महापौर, आमदारांसह, नगरसेवकांनी धरला शिवमिरवणुकीत ठेका

0

नाशिक, ता. १५  : शिवरायांच्या प्रतिमेची विधीवत पुजा करून जुन्या नाशकातून ढोल ताशांच्या गजरात शिवजयंतीची मिरवणूक सुरू झाली तेव्हा नाशिकच्या प्रथम नागरिक महापौर रंजना भानसी यांच्यासह आमदार व नगरसेवकांनीही नकळत नृत्याचा ठेका धरला आणि क्षणात सर्व वातावरण उत्साहात बदलले.

महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, माजी आमदार वसंत गिते यांच्यासह भाजपाच्या सर्व नगरसेविका व नगरसेवकांनी शिवजयंती मिरवणुकीत नृत्याचा ठेका धरला.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व नगरसेवकांचा उत्साह आजच्या मिरवणूकीत वाखाणण्यासारखा होता.

सायंकाळी साडेचारच्या सुमारास पारंपरिक पालखीतील शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांच्यासह पोलिस अधिकारीही उपस्थित होते.

या सर्वांना भगवे फेटे बांधण्यात आले होते.

पारंपरिक मैदानी खेळासह, शिवचरित्राचे जिवंत देखावे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. सायंकाळ वाढत गेली तसा शिवजयंतीचा उत्साहही वाढत गेला.

रात्री ९च्या सुमारास मिरवणूक महात्मा गांधी रस्त्यावर आली होती.

 

(सर्व छायाचित्रे : सतीश देवगिरे, देशदूत)

LEAVE A REPLY

*