महापौर मॅडमही हतबल

0

ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी पैसेच नाही 

अहमदनगर (प्रतिनिधी)- ड्रेनेजच्या पाण्याने नगरकरांचा श्‍वास गुदमरला आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी येणार्‍या जिल्हावासियदेखील नाकातोंडाला रुमाला लावून गटारीच्या पाण्यातून वाट काढत आहेत, हे वास्तव चित्र बघितल्यानंतर नगर महापालिकेच्या महापौर सुरेखा कदम यांनी नवीन गटार टाकण्यासाठी निधीच नसल्याची कबुली देत हतबलता व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी झालेली ‘चोकअप’ झालेली गटार दुरूस्तीची सूचना प्रशासनाला करत त्यांनी वरवरची मलमपट्टी केली आहे.

नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील बुथ हॉस्पिटलसमोर ड्रेनेज लाईन ‘चोकअप’ झाली आहे. ड्रेनेचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. माध्यमांनी हे चित्र समोर आणल्यानंतर महापौर सुरेखा कदम यांनी या भागाची पाहणी केली. नगरसेवक नज्जू पहिलवान, वाहब कुरेशी, प्रभाग अधिकारी साबळे, अभियंता पारखे त्यांच्यासमवेत होते. जिल्हाधिकारी कार्यालय ते बुथ हॉस्पिटलची ड्रेनेज लाईन जुनाट झाली आहे. शिवाय तिची वहन क्षमता कमी असल्याने ‘घाण’ पूर्णपणे वाहून जाऊ शकत नाही. त्यामुळे ती वारंवार ‘चोकअप’ होते. जिल्हाधिकारी कार्यालय ते नगर-पुणे रस्ता ते कॅफे फरहत हॉटेल ते वीज वितरण कंपनीचे कार्यालयापर्यंत नव्याने ड्रेनेज लाईन टाकणे हाच त्यावर जालीम उपाय आहे. हे महापौर सुरेखा कदम यांनाही मान्य आहे. मात्र नव्याने ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी मोठा निधी लागणार आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता नव्याने ड्रेनेज लाईन टाकणे शक्य नसल्याने महापौर कदम हतबल झाल्या आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल. अनेक वर्षापासूनची ही समस्या सोडविण्यास वेळ लागणार आहे. मात्र तोपर्यंत ‘चोकअप’ झालेली ड्रेनेज लाईन सक्षण पंपाद्वारे साफ करण्यात यावी अशी सूचना महापौर कदम यांनी प्रशासनाला केली.

कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येणार्‍या जिल्हावासियांना नाकातोंडला रुमाल लावून गटारीच्या पाण्यातून वाट काढावी लागते. आम नागरिक ते मान्यवर जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. मान्यवर चारचाकी वाहनातून अंगावर शिंतोडा न उडता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचतात. मात्र आम जनतेला मैला तुडवित नाक बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचावे लागत आहे. जिल्ह्यातील हीच आम जनता अहमदनगर महापालिकेचा गावाकडे उध्दार करत असल्याचा विचारही महापालिका प्रशासन व पदाधिकार्‍यांच्या ध्यानी नाही हे नगरकरांचे दुर्देवच म्हणावे लागेल.

 नव्याने ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. निधी उपलब्ध करून ड्रेनेज लाईनचे काम करण्याचा प्रयत्न केला जाईल. अनेक वर्षापासून ही समस्या असून निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणात काम करण्यात येईल. – महापौर सुरेखा कदम.  

LEAVE A REPLY

*