महामार्ग वाहतुकीसाठी 23 मार्शलची प्रतीक्षा

0

नाशिक : शहरातून जाणार्‍या महामार्गावरील जंक्शनसाठी आणखी 23 मार्शल मिळण्याची वाहतूक विभागाला प्रतीक्षा आहे. या मनुष्यबळामुळे महामार्गावरील वाहतूककोंडी सोडवण्यास मदत होणार असल्याचे पोलीस वाहतूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

मुंबई-आग्रा महामार्गावर उभारण्यात आलेला उड्डाणपूल व उड्डाणपुलाखालून जाणार्‍या मार्गाला अनेक ठिकाणी सर्व्हिसरोडने छेदले आहे. यामुळे अंबड ते आडगावपर्यंत वर्दळीच्या ठिकाणी वाहतूककोंडीसह अपघाताच्या मोठ्या घटना घडत आहेत. द्वारका, मुंबईनाका, इंदिरानगर अशा ठिकाणी तीन शिफ्टमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बळ ठेवावे लागत आहे. प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलिसाची नियुक्ती होणे शक्य नाही. तसेच सिग्नलही बसवले जात नाहीत.

या पार्श्वभूमीवर नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया आणि वाहतूक विभागाने वाहतूक नियमनासाठी खासगी व्यक्तींची (मार्शल) नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काही ठिकाणी या खासगी व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली होती. याचा चांगला परिणाम दिसून येत होता. मात्र सर्व जंक्शन आणि वाहतुकीचा फ्लो पाहून 55 मार्शलची मागणी पोलीस वाहतूक विभागाने केली होती.

पैकी 32 मार्शल एनएचएआयकडून देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. या सर्वांना पोलीस वाहतूक नियमांबाबत प्रशिक्षण देऊन आवश्यक तेथे नियुक्ती करणार आहेत. लेखानगरसह इतर काही ठिकाणी या मार्शलमार्फत वाहतूक नियमनाचे काम केले जात आहे. आता आणखी 23 मार्शल्सची आवश्यकता असून ते उपलब्ध झाल्यास उर्वरित सर्वच जंक्शनवर या व्यक्तींमार्फत नियमनाचे काम होऊ शकते. अंबडच्या गरवारे टी पॉईंटपासून पुढे के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत अनेक ठिकाणी अंडरपास तयार करण्यात आले आहेत.

त्यातील इंदिरानगर अंडरपास, मुंबईनाका आणि द्वारका या ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या नेहमीच उद्भवते. याव्यतिरिक्त लेखानगर, औरंगाबाद नाका, नांदूरनाका, पाथर्डी फाटा अशा ठिकाणी वाहनचालकांना कसरत करत रस्ता क्रॉस करावा लागतो. हायवे, दोन सर्व्हिसरोड आणि त्यांना कॉलनीकडून मिळणारे रस्ते अशा धर्तीवर मार्शलची नियुक्ती करण्यात येणार असून त्याचा फायदा होऊ शकतो, असा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

LEAVE A REPLY

*