मरता, क्या ना करता… या विवंचनेतील सामान्य रुग्ण आणि कट प्रॅक्टीस !

0

गेल्या महिनाभरापासून माझ्या 14 वर्षीय मुलाला लघुशंका करतांना कमालीचा त्रास होता, अनेक चाचण्या केल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानंतर त्याचे ‘फायमॉसिस’चे ऑपरेशन करावे लागले. त्यानंतरही काही प्रमाणात त्याचा त्रास सुरूच होता.
मग मी त्याला युरोलॉजिस्ट तज्ञ डॉक्टरांकडे घेवून गेलो. त्यांनी ‘युरीन कल्चर’ टेस्ट करून घ्या म्हणून एका पॅथॉलॉजीचा रस्ता दाखविला. त्यांनी सुचविलेल्या लॅब मध्ये जावून टेस्ट करवून घेतली. रिपोर्ट आल्यानंतर टेस्टसाठीचे 900 रूपये देवून पुन्हा डॉक्टरांकडे आलो. त्यानुसार औषधोपचार घडले. मात्र ‘गुण’ काही आला नाही, अखेर जळगावातीलच एका डॉक्टर मित्राची मला आठवण झाली. आणि त्याला फोन केला. तो म्हणाला ‘काळजी करू नको, माझ्याकडे घेऊन ये… प्राब्लेम सॉल्व्ह होईल!’ मी सकाळीच त्याच्या घरी पोचलो, त्याला सर्व रिपोर्ट व उपचाराच्या औषधी दाखविल्या… थोडा विचार करून म्हणाला, ‘काळजी नसावी, प्रकरण फार गंभीर नाही, तु पुन्हा त्याची ‘युरीन कल्चर’ टेस्ट करून घे!’ मी म्हणालो, ‘अरे आत्ता मागील आठवड्यात तर केली ना, आणखी परत कशाला?… ‘मी सांगतो तस कर…!’ एवढ बोलून त्याने पॅथॉलॉजिस्टला फोन लावला. आणि त्यांच संभाषण ऐर्कूैन मी तीन-ताड उडालोच!

डॉक्टर मित्र : अरे एक कंटेनर (मुत्र नमुना गोळा करण्यासाठीची छोटी काचाची बाटली) घेऊन ये, म्हणजे कुणाला तरी पाठव… युरीन कल्चर करायचय,.. मला माहितीय, सॅम्पल मुंबईला पाठवायचय… आणि हो पैसे किती घेशील?… माझ कमीशन सोड रे, तुला नेमके किती लागतात ते सांग… माझा जवळचा मित्र आहे… नाही, तसं नको करू, तुला किती पेड करावे लागतील… ओके 320 रूपये ना… मग तेवढेच घेशील, अरे, माझा जिगरी यार आहे तो… त्याच्या मुलाचा प्राब्लेम झालाय आणि हो, सॅम्पलविषयी लॅब असिस्टंटशी बोलून घे, अ‍ॅक्युरसी हवी… मी पाठवतो, त्याला, ओके, बाय…!

…माझ्या डॉक्टर मित्राच्या वरील संभाषणातून दोन गोष्टी ऐरणीवर आल्या. एक म्हणजे मागील आठवड्यात ज्या युरीन कल्चर टेस्टसाठी मी 900 रूपये मोजले होते. त्याच टेस्टसाठी आज फक्त 320 रूपये मला मोजावे लागणार होते… आणि दुसरा विषय म्हणजे आधीचा टेस्ट रिपोर्ट माझ्या डॉक्टर मित्राला विश्वासार्ह वाटला नाही. म्हणून दुसरी टेस्ट करण्यास सांगीतले. आणि पॅथॉलॉजिस्टला मुंबईच्या पॅथॉलॉजीशी बोलायला सांगून ‘अ‍ॅक्यूूरसी’ म्हणजे तंतोतंतपणा आला पाहिजे, हा दिलेला निर्देश! म्हणजे यातून दोन प्रश्न निर्मिण झाले. एक तर डॉक्टर आणि पॅथॉलॉजीस्ट यांचे साटे-लोटे असतेच, आणि पॅथॉलॉजीस्टच्या विश्वासार्हतेचा प्रश्न! याशिवाय डॉक्टरांचे निदान आणि त्या अनुषंगाने त्यांच्याच मेडीकल स्टोअर्समधून भरमसाठ किंमतीतून रूग्णांची होणारी लूट तथा अनावश्यक आवश्यक चाचण्यांच्या फैरी… हा विषय आणखी वेगळा! नंतर मी काही डॉक्टर्स आणि पॅथॉलॉजीस्ट यांना युरीन कल्चरच्या एकुण शुल्काबाबत चौकशी केली तर वेगवेगळ्या किंमती ऐकायला मिळाल्या, साधारणत: 900 ते 1200 रूपयांच्या दरम्यान खर्च सांगितला गेला. ज्या टेस्टसाठी मुळात 320 रूपये लगतात, त्यासाठी सॅम्पल कलेक्ट करणार्‍या पॅथॉलॉजीस्टने समजा 180 रूपये शुल्क आकारले आणि डॉक्टरांचे कमिशन म्हणून जरी 100 रूपये घेतले तरी यासाठी जास्तीत जास्त 600 रूपये खर्च समजू शकतो, पण याच टेस्टसाठी तब्बल 900 ते 1200 रूपये घेऊन रूग्णांच्या खिशावर दरोडे टाक्ण्याच्या या ‘कट प्रॅक्टीस’ला म्हणावे तरी काय…? म्हणजे डॉक्टर्स आणि पॅथॉलॉजिस्टच्या टक्केवारीत सामान्य रूग्णांची अवस्था म्हणजे…

तुम्हारे बाद गुजरेंगे भला,
कैसे हमारे दिन
नवम्बर से बचेंगे,
तो दिसम्बर मार डालेगा…

अशी झाल्याशिवाय राहात नाही. आता माझा जवळचा मित्र डॉक्टर असल्याने हा गोरखधंदा मला जवळून अनुभवता आला व हा मुद्दा ‘चावडी’वर घेण्याचा इरादा पक्का केला.

कट प्रॅक्टीस म्हणजे काय?
कट प्रॅक्टीस हा शब्द अनेकदा कानावर आला. तुमच्याही आला असेल आणि तुम्ही -आपण सर्वच केव्हाना केव्हा या कट प्रॅक्टीसचे बळी ठरलो आहोतच. पण ‘मरता क्या ना करता’ या उक्तीप्रमाणे सहन केल्याशिवाय पर्याय नाही. कारण पैसा गेला तरी, बेहत्तर पण आराम मिळाला पाहिजे, हीच रूग्णांची भावना असते. पण जेम-तेम मोलमजुरी करणार्‍यांचे, गरिबांचे काय हाल पडत असतील, याविषयी विचार करताच मन हेलावून जाते. असो…! तर भारतात ‘कट प्रॅक्टीस’ या शब्द कधी रूजला, त्यालाही एक इतिहास आहे. चेन्नईतील एक पंचतारांकीत रूग्णालयाने आपल्या रूग्णालयाच्या दर्शनी भागात ‘नो कट प्रॅक्टीस’ असा फलक लावला होता. त्यानंतर वैद्यकीय वर्तुळात कट प्रॅक्टीस करण्याबाबत चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रातील महाड येथील डॉक्टर हिंमतराव बाविस्कर यांनी कट प्रॅक्टीस विरोधात कायदा करण्यासाठी जीवाचे रान केले. त्यानंतर राज्य सरकारने कट प्रॅक्टीसविरोधात कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी एका समितीची स्थापना केली. व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांनीही लक्ष दिल्याने कट प्रॅक्टीस विरूध्द कायद्याचा मसुदा तयार झाला. पण तरीही हा कायदा अद्याप अंमलात आला नसल्याने या कायद्यामुळे फारसा फरक पडला नसल्याचे चित्र आहे. व या कायद्याच्या मसुद्यावर आक्षेपही नोंदविले गेले आहेत. कारण अनेक डॉक्टर आपल्याकडे आलेल्या रूग्णाला पुढील उपचारासाठी शस्त्रक्रिया किंवा चाचणी करण्यासाठी दुसर्‍या डॉक्टरकडे उपचारासाठी – टेस्ट करण्यासाठी पाठवितात व त्या मोबदल्यात संबंधीत डॉक्टरकडून कमिशनच्या स्वरूपात पैसे घेतात. किंवा रूग्णांना ठरावीत कंपन्यांचीच औषधे घेण्याचा आग्रह धरतात व त्याबदल्यात औषध कंपन्यांकडून परदेश दौरे व महागड्या भेट वस्तू मिळवतात… हा सारा प्रकार म्हणजे कट प्रॅक्टीस होय!

प्रामाणिक डॉक्टरही भरडले जाताय!
वैद्यकीय व्यवसायात कट प्रॅक्टीस करणार्‍या डॉक्टरांमुळे या क्षेत्रावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम होत आहे. त्यात प्रामाणिकपणे रूग्णसेवा देणार्‍या डॉक्टरांचीही प्रतिमा मलीन होत आहे.

रूग्ण किंवा ज्या रूग्णांचे नातेवाईक कसे नागवले जातात, त्याचीही एक कडी असते. यामध्ये पॅथोलॉजी लॅब, एक्स-रे-क्लीनीक, मेडीकल सेंटर, एम.आर.आय., रक्त चाचण्या, सीटी स्कॅन आणि खालच्या डॉक्टरांकडून वरच्या डॉक्टरांकडे रवाना केलेला पेशंट… या सगळ्या प्रक्रियेत रूग्णांच्या खिशाला भगदाड पाडले जाते. एकंदरीत वैद्यकीय क्षेत्रातील वातावरण बघता आणखी एक ‘शेर’ आठवला, म्हणून ईर्षाद…

ऐसे माहौल में,
दवा क्या है, दुआ क्या है।
जहाँ कातिल ही खुद पुछे,
की हुआ क्या है ।

… आता उपचार करणार्‍याच डॉक्टर साहेबांना कातिल म्हटल म्हणून काहींचा आक्षेप येईलच, पण ज्यांचा येईल, ते कट प्रॅक्टीसचेच बच्चे असतील, यात शंका नाही. पण अजुनही या क्षेत्रात मोजण्याइतके प्रामाणिक डॉक्टर कार्यरत असल्यामुळे जरा वातावरण हायसं आहे.
काही उपाशी… काही जास्त तुपाशी

आज काल पैशांचा मोह सार्‍यांनाच आहे. गाडी-बंगला-आराम-सुविधा प्रत्येकालाच हव्या आहेत. त्यासाठी सार्‍याच क्षेत्रातील घटकांची धडपड सुरू असते. तशीच धडपड वैद्यकीय क्षेत्रातही सुरू झालेली आहे. त्यामुळे हॉस्पीटल बांधण्यासाठी आलेला कोट्यवधी रूपयांचा खर्च आणि भौतिक सुविधा मिळविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातही अनैतिकता निर्माण झाली आहे यात शंका नाही. मात्र काही डॉक्टर्स अजूनही या कट प्रॅक्टीसच्या भानगडीत पडत नाहीत. पोटापुरता जेम-तेम पैसा कमावतात आणि समाधानी असतात. ते आर्थिक दृष्ट्या साधारण असतील मात्र मानसिक दृष्ट्या कमालीचे समाधानी असतात. हे वेगळे सांगायला नको, कमिशनगिरीच्या धबडग्यात असले प्रामाणिक अवलीया बघीतले की वेदनादायी मनावर फुंकर पडते.

बोदवड शहरातील डॉ.उध्दवराव पाटील या डॉक्टरांविषयी कमालीचा आदर आहे. राजकारण व समाजकारणाचे अंग असल्याने डॉक्टर व्यस्त असतातच, पण सर्वच रूग्णांना ते करीत असलेले मार्गदर्शन आणि गरीब रूग्णांना देत असलेला मदतीचा हात, त्यांच्या पुण्याईत भर घालतोय, गेल्या 30-35 वर्षापासून वैद्यकीय सेवा करणार्‍या या डॉक्टरांकडे स्वत:च्या मालकीची क्लीनीक खोली सुध्दा नाही, वाड-वडिलांच्या जुन्या घरात वास्तव्य आहे.

अजूनही मोटारसायकलवरच फिरतात, भाडेतत्वावरील जागेत क्लीनिक चालवितात… प्रत्येक शहरात असेही चांगले डॉक्टर्स आहे… अशा सार्‍यांनाच सलाम… मात्र ‘नाठाळांच्या माथी काठी’ हाणण्यासाठीही आजचा लेखनप्रपंच!

पुरुषोत्तम गड्डम

भ्रमणध्वनी – 9545465455

LEAVE A REPLY

*