महावितरणच्या उर्मट अधिकार्‍यांच्या निषेधार्थ कार्यालयाला टाळे

0

देवळाली प्रवरा (वार्ताहर)- शहरातील बिरोबावाडी येथे मुख्य वीजवाहिनीची तार तुटून रस्त्याच्या मधोमध लोंबकळत होती. याबाबत येथील महावितरण कार्यालयात माजी नगरसेवक रंभाजी कराळे यांनी उपअभियंता गावडे यांच्याकडे तक्रार केली. त्यावर गावडे यांनी उपस्थितांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकले.

 
चार दिवसांपूर्वी वादळी वार्‍याने बिरोबावाडी येथील महावितरणच्या मुख्यवाहिनीची तार तुटली होती. ही तार रस्त्याच्या मध्येच लोंबकळत असल्याने नागरिकांच्या जिवाला काही धोका होऊ नये, म्हणून कराळे यांनी महावितरण कार्यालयात तक्रार दिली होती. त्यावेळी उपअभियंता गावडे यांनी लगेच तार जोडून देतो, असे सांगीतले होते.

 

पण या घटनेला चार दिवस होऊन देखील दखल न घेतल्याने काल शुक्रवारी (दि. 05) सकाळी 11 वाजता रंभाजी कराळे, नगराध्यक्ष सत्यजित कदम, नगरसेवक सचिन ढूस, अण्णासाहेब चोथे, संजय बर्डे, आदिनाथ कराळे, यांनी सहाय्यक अभियंता गावडे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन कार्यालयाच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकले.

 
याबाबत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महावितरणचे श्रीरामपूर व नगर येथील अभियंता यांच्याकडेही लेखी तक्रार करण्यात आली आहे.

 
दरम्यान, या घटनेबाबत गावडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नेहमीप्रमाणेच फोन घेतला नाही.

 

याबाबत महावितरणचे येथील अभियंता देहरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून घटनेसंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, गावडे यांनी तक्रारदारांना कार्यालयाबाहेर जाण्यास सांगितल्याने ते चिडले त्यातून हा प्रकार झाला. टाळे लावले असले तरी त्यांनी चावी दिली आहे. उद्या कार्यालय उघडले जाईल. गावडे यांची भाषा उर्मट असल्याने त्यांचे लोकांशी कायम खटके उडतात . याबाबत वरिष्ठांकडे अहवाल पाठविला असून दोन-तीन दिवसांत योग्य ती कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

*