महावितरण विरोधात शेतकर्‍यांचा ठिय्या

0

पूर्ण दाबाने 11 तास वीज द्या, अन्यथा उपकेंद्राला टाळे ठोकणार

 

निमगावपागा (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे विज वितरण कंपनीच्या उपकेंद्राच्या गलथान कारभाराविरोधात धांदरफळ गटातील शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन केले. दोन दिवसात पूर्ण दाबाने व 11 तास विज पुरवठा सुरळीत न दिल्यास विज उपकेंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

 
गेली आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे. विज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात पेमगिरी, नांदुरी, निमगावपागा, धांदरफळ परिसरातील उभी पिके जळण्याच्या मार्गावर आहे. आधीच दुष्काळाच्या झळा, त्यात विजेचा सारखा लपंडाव सुरु असून शेतकरी हैराण झाला आहे. पूर्ण दाबाने 8 तास विज असतानी 3 ते 4 तासाचे भारनियमन, व राहिलेल्या 4 तासात सारखे विजेचे झटके यामुळे पिकांना पाणी भरायचे कसे हा प्रश्‍न शेतकर्‍यापुढे आहे.

 

विज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून नेहमीच उडवाउडवीची उत्तरे मिळतात. धांदरफळ उपकेंद्र हे राजूर फिडरला जोडल्यामुळे या भागातील शेतकर्‍यांना कमी दाबाने विज पुरवठा होत आहे. जर येत्या दोन दिवसात पूर्ण दाबाने वीज पुरवठा झाला नाही तर उपकेंद्राला टाळे ठोकू असा इशारा जिल्हा परिषद सदस्य मिलींद कानवडे यांनी दिला आहे.

 
यावेळी विज कंपनीचे उपमुख्यकार्यकारी अभियंता सुर्यवंशी यांनी शेतकर्‍यांचे निवेदन स्विकारले. येत्या दोन दिवसात पूर्ण दाबाने विज पुरवठा केला जाईल असे आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी धांदरफळचे उपसरपंच सतिश खताळ, सोसायटीचे अध्यक्ष शरद कोकणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*