महापौरपदी भानसी यांचे नाव आज होणार जाहीर

निवडीची केवळ औपचारिकता ; उपमहापौरपदी गिते निश्चित

0

नाशिक : नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत महापालिकेच्या इतिहासात प्रथम भाजपने एकहाती बहुमताने सत्ता घेतली आहे. शहरात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपकडून महापौरपदासाठी रंजना भानसी व उपमहापौरपदाकरिता प्रथमेश गिते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांची निवड निश्चित झाली आहे. आज (दि.14) होणारी महापौर निवडणूकप्रक्रिया औपचारिकता असून विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार महापौर व उपमहापौर निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

महापालिका निवडणुकीचे मतदान 21 फेब्रुवारी 2017 रोजी झाल्यानंतर 23 फेब्रुवारी 2017 मतमोजणी होऊन नाशिककरांनी भाजपच्या बाजुने कौल दिला आहे. सन 2012 च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत नाशिककरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सर्वाधिक 40 जागा दिल्याने महापालिकेवर झेंडा फडकला होता. आता मात्र नाशिककरांनी भाजपला 66 जागा देऊन बहुमत दिले असून इतर कोणत्याच पक्षांच्या मदतीची भाजपला गरज राहिलेली नाही. सन 2012 रोजी निवडून आलेल्या पदाधिकारी व नगरसेवकांचा कार्यकाळ प्रत्यक्षात उद्या (दि.15 फेब्रुवारी) संपत आहे.

त्यामुळे आज (दि.14) विभागीय आयुक्तांनी महापौर निवडणूकप्रक्रिया जाहीर केली आहे. याकरिता आज होणार्‍या विशेष महासभेच्या पिठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या विशेष महासभेस उद्या सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होणार आहे. या महापौर निवडणूक प्रक्रियेत भाजपकडून महापौरपदाकरिता रंजना भानसी यांचा आणि काँग्रेस पक्षाकडून आशा तडवी यांचा अर्ज गेल्या 9 मार्च रोजी दाखल झाला असून या सभेत या अर्जाची छाननी होऊन अर्ज वैध ठरल्याचे जाहीर केले जाईल.

त्यानंतर उमेदवारी अर्ज माघारीकरिता उमेदवारांना सुमारे 15 किंवा 30 मिनिटांचा वेळ दिला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर अंतिम उमेदवारांची नावे जाहीर केले जाईल. नंतर प्रत्यक्ष निवडणुकीला प्रारंभ होऊन एका उमेदवाराचे नाव जाहीर करुन त्यांच्या समर्थनार्थ हात उंचावून मतदान करण्यास पिठासन अधिकार्‍यांकडून सांगितलेे जाईल. यानुसार हात उंचावणार्‍या नगरसेवकांच्या मतांची मोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

त्यानंतर दुसर्‍या उमेदवाराकरिता हीच प्रक्रिया राबवून त्यांना मिळणार्‍या मतांची मोजणी केली जाईल. त्यानंतर सर्वाधिक मते पडलेल्या उमेदवाराला महापौरपदी निवड झाल्याचे पिठासन अधिकारी जाहीर करतील. त्यानंतर पिठासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महापौर निवडणूक प्रक्रियेप्रमाणेच उपमहापौर निवडणूकप्रक्रिया लगेच सुरू होईल. याठिकाणीही उमेदवारी अर्ज दाखल असलेल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ हात उंंचावून मतांची मोजणी केली जाईल. त्यानंतर सर्वाधिक मत पडलेल्या उमेदवारांची उपमहापौरपदी निवड झाल्याचे जाहीर केले जाणार आहे.

अशाप्रकारे महापौरपदाची प्रक्रिया विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर नवनिर्वाचित महापौर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी सदस्य निवड होईल किंवा नवनिर्वाचित महापौर स्थायी सदस्य निवडीसाठी पुढील विशेष महासभेची तारीख जाहीर करुन या दिवशी स्थायी सदस्य निवडणूक घेतील अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*