माझ्या पित्याचे नाव पुसले, आता तुमच्या पित्याचे नाव टाका

0

राजीव राजळे यांची अ‍ॅड. ढाकणेंवर टीका

 

पाथर्डी (प्रतिनिधी) – अथक परिश्रम करून आप्पासाहेब राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीची पुनर्बांधणी केली. तिसगाव उपबाजारातील व्यापारी संकुलाला आप्पासाहेब राजळे यांचे दिलेले नाव विरोधकांनी पुसून टाकले. माझ्या पित्याचे नाव पुसले, आता तुमच्या पित्याचे नाव टाका अशा शब्दांत माजी आमदार राजीव राजळे यांनी राष्ट्रवादीचे अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांचे नाव न घेता टीका केली.

 

 
तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून शहरातील साईनाथनगरमधील निवासस्थानी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यासमोर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पांडुरंग खेडकर होते. यावेळी जि.प. माजी सदस्य अर्जुन शिरसाठ, सोमनाथ खेडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, उपसभापती विष्णूपंत अकोलकर, नगरसेवक प्रवीण राजगुरू, रमेश गोरे, अनिल बोरूडे, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, सुनील ओव्हळ, सुनील परदेशी, माजी सभापती काकासाहेब शिंदे, संचालक गंगाधर गर्जे, पुरुषोत्तम आठरे, गोकुळ दौंड आदी उपस्थित होते.

 

 
यावेळी विविध वक्त्यांनी अ‍ॅड. ढाकणे यांचे नाव न घेता टीका केली. बाजार समितीची सत्ता राजळेंच्या ताब्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्यापासून सत्तासंघर्ष अधिक तीव्र बनला आहे. विरोधकांना आपल्यातील काही जबाबदार कार्यकर्ते मदत करतात. तशी नीती या निवडणुकीत दूर ठेवा, अशा शब्दांत पदाधिकार्‍यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. आदिनाथ शेतकरी पॅनलच्या नावाखाली भाजपाचे पॅनल निवडणूक रिंगणात असेल.

 
राजळे म्हणाले, तालुक्यातील सहकारातील धुरंधर दादापाटील राजळे, बाबुजी आव्हाड, रावसाहेब म्हस्के, आप्पासाहेब राजळे, चंद्रकांत गर्जे अशा दिग्गज नेत्यांनी तालुक्यात सहकार रुजविला. सहकारी बँक, साखर कारखाना, दूध संघ, बाजार समिती आदींमध्ये काम करत शेतकर्‍यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. आप्पासाहेब राजळे यांनी सहकारात राजकारण करताना स्वार्थ कधी बघीतला नाही. तालुका खरेदी विक्री संघाची दुरावस्था होती ती संस्था नावारूपाला आणून स्वच्छ कारभार केला. संचालक मंडळाने संस्थेकडून कोणताही भत्ता घेतला नाही.

 

 

तिसगाव उपबाजार समिती नावारूपाला आणली. निवडणूक आली की रुसवे फुगवे, गटबाजी वाढते ती बाजूला ठेवा. विरोधकांकडून या निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च करण्याची भाषा केली जात आहे. आपण मात्र काहीही खर्च करणार नाही. कार्यकर्त्यांनी संयम राखावा राजकीय वातावरण बिघडविण्याचे काम करू नका. बाजार समिती निवडणुकीत कार्यकर्ते गोंधळले होते. बाजार समितीचा केदारेश्वर कारखाना करू नका, असे आवाहन कार्यकर्त्यांनी ऐकले नाही.

 

आज बाजार समितीची काय परिस्थीती आहे. कार्यकर्ते शेतकरी यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.
प्रास्तावीक जे. बी. वांढेकर, सूत्रसंचालन राजीव सुरवसे तर आभार अशोक मंत्री यांनी मानले.

LEAVE A REPLY

*