महापालिकेविरुद्ध खासदारांसह आमदारांचाही संताप

0

जळगाव । दि.22 । प्रतिनिधी-शासनाच्या योजना राबवितांना महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन खासदार आणि आमदारांना विश्वासात घेत नसल्याच्या मुद्यावरून आज दिशा समितीच्या बैठकीत खा. ए.टी.पाटील व आ. राजुमामा भोळे यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

खासदारांसह आमदारांनी व्यक्त केलेल्या संतापामुळे जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर अक्षरश: निरूत्तर झाले.

दिशा समितीची बैठक खा. ए.टी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन भवनात पार पडली. यावेळी व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, जि.प. अध्यक्षा ना. उज्ज्वला पाटील, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, खा. रक्षा खडसे, महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, आदी उपस्थित होते.

दिशा समितीच्या सभेत अमृत योजनेचा विषय आल्यावर खा. ए.टी.पाटील यांनी केंद्र शासनाची ही योजना असुन ती राबवितांना खासदारांना विश्वासात घेतले जात नसल्याचे सभागृहात सांगितले.

प्रत्येक शासकीय योजना राबवितांना महापालिकेच्या सत्ताधार्‍यांकडुन आमदार आणि खासदारांना डावलले जाते असा आरोप करीत जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांना धारेवर धरले.

प्रत्यक्षात एक पत्र देऊन ही योजना बंद करू शकतो, पण शहराचे नुकसान होऊ नये म्हणुन आम्ही तसे करीत नसल्याचेही खा. ए.टी.पाटील यांनी सांगितले. अमृत योजनेबाबत किती बैठका झाल्या, सद्यस्थिती काय ? ही माहिती देण्याची जबाबदारी महापालिकेची नाही काय? असा सवालही खा. पाटील यांनी उपस्थित केला.

सुपारी घेऊन मंदीर पाडले – आ. भोळें


नहीच्या अधिकार्‍यांनी आणि महापालिका प्रशासनाने अजिंठा चौफुलीवरील मोटारसायकलच्या शोरूमला मोकळी जागा मिळावी म्हणुन 35 वर्षे जुने असलेले श्रीकृष्ण मंदीर सुपारी घेऊन पाडल्याचा खळबळजनक आरोप आ. राजूमामा भोळे यांनी केला. मंदीर पाडण्याआधी नोटीस देणे अनिवार्य असते. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जुने मंदीर पाडता येत नाही. असे असतांना पैसे घेऊन मंदीर पाडले गेले याला जबाबदार कोण असा सवाल प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांना केला.

ग्रीन झोनच्या नावाखाली भ्रष्टाचार
शहरातील मोहाडी परीसराकडेच ग्रीन झोन करण्याचा घाट घातला जात आहे. त्या परीसरात धनदांडग्यांच्या मालमत्ता असुन त्यांना भाव येण्यासाठीच प्रशासन त्याठिकाणी विकास करीत असल्याचा गंभीर आरोपही आ. राजुमामा भोळे यांनी केला. शहरात इतरही ठिकाणे आहेत मग त्याठिकाणी ग्रीन झोन का नाही केले जात ? असा प्रश्न उपस्थित करून जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त निंबाळकर यांना आरोपीच्या पिंजर्‍यातच उभे केले. शहरातील विकासकामांच्या उद्घाटनासाठी आमदारांना विचारणे क्रमप्राप्त असतांना राजकीय द्वेषापोटी विचारले जात नाही, यावर आपण काय कारवाई कराल अशी मागणीही आ. भोळे यांनी केली.

समांतर रस्ते महापालिकेचीच जबाबदारी
महामार्गावरील साईडपट्ट्यांचे काम अत्यंत निकृष्ट झाले असल्याचा आरोप आ. राजुमामा भोळे यांनी केला. तसेच महामार्गालगत समांतर रस्ते नसल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. समांतर रस्ते करण्याची जबाबदारी कुणाची असा प्रश्न आ. भोळेंनी उपस्थित केला. यावर महामार्गाचे अधिकारी गंडी यांनी समांतर रस्त्याबाबत महापालिकेने न्यायालयात शपथपत्र करून दिले असुन त्याचे काम करण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगितले.

संबंधीतांवर कारवाई करणार – निंबाळकर


शासनाच्या योजना राबवितांना महापालिकेकडुन आमदार आणि खासदार यांना डावलले गेले असल्यास त्याची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी सभागृहात दिली.

आमदार, खासदारांना डावलल्यास हक्कभंग – आ. खडसे


शासनाच्या योजना राबवितांना स्थानिक आमदार आणि खासदार यांना विश्वासात घेऊन त्याठिकाणी निमंत्रीत करण्याबाबत राज्य शासनाचा शासन निर्णय आहे. लोकप्रतिनीधींचा सन्मान राखला न गेल्यास आणि त्यांना डावलल्यास तो हक्कभंग ठरू शकतो अशी जाणीव माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांना करून दिली. तसेच अमृत योजनेत मी मंत्री असतांना कुठलेही राजकारण न करता जळगावचा समावेश करून घेतला. खा. ए.टी.पाटील आणि खा. रक्षा खडसे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करून ही योजना मंजुर करून घेतली. मात्र अशा रीतीने जर त्यांना डावलले जात असेल तर याविषयी जिल्हाधिकार्‍यांनी दखल घेतली पाहीजे असे सांगत आ. खडसे यांनीही नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*