मानोरी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून महिलांनी टाळे ठोकले

0

आरडगाव (वार्ताहर) – राहुरी तालुक्यातील मानोरी येथे वेळेत पिण्याचे पाणी मिळत नसल्याने गावातील महिलांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत कार्यालयावर धडक हंडा मोर्चा काढला. संतप्त महिलांनी व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. मात्र, ग्रामसेवक हजर नसल्याने दाद कोणाकडे मागावी? असा सवाल महिलांनी केला आहे.

 

 
काल सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. मात्र, ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व ग्रामसेवकापैकी कोणीही हजर नव्हते. दूरध्वनी केल्यानंतर सरपंच अशोक जाधव हजर झाले.

 

 
त्यांनी सगळी परिस्थिती जाणून घेतली. आज 4 वाजेपर्यंत पाणी सोडण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. 14 गाव पाणी पुरवठा योजनेतून पाहिजे तितका पाणीपुरवठा होत नाही. आम्ही 14 गाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष शिवाजीराजे गाडे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी इशाधीन शेळकंदे यांना या संबंधीची माहिती दिली. मात्र, एक महिन्यापूर्वी पिण्याच्या पाण्याची समस्या महिलांनी सांगितली. त्याची कोणीच गांभिर्याने दखल घेतली नाही.

 

 
मानोरीत पाण्याची बोंबाबोंब झाल्याने इंदुबाई आढाव, गंगूबाई गुंजाळ, संगीता थोरात, मुक्ता आढाव, मनीषा थोरात, मंगल कोहकडे, मनीषा काळे, सुरेखा थोरात, मंदा आढाव, संजीवनी थोरात, मीराबाई गोसावी, कौशल्याबाई आढाव, ताराभाभी पठाण, पुनम भवार, नसीम पठाण, या संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून टाळे ठोकले.

 

 

ग्रामसेवक वेळेवर हजर राहात नसल्याने या गावात अनेक छोट्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत ग्रामसेवकास विचारले असता, कर्मचारी ऐकत नाहीत, सध्या पाण्याची बिकट परिस्थिती आहे, त्यामुळे अशी वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*