महाराष्ट्राच्या संघाला ‘संविधान कप’

0
नागपूर । महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट संघाने मसंविधान कपफ राष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. नागपूरमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने उत्तराखंड संघाचा 8 विकेटसने पराभव केला.

20 षटकांच्या सामन्यात उत्तराखंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र संघाने अचूक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण करुन उत्तराखंडचा डाव 18.1. षटकात 91 धावांमध्ये गुंडाळला. त्यामुळे महाराष्ट्रासमोर विजयासाठी 92 धावांचं आव्हान होतं. मैदानात उतरलेल्या महाराष्ट्र संघाने हे लक्ष्य 2 विकेटच्या मोबदल्यात अवघ्या 8.3 षटकात पार करुन विजेतेपद पटकावलं. या सामन्यात परशुराम देसलेने महाराष्ट्र संघासाठी नाबाद 59 धावा केल्या.

व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि डिसेबल्ड स्पोर्टिंग आयोजित मसंविधान कपफ राष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धा नागपूरच्या बुद्ध पार्कमध्ये 8 ते 10 मार्च 2019 या कालावधीत भरवण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि उत्तराखंड या राज्याच्या व्हीलचेअर क्रिकेट संघांचा समावेश होता. या स्पर्धेत सहभागी खेळाडूंचं अपंगत्व 60 ते 90 टक्के होते. खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही व्हीलचेअरवर बसून केलं. ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी संकल्प असोसिएशन, दिव्यांग स्पेशल अ‍ॅबिलिटी फाऊंडेशन, पाऊल दिव्यांग वेलफेयर फाऊंडेशन यांचा सहभाग होता.

विजेतेपदाच्या लढाईआधी साखळी सामन्यात महाराष्ट्राने आधी उत्तराखंडला 48 धावा, गुजरातला 8 विकेटस आणि दिल्लीला 9 विकेटसनी पराभूत करुन अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. या स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार परशुराम देसले, उत्कृष्ट फलंदाज परशुराम देसले, उत्कृष्ट गोलंदाज विश्वनाथ गुरव, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण साहिल सय्यद यांना देण्यात आला. तर दिल्ली संघाला शिस्तबद्ध संघाच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट संघाने राष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेत सलग तीन स्पर्धा जिंकून विजेता संघ बनला. या आधी दिल्लीमध्ये जून 2018 मध्ये झालेल्या भारतीय व्हीलचेअर प्रीमियर लिगचे विजेतेपद मिळवले. त्यानंतर उत्तराखंडमध्ये झालेल्या सहा राज्यांच्या राष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं होतं. आता नागपूरमधील मसंविधान कपफ जिंकून पुन्हा एकदा चॅम्पियन झाला आहे.

महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट संघ :- रमशे सरतापे (कर्णधार), राहुल रामगुडे (उप कर्णधार), शहीद अन्सारी, परशुराम देसले, विश्वनाथ गुरव, संतोष रंजागणे, राजू पाटील, हाफिज अन्सारी, विनोद गावंडे, साहिल सय्यद, संतोष घोडके, निखिल कडगावकर, निलेश राठोड, दिलीप कांबळे (संघ व्यवस्थापक), मनिष शर्मा (प्रशिक्षक)

LEAVE A REPLY

*