महावितरणचा ‘एमर्जन्सी’चा फेरा; शहरात अघोषित भारनियमन

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या दोन ते तीन दिवसापासून नगर शहरातील माळीवाडा, दिल्ली गेट, तेलीखुंट, सावेडी, बोल्हेगावसह शहराच्या विविध भागात ऐन उन्हाच्या कडाक्यात महावितरण कंपनीने इमरजिन्सीच्या नावाखाली अघोषित भारनियमन सुरू आहे. यामुळे नगरकर घामाने डबडबले आहेत. सावेडीतील गावडेमळा, कांदबरीनगरी परिसरातील नागरिकांनी वीज नसल्याने रात्र जागवून काढली. गर्मीमुळे हैराण झालेल्या नगरकरांना दिलासा कधी मिळणार याचे उत्तर मात्र महावितरण कंपनीकडे नाही.
नगरचा पारा 40 अंशाच्या पुढे सरकला आहे. उन्हामुळे नगरकारांच्या अंगाची लाही लाही होत असतांना महावितरणने भारनियमनाचा झटका दिला आहे. कधी नाशिक, कधी सोनेवाडी तर कधी केडगावच्या वीज उपकेंद्रातून तातडीच्या भारनियमनाच्या नावाखाली नगर शहरातील वीज गायब होत आहे. मंगळवारी तर माळीवाडा परिसारातील वीज सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत गायब होती. या भागात जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजले जाणारी जिल्हा परिषदेचे कार्यालय आहे. या भारनियमनाचा मोठा फटका या कार्यालयाला बसला. त्या ठिकाणी कार्यरत असणार्‍या सुमारे 500 ते 600 कर्मचार्‍यांना दिवसभर कार्यालयात हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली. अशीच परिस्थिती शहरातील दिल्ली दरवाजा परिसरात होती. या ठिकाणी उकड्याने नागरिक हैराण होते. वीज का बंद आहे, हे विचारण्यासाठी महावितरणच्या माळीवाडा, तेलीखुंट, दिल्लीगेट, फकीरवाडा, सावेडी, भिस्तबाग आणि बोल्हेगाव येथील कार्यालयात संपर्क साधला  असता कोणताच अधिकारी समर्पक उत्तरे देऊ शकला नाही. यातील अनेक ठिकाणी फोनचा रिसिव्हर बाजूला करून महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी निवांत असल्याची प्रचिती आली.

 शहरातील वीजेच्या भारनियमानबाबत महावितरणकडे अधिक चौकशी केली असता वरून तातडीचे भारनियमन येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आलेल्या तातडीचे भारनियमन कोणत्या भागात करायचे हे स्थानिक अधिकारी कर्मचार्‍यांच्या हात असून ज्या भागातील वसुली सुमार आहे, त्या ठिकाणी हे तातडीचे भारनियमन लादण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून उकाड्यात वाढ झाली आहे. त्यातच अचानक वीज गायब होत असल्याने त्याचा फटका वृध्द, आजारी आणि लहान मुलांना बसत आहे. बाहेर कडक्याचे उन आणि घरात वीज नाही असे दुहेरी संकट नगरकरांसमोर उभे असल्याचे दिसते.

 

LEAVE A REPLY

*