Type to search

आरोग्यदूत

महिलांवरील अत्याचार व मानसिक तणाव

Share

विविध सर्वेक्षणातून दिसून आले की, सर्वसाधारणत: 70 टक्के महिला आयुष्यभरात कधी ना कधी अत्याचाराला बळी पडतात. वर्तमानकाळात आपल्या देशात हा अगदी ज्वलंत चर्चेचा विषय असला तरी याबाबत अनेक पौराणिक कथा सुद्धा आहेतच. ‘सबळांनी दुर्बलांचे रक्षण करावे’ असे सगळेच धर्म सांगतात. तरी आपल्यासारख्या धार्मिक देशात बलाढ्य लोक अबलांची पिळवणूक करतात. असेच चित्र बहुतांशी दिसून येते.

मग याला स्त्री-पुरुषांमधील बळाबाबत निसर्गाने केलेली तफावत अपवाद ठरलेली नाही. त्याचबरोबर महिलांवर फक्त पुरुषच नव्हे तर सबळ स्त्रियाही अत्याचार करतात. अत्याचार म्हणजे हिंसा, घाला, इजा, अपमान, क्रौर्य, प्रतिष्ठेला नुकसान पोहोचवणे, तर कधी ठार देखील मारून टाकणे. अत्याचार हे बलात्कार, दंगे, युद्ध घडवून आणतात. याला इतिहास साक्षी आहेच. अत्याचार विरोध दर्शवण्यासाठी किंवा साधन म्हणून वापरण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ विरोध करून धमकावणे किंवा लक्ष वेधून घेण्यासाठी साधन म्हणून वापरणे. अत्याचार बोलून म्हणजे शाब्दिक वादावादी करून किंवा अबोलपणे भौतिकरित्या केला जातो.

महिलांवर होणारे अत्याचार मानसिक तणाव उत्पन्न करून स्वास्थ्य प्रकृतीवर वाईट परिणाम घडवून आणतात. त्यामुळे कार्यकुशलता, जीवनाची गुणपूर्णता, जनमानसात मिसळण्याची कुवक खालावतात. हे पडसाद त्या महिलेच्या पुढील प्रजातीवर कुटुंबावर आणि समाजावर पडतात आणि समाजाला अत्याचार करण्याबाबत आणखीन प्रवृत्त करत राहतात. त्यामुळे देशाची गुणवत्ता ढासळते. अत्याचार विशिष्ट महिला समूह, समाज, धर्म वा देशाला मर्यादीत नसतो तर तो महिलांप्रती असलेल्या न्यून भावात रुतलेला असतो. अत्याचाराचे खून वा आत्महत्त्यासारखे जीवघेणे परिणाम होऊ शकतात. दीर्घकालीन शारीरिक वा मानसिक जखमा,

आयोजित गर्भधारणा, गर्भपात, लैंगिक आजार, संसर्गजन्य गुप्तरोग इ. पडसाद पडतात. मानसिकरित्या अशी पीडित महिला खचून जाते तिला नैराश्य, निद्रानाश, भीतीरोग, संरक्षण चिंता, खाण्यापिण्याची वासनाच नाहीशी होणे, भावनिक समस्या, मनोकायिक डोकेदुखी, पाठदुखी, पोटदुखी इ. मनोविकार जडू शकतात. एकंदरीत अशा महिलेची प्रकृती कमकुवत होते. पीडित महिला अलिप्त राहतात. त्यांचा रोजगार बुडतो आणि त्या स्वत:च्या मुलांची व्यवस्थित काळजी घेण्यास समर्थ ठरतात. महिलांवर अत्याचार होणार्‍या कुटुंबात वाढणारी मुले भावनिक व वर्तणूक समस्यांनी पछाडली जातात. त्यांच्या भावी आयुष्यात देखील अशी हिंसा करण्याची वा ओढवून घेण्याची शक्यता वाढते.

बहुतांशी जुलूम होतात तेव्हा अत्याचारी किंवा बळी दोघांपैकी एक विकृत मनस्थितीचा असतो. व्यसनाधिनता, अनेकांशी लैंगिक संबंध, कुटुंबियांकडून व्यक्त होणारा चारित्र्यावरील संशय, जोडीदारावर संशय, असामाजिक वर्तन, स्वभाव दोष, वैवाहिक समस्या, विसंवाद, नैराश्य, उन्माद, मतिभ्रम इ. मनोविकार अत्याचारास जोखमीचे ठरतात. बाल्यावस्थेत झालेले छळ. कौटुंबिक हिंसा भूतकाळात सहन केलेले अत्याचार, कुटुंबाची अब्रू राखण्यासाठी रुजलेल्या अंधश्रद्धा इ. परिस्थितीमध्ये अत्याचाराचे प्रमाण वाढते. ‘लिंगभेद’, तसेच ‘पुरुष महिलांवर वरचढच असतात.’ असा समझ ठेवणारा दृष्टिकोन महिलांवरील अत्याचाराला पोषक ठरतो. शरीरातील संप्रेरके मनुष्याला हिंसक बनवू शकतात. सामूहिक बलात्कार, टोळी युद्ध यातून बळजोरी सांसर्गिक असल्याचेही म्हणता येईल. जसे एकाला अत्याचार करताना बघून इतरही चवताळतात व दांडगाई दाखवतात.

महिलांबाबत आदर, स्तुती आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘जागतिक महिला दिन’ साजरा केला जातो. पण दुर्दैवाने असे दिन शहरांमध्येच साजरे होतात आणि ते पण त्यांचे उद्देश विसरून फक्त राजकीय हेतू समोर ठेवून महिलांचे कामगिरी कर्तृत्व यांना सन्मान मिळावा. त्यांच्याप्रती समाजात आदर, प्रेम निर्माण व्हावे, या दिशेने महिला दिन साजरे व्हावेत. त्यांची प्रसिद्धी खेडोपाडी, जेथे महिलांबाद्दल समाज मनात न्यून भाव आहेत अशा ठिकाणी पोहोचवावी आणि या उपक्रमांना जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली तर लोकांची विचारसरणी बदलून महिलांवरील अत्याचार कमी होण्यास मदत होईल.

डौ. महेश भिरूड 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!