुटे, कयूम सय्यद या चार पंटरांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एमआयडीसी परिसरातील चेतना कॉलनी व इतर अशा चार ठिकाणी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ही छापेमारी केली.
एमआयडीसीतील चेतना कॉलनीतील पाटोळे याच्या घरातच मटक्याचे कार्यालय थाटण्यात आले होते. एमआयडीसी ते केडगाव विस्तार झालेल्या मटक्यातून मिळणार सगळा पैसा हा याच मुख्य कार्यालयात संध्याकाळी जमा केला जात होता. महिनाभरात पाच लाख रुपये उत्पन्न या धंद्यातून पाटोळे, म्हसे यांना मिळत असे. त्यातील अडीच-अडीच लाख रूपये दोघांत वाटून घेतले जात होते. पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी म्हसे हा दिवसभरातील बहुतांश वेळ एसपी कार्यालयात घालवत असे.
पोलिसांना हप्ता देण्याच्या नावाखाली म्हसे हा पार्टनर असलेल्या पाटोळेकडून 1 लाख 80 हजार दरमाह घेत असे. मात्र हे पैसे पोलिसांना न देता तो स्वत:च्या खिशात टाकत. पोलिसांना मी मॅनेज करतो. तू हप्ता देण्याची गरज नाही. कोणी छापा टाकण्यास आले तर मी बघून घेतो असे त्याने पाटोळे यांना सांगितले होते. पोलिसांच्या नावाखाली त्याने पार्टनर असलेल्या पाटोळे यालाही थड मारला. पोलिसांना हप्ता न देता तो त्यांच्यावर वरिष्ठांकडे अर्जफाटे करून दबाव टाकत असल्याने ‘मावळा’ असलेला म्हसे एक प्रकारे कावळाच असल्यावर कालच्या छाप्यात शिक्कामोर्तब झाले.
एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी पाटोळे याच्या मोबाईलमधील रेकॉर्डींग काढून म्हसे याच्या कारनाम्याचा पर्दाफाश केला आहे. चव्हाण हे पोलिसांसमवेत छापा टाकण्यास गेले असता त्यांच्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. पण त्याला न जुमानता चव्हाण यांनी पंटर व बुकी अशा सहा जणांना ताब्यात घेत अटक केली.

पार्टनरसोबतही बेईमानी..
म्हसे हा मावळा संघटनेचा अध्यक्ष आहे. पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी तो संघटनेच्या लेटर पॅडचा वापर करत असे. पोलिसांना हप्ते देण्याच्या नावाखाली त्याने पार्टनरसोबतही बेईमानी केली. पोलिसांना देण्यासाठी 1 लाख 80 हजार रुपये तो पार्टनरकडून स्वतंत्रपणे घेत होता. गत चार महिन्यांपासून कावळा असलेल्या मावळ्याचा हा खेळ सुरू होता.

एसपींचा आदेश अन् चव्हाणांचे धाडस
निलेश म्हसे याच्या मटका अड्डयावर छापे टाकण्याचे धाडस कोणी पोलीस अधिकारी करत नव्हते. ज्याने हे धाडस केले त्याच्याविरोधात वरिष्ठांकडे अर्जफाटे झालेच म्हणून समजा. तत्कालीन एपीआय किरणकुमार बकालेसह अनेकांना त्याचा अनुभव आलेला आहे. मात्र खबर्‍याने पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे म्हसे याच्या धंद्याची इत्यंभूत माहिती पोहचविली. एसपी शर्मा यांनी बेडकपणे लगेचच चव्हाण यांनी कारवाईचे आदेश दिले. चव्हाण यांनीही धाडसीपणा दाखवित म्हसे याच्या मुसक्या आवळल्यया.

पोलीस कम पत्रकाराशी लागेबांधे
निलेश म्हसे याची पोलीस अधीक्षक कार्यालयात नेहमीच उठबस असे. एसपींपर्यंत आपल्या धंद्याची माहिती कोण देतो यावर तो वॉच ठेवून असत. धंद्याची माहिती एसपींना कोण देतो याची माहिती काढण्यासाठी पोलीस कम पत्रकार त्याने हाताशी धरला होता. त्यासाठी या पोलीस कम पत्रकाराला महिनाकाठी काही बिदागीही दिली जात होती. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या एका नातेवाईकाच्या मदतीने तो हे सगळे मॅनेज करत होता. आता एसपी पोलीस कम पत्रकाराला शोधून काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

*