महामार्ग नगरपंचायतीकडे वर्ग करण्याचा ठराव रद्द करा

0

अकोले : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी

अकोले (प्रतिनिधी) – राज्य महामार्ग रस्ता नगरपंचायतीकडे वर्ग करण्याचा जो ठराव अकोले नगरपंचायतीने केला आहे तो दारू बंदी उठविण्यास पूरक ठरू पाहणारा ठराव मागे घ्यावा अशी मागणी नगर पंचायतकडे मर्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा परिणाम म्हणून अकोले शहरातील दारूची दुकाने बंद झाली आहेत. शहरातील रस्त्या – रस्त्यावर मुबलक प्रमाणात मिळणारी दारू त्यामुळे बंद झाल्याने शहरामध्ये शांतता व विकासाचे वातावरण तयार होण्यास मदत होत आहे. न्यायालयाच्या निकाला नुसार राज्यमार्गा पासून 500 मीटर अंतराच्या आता असणारी दारूची दुकाने बंद करावी लागल्याने नागरिकांमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. शहराच्या याच दुकानांमधून तालुकाभर अवैधरीत्या दारूचा पुरवठा होत असल्याचे आरोप होत आले आहेत. आता ही दुकाने बंद असल्याने तालुक्याच्या गावोगाव सुरु असणारा अवैध दारू पुरवठा कमी झाला आहे.
राज्यमार्गाचा जो भाग अकोले शहर हद्दीतून जातो त्या भागासह संपूर्ण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत मोठी आर्थिक तरतूद झाली आहे. या निधी अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीची कार्यवाहीही सुरु झाली आहे. असे असताना आता दुरुस्तीच्या कारणासाठी अशा प्रकारे रस्त्याच्या हस्तांतरणाचे प्रयोजन संपुष्टात आले आहे. नगर परिषदेने बदललेल्या परिस्थितीची दखल घेण्याची गरज आहे.
आपल्या प्रभागाचा विकास व्हावा यासाठी प्रभागातील जनतेने संबंधित नगर सेवकांना निवडून दिले आहे. शुद्ध दारूचा नव्हे तर शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी त्यांनी नगर सेवकांना मतदान केले आहे. प्रभागातील नव्या पिढ्यांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी आपण उपक्रम राबवू अशा प्रकारची आश्वासने देत नगरसेवकांनी निवडणुकांमध्ये जाहीरनामे काढत मतदारांकडून मते मागितली आहेत. आपल्या आश्वासनांचे सर्व नगरसेवकांनी आठवण ठेवत, जनतेच्या भावना लक्षात घेत दारू विरोधात ठाम भूमिका घेण्याची आवश्यकता आहे.

मागणीची दखल घेत दिनांक 20 मे रोजी होणार्‍या नगर पंचयातच्या बैठकीत या संदर्भातील विषय मांडण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. अशा या पार्श्वभूमीवर माकप सर्व नगरसेवकांना विनंती करीत आहे की, या बैठकीत त्यांनी शहरवासीयांच्या भावना लक्षात घेत दारू बंदीच्या विरोधात ठाम भूमिका घ्यावी. आपल्या प्रभागातील महिलांच्या व जनतेच्या भावनेचा आदर करीत मतदान करावे. नगरपंचायत ने केलेला रस्ता हस्तांतरित करण्याचा यापूर्वी केलेला ठराव रद्द करवून घ्यावा.

नगरसेवक काय भूमिका घेतात यावर शहरातील दारूबंदीचे भवितव्य अवलंबून आहे. कोणता नगर सेवक या संबंधी काय भूमिका घेतो याकडे जनता लक्ष ठेऊन आहे. जे नगरसेवक दारू पुन्हा सुरु व्हावी यासाठी पूरक भूमिका घेतील त्यांच्या प्रभागात या संबंधाने व्यापक जनजागृती करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. नगर सेवकांनी जनतेला दिलेली आश्वासने पाळावीत. नगर पंचायत च्या बैठकीत या संबंधाने मतदान झाल्यास कोणत्या नगर सेवकाने काय भूमिका घेतली हे नगरपंचायत प्रशासनाने जाहीर करावे असे आवाहन माकपने केले आहे.\

अकोले नगर परिषदेने पूर्वी अकोले शहर हद्दीतील राज्यमार्गाचा भाग नगर परिषदेकडे वर्ग करावा अशी विनंती करणारा ठराव करून तो सार्वजिक बांधकाम विभागाकडे पाठविला होता. रस्त्याची देखरेख योग्य रीत्त्या करता यावी यासाठी हा ठराव करण्यात आला होता. नगर परिषदेचा त्यावेळचा हेतू नक्कीच चांगला होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. रस्ता अशा प्रकारे नगर परिषदेकडे हस्तांतरित झाल्यास रस्त्याच्या या भागाचा राज्यमार्ग हा दर्जा संपुष्टात येणार आहे. याचा फायदा उठवीत बंद झालेली दारू दुकाने पुन्हा सुरु होणार आहेत. शहरात शांततेचे व विकासाचे वातावरण निर्माण करण्यास यामुळे पुन्हा अडथळा निर्माण होणार आहे. दारू मुक्त समाजाच्या बांधणीतही यामुळे मोठा अडथळा येणार आहे.  

LEAVE A REPLY

*