महापौरपदाचा पत्ता ऐनवेळी उघडणार?

0

नाशिक : महापालिका निवडणुकीत उमेदवारी जाहीर करताना गटबाजीचा धोका टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांना थेट एबी फॉर्मचे वितरण करण्यात आले. हाच फॉर्म्युला आता महापौरपदाच्या निवडणुकीत वापरून अंतिम क्षणी महापौरपदाचे नाव जाहीर करण्याची खेळी भाजपकडून खेळली जाऊ शकते.

यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रथमच एखाद्या पक्षाला बहुमत प्राप्त झाले. भाजपने 66 जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे यंदा बहुमतासाठी कोणत्याही पक्षाची मदत घ्यावी लागणार नाही. भाजपने बहुमत प्राप्त केले असले तरी महापौरपदासह विविध पदांसाठी भाजपांतर्गत स्पर्धा सुरू झाली आहे.

नाशिक महापालिकेचे यंदाचे महापौरपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. याकरता भाजपच्या रंजना भानसी, सुरेश खेताडे, पुंडलिक खोडे, सरिता सोनवणे, रूपाली निकुळे या पाच जणांमधूनच एकाला संधी मिळणार आहे हे निश्चित. मात्र महापौर आपल्या गटाचाच हवा याकरता पक्षांतर्गत लॉबिंगही सुरू झाले आहे. महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने पंचवटीतील 24 पैकी 19 जागांवर विजय मिळवला आहे.

त्यामुळे यंदाही पंचवटीलाच महापौरपदाची संधी असल्याचे दिसून येत आहे. अर्थात ही चर्चा असली तरी ऐनवेळी पक्ष कोणाला संधी देईल हे सांगता येत नाही. रंजना भानसी यांनी महापौरपद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपकडून तब्बल पाचवेळा नगरसेविका होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.

सध्या पंचवटीत दोन पुरुष आणि दोन महिलांची नावे चर्चेत आहेत. सुरेश खेताडे हे तिसर्‍यांदा नगरसेवक झालेले आहेत. याअगोदर दोनदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकदा पोटनिवडणुकीत तर दुसर्‍यांदा त्रिसदस्यीय प्रभागरचनेत ते पुन्हा निवडून आले. पुंडलिक खोडे हे 1997 आणि 2002 मध्ये भाजपकडून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. 2017 मध्ये त्यांना पुन्हा भाजपची उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले.

प्रा. सरिता सोनवणे प्रथमच निवडून आलेल्या आहेत. त्याही महापौरपदासाठी इच्छुक आहेत. तर रूपाली निकुळे यांनीही निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे अनुभवी आणि पक्षातील जुने जाणते म्हणून भानसी आणि खोडे यांची नावे सध्या चर्चेत आहेत.

LEAVE A REPLY

*