माजी सरपंच संदीप वराळ हत्या प्रकरण

0

मुख्य सूत्रधार प्रवीण रसाळसह दोघे गजाआड

अहमदनगर (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला प्रवीण आनंदा रसाळ (रा. निघोज, ता.पारनेर) व राजू प्रभू भंडारी (रा. शिरूर, जि. पुणे) या दोघांना नगर पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील वेल्हे या गावातून अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन वाहने व अन्य मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
21 जानेवारी 2017 रोजी राजकीय पूर्ववैमनस्य, निवडणुकीतील अडथळा व तालुक्यातील वर्चस्व या कारणांमुळे निघोज येथे भरदिवसा सिनेस्टाईलने संदीप वराळ यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी 21 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यातील 16 जणांना अटक करण्यात आली असून 5 जण अद्याप पसार आहेत. या घटनेचा मुख्य सूत्रधार प्रवीण रसाळ याच्या अटकेसाठी वराळ यांच्या समर्थकांनी 25 मे रोजी नगर-पुणे महामार्गावर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. या धमकीवजा विनंतीस गांभीर्याने घेऊन रंजनकुमार शर्मा यांनी पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना रसाळ याला पकडण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान तपासात पोलिसांनी 21 आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यांच्यातील 13 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. प्रवीण रसाळ याच्यावर पारनेर तालुक्यात 13 गुन्हे दाखल असून त्याच्यावर यापूर्वी मोक्का लागलेला आहे. त्यामुळे तो यापूर्वीच पोलिसांच्या रडारवर होता. तरू भंडारी याच्यावर सातारा व पारनेर येथे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. अन्य आरोपींच्या गुन्हेगारी कुंडल्या काढण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस कर्मचारी योगेश गोसावी, उमेश खेडकर, विशाल अमृते, दत्तात्रय हिंगडे, अण्णा पवार, भगीनाथ पंजमुख, महेंद्र बर्डे, रविकिरण सोनटक्के, योगेश सातपुते, बाळासाहेब भोपळे, पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्‍वर घुगे, संजय मार्तोडकर, अरविंद भिंगारदिवे, महेश आव्हाड यांच्या पथकाने केली.

अशी झाली कारवाई
प्रवीण रसाळ यांचा मागमुस घेताना भोईटे यांनी गेल्या 15 दिवसांपासून मोठी कसरत केली. पुणे, मुंबई, रायगड अशा विविध ठिकाणी त्याचे वास्तव्य असल्याची माहिती मिळत होती. मात्र पोलीस पथक त्याच्याजवळ जाण्याच्या आधीच तो पसार होत होता. यापूर्वी सहा ते सात वेळा रसाळ व भंडारी यांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या होत्या. मात्र आज (दि.17) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आरोपी हे पुणे ग्रामीण येथील वेल्हे गावातील डोंगराच्या कडेला असणार्‍या एका खोलीत असल्याची माहिती आनंद भोईटे यांना मिळाली होती. त्यांनी पारनेर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास या परिसरात सापळा रचण्याचे आदेश दिले. प्रवीण रसाळ व राजू भंडारी हे झोपेत असतानाच त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आज दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सात जण अद्याप पसार
गुन्ह्यातील पसार आरोपी, प्रशांत ज्ञानदेव वराळ, खंडू विठ्ठल भूकन, पिंट्या आनंदा रसाळ, सचिन धोंडीभाऊ रसाळ, स्वप्नील धोंडीभाऊ रसाळ व अन्य दोन असे सात आरोपी पसार आहेत. त्यांच्या अटकेसाठी निघोज येथे 25 मे रोजी नगर-पुणे महामार्गावर आंदोलन होण्याची शक्यता आहे.
मोका लागलेले 12 आरोपी
प्रवीण रसाळ, राजू भंडारी, प्रशांत वराळ, राहुल साबळे, नागेश लोखंडे, पिट्या रसाळ, विकास रसाळ, माउली रसाळ, प्रशांत बर्डे, ऋषिकेश भोसले, मुक्तार इनामदार, अक्षय लुडे.
कट रचणारे
प्रशांत वराळ, महेंद्र झावरे, अमृता रसाळ, बबन कवाद, खंडू भुकन, मुक्तार इनामदार या सहा जणांवर कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*