महावितरणकडून तांत्रिक अडथळे दूर व्हावेत; जि.प. विशेष बैठकीत अध्यक्षांची सूचना

0
नाशिक ।  जिल्ह्यात वीजपुरवठ्यात विस्कळीतपणा, अवेळी होणारे भारनियमन, पावसात उखडून पडलेले खांब, तुटलेल्या तारा आणि नादुरूस्त होणारी विद्युत जनित्रे हे महावितरणच्या तांत्रिक अडथळ्यांचे परिपाक आहे. त्यामुळे महावितरण कंपनीकडून वीजपुरवठ्यातील त्रुटी तात्काळ दूर व्हाव्यात, अशी सूचना जिल्हा परिषद अध्यक्षांनी महावितरणच्या अभियंत्यांना केली.

जि.प.मध्ये आज महावितरणच्या अधिकार्‍यांना बोलवून अध्यक्षा शीतल सांगळे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी उपाध्यक्षा नयना गावित, समाजकल्याण समिती सभापती सुनीता चारोस्कर, अर्थ-बांधकाम समिती सभापती मनीषा पवार, शिक्षण-आरोग्य समिती सभापती यतीन पाटील यांच्यासह जि.प. सदस्य, गटनेते, महावितरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

जिल्ह्यात महावितरणविरोधात अनेक तक्रारी असताना तसेच जागोजागी खांब कोसळल्यानंतर त्यांची रखडलेली दुरुस्ती, तुटलेल्या तारा, वीज उपकेंद्रांची रखडलेली कामे, देयकांमध्ये अव्वाच्या सव्वा वाढ आणि नवीन वीज जोडण्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने महावितरणच्या मुख्य अधिकार्‍यांना बोलावून त्यांना याविषयीचा जाब विचारला जावा, अशी सूचना गत स्थायी समिती बैठकीत सदस्यांनी केली होती. त्यामुळे आज महावितरणच्या प्रमुख अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात महावितरण अधिकार्‍यांना जाब विचारण्यात आला.

आदिवासी भागात आश्रमशाळा, वाडे-पाडे भागात दुर्गम असताना तेथील वीजपुरवठा खंडित असतो. त्यामुळे विद्यार्थी, आदिवासींच्या दैनंदिन कामावर विपरित परिणाम झाल्याची तक्रार यावेळी उपस्थित सदस्यांनी अध्यक्षांकडे केली. त्यावेळी अधिकार्‍यांना विचारणा करण्यात आली तेव्हा अधिकार्‍यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. म्हणून सदस्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले.

महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका म्हणून अनेक गावांमध्ये ट्रान्सफॉर्मर बंद पडतात. मात्र त्याची दुरुस्ती आणि नवीन बसवून देण्याचा भुर्दंड गावकर्‍यांनाच सहन करावा लागतो, अशी तक्रारही यावेळी उपस्थित सदस्यांनी केली. विहिरींना पाणी असताना वीजपुरवठा नसल्याने पिकांना उन्हाळ्यात पाणी देता येत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नवीन वीज जोडणीचेे अनेक अर्ज रेंगाळले आहेत. नवीन कनेक्शन का देण्यात येत नाही, अशी विचारणा यावेळी अधिकार्‍यांना करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व सदस्यांच्या गटात महावितरणच्या गलथान कारभाराचे स्वरूप सारखेच असल्याने अध्यक्षा सांगळे यांनी महावितरणच्या कामात सुधारणा करण्याचे सूचीत करण्यात आले.

सदस्यांनी 15 दिवसांत लेखी स्वरुपात महावितरणविरोधात तक्रारी कराव्यात. महावितरणने वीजपुरवठा आणि इतर तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी तात्काळ हालचाल करावी. जिल्हा परिषद पुन्हा अडीच महिन्यांनी महावितरण कंपनीकडून केलेल्या कामाचा आढावा घेईल, असे निर्देश अध्यक्षांनी दिले.

LEAVE A REPLY

*