महिलांना आरक्षण दिले, संरक्षणाचे काय?

0

मुंबई मोर्चात जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केलेल्या राणी दरंदलेचा सवाल

 

सोनई (वार्ताहर) – नेहमी अभ्यासाची भाषा करणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना दिलेल्या 50 टक्के आरक्षणाचा अभ्यास करून त्यांना 100 टक्के संरक्षण दिलं जातं का? याचाही अभ्यास करावा असा प्रश्‍न सोनईतील विज्ञान पदवीधर असलेल्या राणी माधव दरंदले या युवतीने व्यक्त केला आहे.

 

 

बुधवार दि. 9 रोजी मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चात अहमदनगर जिल्ह्याची रणरागिनी म्हणून कु. राणी दरंदलेचे आझाद मैदानावरील ऐतिहासिक व्यासपिठावर भाषण झाले. तिने ग्रामीण भागातील विविध प्रश्‍नांवर आवाज उठविल्याबद्दल ग्रामस्थांनी तिचे सोनईत जोरदार स्वागत केले. सोनईतील दत्तनगर भागात राहणार्‍या राणीचे वडील माधव व आई हिराबाई तीन एकर शेतात राब-राब राबून पूनम, वैभव व राणीचे शिक्षण पूर्ण केले. आई-वडील हाताला फोड येऊनही राबतात. मात्र त्यात फक्त पोटाचीच खळगी भरते.जगायचं कसं हा रोजचाच प्रश्‍न आहे. आणि ही चिड मी मुंबईच्या भाषणात व्यक्त केली असे राणीने सांगितले.

 

 

महाराष्ट्रात रोज महिला व युवतींवर अत्याचाराच्या घटना घडतात. कर्जाला कंटाळून शेतकर्‍यांच्या आत्महत्या बंद नाहीत. कर्जमाफी केली मात्र प्रत्यक्षात पदरात काहीच नाही. प्रत्येक गोष्टीत रांगेत उभे करून सरकार शिक्षा तर देत नाही ना? असा प्रश्‍न तिने केला. केंद्र व राज्य सरकारला अभ्यास नाही. जाग येण्याची खरी गरज आहे असेही तिने सांगितले. क्रांतीकारी मोर्चात भाषणाचं भूषण म्हणून राणी दरंदलेला शिवाजी तरुण मंडळ, तुळजाभवानी प्रतिष्ठान, अनिकेत युवा मंचच्या सदस्यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.

LEAVE A REPLY

*