महिलादिन विशेष;’वंशाच्या दिव्या’ साठी अट्टहास कायम

0

चांदवड:हर्षल गांगुर्डे -महिलांच्या जगण्याचा परिघ बचतगटांपासून ते इस्त्रोच्या संशोधनापर्यंत विस्तारला असला तरीही मुलींच्या जन्माबाबत आजही समाजात नकुशी भावना कायम असल्याचे माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अपयशावरून उघड झाले आहे.

मुलींच्या शिक्षण, आरोग्य व उज्वल भविष्यासाठीआर्थिक तरतूद करणे यासह बालिका भ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार रूजविण्यासाठी राज्याने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत एक मुलगी किंवा दोन्ही मुली असलेले पालक पात्र ठरतात मात्र, यात कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया अनिवार्य असल्याने राज्यभरात दाखल झालेले बहुतांशी अर्ज या एका अटीमूळे बाद झाल्याचे उघड झाल्याने पुरोगामी महाराष्ट्रात आजही वंशाच्या दिव्यासाठी असलेला अट्टहास कायम असल्याचे विदारक चित्र नव्याने समोर आले आहे.

आज जागतिक महिला दिन, स्त्रीभ्रूण हत्या, बालिकांचा मृत्यू,  माझी कन्या भाग्यश्री योजना, चांदवड, हर्षल गांगुर्डेनी विविध मापदंडाद्वारे महिलांच्या उत्तूंग यशाचे गोडवे गायले जातील मात्र दुसरीकडे आजही मुलीच्या जन्माचे स्वागत होत नसल्याने पुरूषसत्ताक समाजाची मानसिकता अद्याप बदललेली नसल्याचे सत्यही दबून राहिले नाही. स्त्री भ्रूण हत्येला कायद्याने लगाम घातला असला, तरी तंत्रज्ञानाचा लाभ उठवित कळ्यांना गर्भातच खुडण्याचा प्रकार लपून-छपून करणारे आहेतच.

चांदवड तालुक्यात माझी कन्या भाग्यश्री योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुक्यातील २ महिला व बालविकास प्रकल्पातील ११ बीट अंतर्गत २८८ अंगणवाडीसेविका तसेच २०७ मदतनीसांनी एपीएल व बीपीएल धारक पालकांपर्यंत जाऊन या योजनेसाठी प्रोत्साहित केले असता एकुण २९२ पालकांनी पुढाकार घेत अर्ज दाखल केले.

मात्र, योजनेच्या लाभासाठी तुम्हाला दोन मुलींवर कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आल्यानंतर यापैकी २९१ पालकांनी वंशाला दिवा हवाच म्हणून नाक मुरडले. तर तालुक्यातील भाटगाव येथील दीव्या शरद पोटे ही एकमेव बालिका भाग्यश्री योजनेअंतर्गत पात्र ठरली असून तीच्या पालकांनी दोन मुलींवर कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया केली आहे. याबाबत त्यांचा जिल्हा परिषद नाशिक येथे विशेष सत्कारही करण्यात आला.

दरम्यान या योजनेबाबतची खरी परिस्थिती दै. देशदूतने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या योजनेअंतर्गत आजी-आजोबांना ५ हजार रूपयांपर्यंत सोन्याचे नाणे दिले जाणार असतांनाही कुटूंबनियोजन शस्त्रक्रियेस आजी-आजोबांचाच जास्त विरोध असल्याचे काही अंगणवाडी सेविकांनी सांगितले.

यावरून समाजात मुलींच्या जन्मासाठी शासन विविध योजनांद्वारे प्रयत्नशिल असले तरी बुरसटलेली पुरूषप्रधान मानसिकता त्याचे मातेरे करण्यात आघाडीवर असल्याचे अधोरेखीत झाले आहे. यावरून फक्त महिला दिनी स्त्रीत्वाचा सन्मान करून औपचारिकता पार पाडणे किंवा मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विविध शासकीय योजना आणून शेवटी बासनात गुंडाळण्यापेक्षा बुरसटलेल्या विचारांच्या मूळावरच घाव घालत पुरूषप्रधान संस्कृतीमधून नागरिकांना बाहेर पाडणं गरजेचं बनल आहे. तरचं महिला दिनाचे सार्थक होईल अन्यथा वंशाच्या दिव्याचा अट्टहास कायम राहून कळ्या खूडणं चालूच राहिल.

चालु वर्षात २२ बालिकांचा मृत्यू
चांदवड तालुक्याचे लिंग गुणोत्तर ८७१ आहे. तसेच तालुक्यात जन्माला येऊन विविध आजारपणात मृत्यू झालेल्या बालिकांची संख्या (वय ० ते ६) २०१५-१६ वर्षात २९ होती तर तीच संख्या २०१६-१७ वर्षात २२ वर आली आहे. याबरोबरच प्रसुती दरम्यान मृत्यू झालेल्या महिलांची संख्या गत वर्षात ३ इतकी होती ती यंदा १ वर आहे.

LEAVE A REPLY

*