नाशिक महानगरपालिका महापौरपदी रंजना भानसी तर गटनेतेपदी संभाजी मोरुस्कर

सभागृह नेतेपदासाठी कुलकर्णीं ? उर्वरित पदाचा निर्णय प्रदेश पातळवर

0

नाशिक | दि.४ प्रतिनिधी- सलग पाचव्यांदा विजयी झालेल्या रंजना भानसी यांचे नाव महापौर पदासाठी व सभागृह नेतेपदी सतीश नाना कुलकर्णी यांचे नाव वरिष्ठ पातळीवर निश्‍चित झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आज भाजप पदाधिकार्‍यांची बैठक होऊन यात महापालिकेतील भाजप गटनेतेपदी संभाजी मोरुस्कर यांची निवड करण्यात आली. इतर पदाधिकारी निवडीच्या नावांवर एकमत होत नसल्याने ही नावे प्रदेश कमिटीकडे पाठवण्यात आली.

सलग पाच पंचवार्षिक निवडून येण्याचा मान मिळवणार्‍या नगरसेविका रंजना भानसी यांची भाजपचा पहिला महापौर म्हणून निवड निश्‍चित मानली जात आहे. त्याचबरोबर भाजपकडून अगोदरपासून महापौर पदासाठी दावेदार मानले जाणारे ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांची संधी आरक्षणामुळे हुकली असली तरी त्यांना सभागृह नेतेपद दिले जाणार असल्याचे वृत्त आहे.

महापालिकेतील कारभारी म्हणून निवडल्या जाणार्‍या पदाधिकार्‍यांच्या निवडीसंदर्भात आज सलग दुसर्‍यांदा शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात भाजप गटनेतेपदी संभाजी मोरुस्कर यांच्या दुसर्‍यांदा निवडीवर एकमत झाल्यानंतर मोरुस्कर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर महापौर, सभागृह नेता, स्थायी सभापती याकरिता पदाधिकार्‍यांची नावे निश्‍चित केली, मात्र त्यावर आजही एकमत झाले नाही. त्यामुळे पदाधिकार्‍यांसाठी निश्‍चित केलेली नावे आता प्रदेश कमिटीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता पदाधिकार्‍यांची नावे ही प्रदेश पातळीवरून जाहीर केली जाणार आहेत.

भाजपने सर्वाधिक ६६ जागा जिंकत नाशिक महापालिकेवर झेंडा फडकावला आहे. अनेक वर्षे शिवसेनेसोबत युतीत असलेल्या भाजपने २०१२ च्या निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्यानंतर आता पुन्हा स्वबळाचा आणि शंभर प्लसचा नारा देत निवडणूक लढवली. यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने बहुमत मिळवले. यानंतर आता पहिला महापौर कोण? याकडे शहराचे लक्ष लागले आहे. महापौर हा शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांच्या मर्जीतील राहणार हे मानले जात आहे.

मात्र भाजपच्या एकनिष्ठ म्हणून काम करणार्‍या आणि सलग पाचव्यांदा निवडून आलेल्या रंजना भानसी यांचे नाव महापौर पदासाठी पुढे आले आहे. या नावास वरिष्ठ पातळीवरून अनुकूलता मिळाल्यास आ. सानप नाराज होणार नाही म्हणून वरिष्ठ पातळीवरून पाच वर्षांत चार महापौर देण्याचा फॉर्म्युला आणला गेला आहे. या फॉर्म्युल्यामुळे पहिल्या महापौरांसाठी रंजना भानसी यांच्या नावाला वरिष्ठ नेत्यांनी हिरवा कंदिल दिला असल्याची चर्चा शहरात आहे. तर आ. सानप यांची पहिली पसंती सुरेश खेताडे यांना असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पहिल्या अडीच वर्षांत आरक्षणानुसार महापौर पदासाठी भानसी व खेताडे ही नावे सध्या आघाडीवर आहेत. आता पक्षनेते भानसी की खेताडे यापैकी कोणाचे नाव निश्‍चित करतात याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

तसेच सलग चारवेळा निवडून आलेले भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर सतीश नाना कुलकर्णी यांना आरक्षणामुळे महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घ्यावी लागली. महापौरपद हे जर सर्वसाधारण गटासाठी असते तर कुलकर्णी हे महापौर झाले असते, असे भाजपचे पदाधिकारी बोलत आहेत. मात्र आरक्षणामुळे कुलकर्णी यांच्याकडे ज्येष्ठ म्हणून सभागृह नेतेपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे वृत्त आहे. पुढच्या अडीच वर्षांत कुलकर्णी यांना आरक्षणातून संधी मिळाली तर त्यांचे नाव महापौर पदासाठी निश्‍चित केले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. त्यामुळेच आता कुलकर्णी यांनी सभागृह नेतेपद घेण्यास सहभती दर्शवली असल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

*