Type to search

ब्लॉग

मातृसंस्काराचा कृतिशील परिपाठ: कांताई

Share

मुलांना संस्कारित करणं म्हणजे एक नवीन सृष्टी निर्माण करण्यासारखं आहे. यासाठी आपल्या पाल्यांवर शिकलेली आई चांगल्या प्रकारे मातृसंस्कार करू शकते. अशिक्षित माणसांपेक्षा प्रत्येक बाबतीत आपली समज-

उमज, शोध-बोध, निरीक्षण-आकलन यांची क्षमता विकसित होत असते. मुलांचे पालनपोषण, संवर्धन, संगोपन करणं हे सोपं आणि फावल्या वेळाचं काम असं न मानणार्‍या कांताईंना रानात वाढलेली झाडं आणि बगिचात वाढवलेली झाडं-झुडपं यांच्यातला फरक उमजला. शिक्षणाचे कुटुंबसंस्थेतील महत्त्व त्यांनी जाणले. उच्च शिक्षण होतचं, कमाविलेलं शहाणपण, संयमशीलता या मूल्यात्मक बाबींसह फार मोठं संयुक्त कुटुंब कसं सांभाळावं याचा आदर्श वस्तुपाठ कांताईंनी घालून दिला. कांताईंच्या संस्कारांच्या ऋचा, आधुनिक समाजव्यवस्थेत संयुक्त कुटुंबपद्धती, पाल्यांचे संगोपन, आलेल्या प्रत्येक नात्याला योग्य न्याय कसा द्यावा हे सांगणारे कांताईंचे जीवनचरित्र महिला विश्वासह सर्वच पालकांना अनुकरणीयच. परिवारासह सकलजनांच्या कल्याणाची वात्सल्यमूर्ति असलेल्या कांताईंच्या श्रद्धावंदन दिनी त्यांना हृदयपूर्वक अभिवादन.
माणसाचे जीवनमान समृद्ध व्हावे यासाठी स्वतः निर्माण केलेल्या नियमावलींमध्ये तो जगत आहे.

जगत असताना राजव्यवस्था, समाजव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था अशा वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण झाल्यात. यात महत्त्वाचे म्हणजे कुटुंब व्यवस्था. यातून स्वः कल्याणासोबतच राष्ट्राचा परिणामी मानव जातीचा उद्धार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात काही अंशी मानव यशस्वीसुद्धा झाला. मात्र अत्याधुनिक साधनांसह आंतराळात पोहचलेल्या माणसाच्या पृथ्वीवरच्या कुटुंबव्यवस्थेला मात्र कीड लागलेली दिसते. कुटुंबसंस्था ही जगात अनंत अडचणींचे आघात सहन करणारी संस्था होत आहे. आपलं आनंदी कुटुंब असावं हे प्रत्येकाला वाटतं. परंतु त्यासाठी त्याग, समर्पण, यातना सोसावी लागते याची तयारी फार कमी जणांची आहे. रूढी, परंपरेने स्त्रियांच्या संदर्भात कडवट नियम असल्याचे सर्वश्रुत आहे. असे कडवट नियम पाळूनही उच्च शिक्षण घेतलेली स्त्री स्वतःचं कमाविलेलं शहाणपण, संयमशीलता या मूल्यात्मक बाबींसह फार मोठं संयुक्त कुटुंब कसं सांभाळावे याचा आदर्श वस्तुपाठ कांताईंनी घालून दिलेला आहे.

जगात एवढं अफाट यश, नाव मिळविल्यानंतरही प्रचंड कष्ट घेवून यशस्वी झालेले त्यांचे पती श्रद्धेय पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन, स्वतःच्या यशाचे श्रेय स्वतःकडे वर्ग न करता पत्नीला देतात. हा कांताईंचा मोठेपणा आहे. जुळवून घेणे, सकारात्मक भाषेचा वापर करणे, योग्यवेळी योग्य विषय, योग्य पद्धतीने हाताळणे यासाठी विवेकशील संस्कार सिंचन लागतं. भाऊंच्या आणि कांताईंच्या संस्काराचं हे सर्वात मोठं यश आहे. एकमेकांची गुणसंपदा ओळखणे, शक्तिस्थाने ओळखणे आणि त्या बाबींचा उपयोग केवळ स्वतःच्या उत्कृष्टतेसाठी खर्च न करता आप्तस्वकिय, विस्तारीत परिवार यांच्यासाठी करणे ही सदृढ मानसिकता असावी लागते. सगळं जमा करता करता स्वतःला वजा करणं राहून जातं. या उभयतांचे जीवन बेरजेचा संस्कार शिकवते. माणूस फक्त आपल्या कामामुळे ओळखला जातो, याची जाण या उभयतास आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत होती. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वंदन करता करता त्यातून दोन चार गुण पुष्पे जरी वेचली तर ती कौटुंबिक स्वास्थासाठी, समाजाच्या संस्कारीत जडणघडणीसाठी महत्त्वपूर्ण ठरतील.

सुना या घर सांभाळणार्‍या पाहिजेत, तोडणार्‍या नको असा कांताईंचा ठाम विचार होता. यासाठी त्यांनी सुनांसोबतच घरातील प्रत्येक मुलींना जीवन सुखा समाधानाने जगण्याचे सौंदर्य शिकविले. स्वतःही त्याच शिस्तीत जगल्या. कांताईंच्या सहज बोलण्यातून, आवडीनिवडीतून सुखा-समाधानात जगण्यातलं सौंदर्य दिसते. त्या मुलींना म्हणायच्या, सुंदर वस्तू अवश्य घ्या, पण कुणाच्या हृदयात विराजमान व्हायचं असेल तर प्रेमानं, रूचकर, पोटभर खाऊ घाला, घराचं घरपण राखून उत्तम गृहिणी व्हा, जबाबदारीनं आधी कुटुंब सांभाळा, कारण त्यात यशस्वी होणं हे खरं जगण्यातलं सौंदर्य! कांताईंचा हा संस्कार पाल्यांमध्ये रूजविणे ही काळाची गरज आहे. यातूनच कुटुंबसंस्थेला अधिक बळकटी येईल. सोशिकता, मितभाषी वृत्ती, अहंकारशुन्यता, रीतिरिवाज व परंपरा सांभाळण्याचा मनस्वी आनंद ही कांताईंची स्वभाववैशिष्ट्ये जगण्यातील शहाणपण आणि माणुसकीचे दर्शन घडविते.

कांताईंची भक्कम साथ-सोबत लाभल्यामुळे मोठ्याभाऊंना शुन्यातून विश्व निर्माण करता आले. संस्कारीत मुलांमुळे जगाच्या सर्व दिशांमध्ये जैन उद्योग समूहाचा नावलौकिक पोहोचविता आला. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील विश्वकल्याणाची प्रार्थना आचरणात आणता आली. कांताईंची घरातील ग्रंथसंपदा विशेष होती. वाचलेल्या कथा, गोष्टीतून पाल्यांसोबतच सर्वांनाच ती प्रेरणा देवून जाई. शुद्ध, स्पष्ट संस्कृत प्रचुर भाषा म्हणजे कांताईंचे वैशिष्ट्यं होतं. काटकसरीने पैसा सांभाळून खर्च करणार्‍या व्यावहारिक आणि शिस्तबद्ध आईने ‘लर्न टू लव्ह विथ लेस’ चा गडद संस्कार केल्याची कृतज्ञता सुपुत्र सदैव व्यक्त करतात.

आदरणीय मोठेभाऊ म्हणत, ‘मुलगा एकप्रकारे आईचीच लांबवर पसरणारी सावली असते… तिचे प्रतिबंब.’ जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन हे कांताईंच्या संस्काराचे पाईक. शेती, माती, पाणी, सौर यासह पर्यावरण संवर्धनातून सृष्टीच्या निर्माणाची कार्य जैन परिवाराकडून होत आहेत. सासु-सासर्‍यांसाठी वृद्धापकाळी जणू ती काठीचा आधार होती. शाळकरी मुला-मुलांसाठी ती शिक्षिका होती. बाईंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अतिशय व्यवस्थितपणे द्यावी लागत असत. प्रामाणिकपणा, आर्थिक व्यवहारातील इमानदारी, मनाचा सरळपणा हे सारे गुण माझ्यात आहेत आणि त्याचं संपूर्ण श्रेय बाईंनाच आहे! असे मोठ्याभाऊंनी कांताईंच्या ‘ती आणि मी’ या हृदय मनोगतात नमूद केले आहे.

बालपणापासून निर्भय असलेल्या कांताईंच्या शब्दकोशात ‘भीती’ हा शब्द कसा नव्हता हे समजण्यासाठी ‘वात्सलमूर्ती’ व ‘ती आणि मी’ ग्रंथसंपदा कामी येते. अंधाराला घाबरणे ही फार नैसर्गिक आहे. पण उजेड निर्माण करण्यासाठी आपण एखादी पणती लावणं फार आवश्यक आहे. ही पणती कांताईंनी लावली आणि कुटुंबसंस्था जगविली. प्रत्येक गृहिणीला, मुलीला, पालकांना सुखा-समाधानाने जगण्याचा मार्ग त्यांनी दाखविला. कांताईंनी दाखविलेला मार्ग, संस्कारीत केलेला वसा आणि वारसा जपून कुटुंबसंस्थेसोबतच पाल्यांची जडण-घडण त्यासाठी शिक्षणाचा सुयोग्य-दिशादर्शक उपयोग करून घेऊन, मुलांना संस्कारित करणे हीच कांताईंना श्रद्धावंदनदिनी आदरांजली.
प्रसिद्धी विभाग, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि,
जळगाव, मोबा. 9673934618
देवेंद्र पंढरीनाथ पाटील

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!