Type to search

आरोग्यदूत

मानसिक आरोग्य जागर-आत्महत्यांना आवर

Share

मैत्रीण: मला वाटतं आपण आता विभक्त झालो पाहिजे मित्र: तू माझ्याशी असे वागू शकत नाही मैत्रीण: मागील आपला अनुभव आणि एकूण आपली कौटुंबिक सामाजिक परिस्थिती बघता आपल्या मैत्रीतील संबंध या पुढे मी नेऊ शकणार नाही. मित्र: म्हणजे तू माझ्याशी लग्न करणार नाही तर. मला माहीत आहे की, तुझे माझ्यावर प्रेमच नाही, याचा अर्थ तुझे दुसर्‍यावरच प्रेम आहे. असे म्हणून मित्राने सुसाट गाडी पळविली, आपली मानसिक स्थिती बिघडल्याची चिठ्ठी लिहून त्याने घरातील कीटकनाशकाची बाटली पिऊन घेतली. इस्पितळात भेटीमधे त्याने केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला आणि आलेल्या समस्येवर इतरही तोडगे होते,

पण त्या विशिष्ट मन:स्थितीत आपल्याला दुसरा मार्गच सुचला नाही, हे मान्य केले. आणखीन विचारपूस केल्यावर कळले की, मागल्या काही दिवसांपासून तो एकलकोंडा झाला होता, नातलगांना तो अनेकदा रडताना दिसला. मैत्रिणीसोबतही अनेकदा वादविवाद झाले. तो सतत बिछान्यावर पडून राहायचा. त्याला मैत्रिणीपासून विभक्तची भावना आणि स्वत:ची स्वतंत्र ओळख प्रतिमा विकसित करण्यात अडचण आली. या नैराश्यात रागाने भर घातली आणि त्याने जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. दैव बलवत्तर म्हणून प्राण वाचले, वेळीच योग्य उपचार मिळाले. पण तो या प्रयत्नात सफल झाला असता तर? यापेक्षा वाईट होऊ शकले असते का? असा आत्महत्येचा प्रयत्न टाळता आला असता का?

आत्महत्या किंवा तत्सम प्रयत्न हा आजच्या काळातला एक ज्वलंत विषय आहे. दररोज वर्तमान पत्र उघडल्यावर आत्महत्येसंदर्भात किमान एखादी तरी बातमी वाचायला मिळते. आत्महत्या विश्वव्यापी आहे. त्यासाठी कुठल्याही सीमा नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी जगभरात आठ लक्ष म्हणजेच दर 40 सेकंदाला एक अशा गतीने आत्महत्या घडतात. आपल्या देशात हा आकडा 1.35 लक्ष म्हणजे जागतिक संख्येच्या 17% एवढा भयंकर आहे. त्यामुळे कुणीही बाधीत होऊ शकतो. अगदी पुरातन काळापासून आत्महत्या व तत्सम प्रयत्न अस्तित्वात आहे. बदलत्या जीवनशैलीत दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढत जाऊन ही एक जागतिक सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे.

आत्महत्या करणारे बहुतांश लोक मानसिक आजारांनी ग्रस्त असतात. त्यामुळे आत्महत्या टाळायच्या असतील तर मानसिक आरोग्य सुदृढ तर असावेच, पण मनोविकारांचे ही त्वरित उपचार व्हावेत, अशी काळाची गरज आहे. त्याबद्दल घोषवाक्य आखून जागतिक आरोग्य संघटना जनजागृतीचे काम करत आहे. आत्महत्येचा प्रयत्न एक गंभीर त्रास व दुर्दशेचे प्रतीक होय आणि जगण्यात आवश्यक ते बदल करण्यासाठी पुरेशी मदत मिळाली तर अशा व्यक्तीच्या आयुष्यात हा एक महत्त्वाचा दिशादर्शक टप्पा ठरतो. वरील उदाहरणात पाहिल्या प्रमाणे किशोरवयीन मुलांमध्ये मैत्री जमवणे, टिकवून ठेवणे तणावदायक ठरते.

अशावेळी दोघांनीही परिस्थितीची जाणीव ठेवणे, सुसंवाद घडविणे, एकमेकांवर विश्वास ठेवणे, तडजोड करणे, थोडे झुकते माप घेणे, राग शांत होईपर्यंत अबोल राहणे, समस्या सोडवण्यासाठी मोठ्यांची अथवा मित्रांची मदत घेणे, इ. उपयोगी पडतात. असुरक्षितता, अस्वस्थता चटकन ओळखून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करा, तज्ञांची मदत घ्या. नैराश्य वेळीच ओळखून मानसोपचार तज्ञांचा सल्ला व उपचार घ्यावेत. अंमली पदार्थांचे व्यसन या मनोविकाराने ग्रस्त रुग्णांमध्येसुद्धा आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. मेंदू बधिर होऊन भावनांवरील नियंत्रण ढासळते आणि क्षीण विचारशक्तीत व्यसनाच्या प्रभावाखाली व्यक्ती आत्महत्यासदृश वर्तन दाखवितो. लैंगिक समस्या, मतीभ्रम, स्वभावदोष अशा मनोविकारांव्यतिरिक्त इतर काही कारणास्तव मानसिक खच्चीकरण झाल्याने व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होताना दिसून येतात.
डॉ. महेश भिरुड

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!