मरण टांगणीला

0

350 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; मनपा शाळेची साठोत्तराची कहाणी

संदीप रोडे 
अहमदनगर (प्रतिनिधी)- पावसाचे पाणी स्लॅबमध्ये मुरल्याने ओलावा लागलेले छत.. भिंतीही जीर्ण झाल्याने निघालेले पोपडे.. इमारतीचे वय वर्षे साठ… ही साठोत्तराची कहाणी कोणत्या गोष्टीतील नाही तर हे वास्तव चित्र आहे महापालिकेच्या रेल्वेस्टेशन रस्त्यावरील चार नंबर शाळेचे. निंबोडीच्या घटनेची येथे केव्हाही पुनरावृत्ती होण्याची भीती. कर्मचार्‍यांच्या पगाराला महाग असलेली महापालिका नवी इमारत बांधेल तेंव्हा बांधेल परंतु साठी उलटलेल्या धोकादायक इमारतीचे मरण डोक्यावर घेऊन जवळपास तीनशे मुले ज्ञानाचे धडे गिरवित आहेत. जीवघेणी ठरू पाहणार्‍या या इमारतीकडे ना राजकारण्याचे ना प्रशासनाचे लक्ष!

नगर शहरात महापालिकेच्या 12 ठिकाणी शाळा आहेत. या शाळेतून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आर्थिक चिंतेने ग्रासलेली गरीबा घरची मुलेच महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. स्टेशन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक, माध्यमिक शाळा आहे. या शाळेत 14 वर्ग खोल्या आहेत. त्यातील 9 खोल्यांचे बांधकाम 1960 साली झाले आहे. तत्कालीन नगरपालिकेने त्याचे बांधकाम केले. 2005 साली सर्व शिक्षा अभियानातून महापालिकेने नव्याने पाच खोल्या बांधल्या आहेत.

गळके छत, स्वच्छतेसाठी कर्मचारी नाहीत, लाईट फिटींगही धोकादायक झालेली, रंगरंगोटी तर फक्त नावालाच अशा परिस्थिीतील या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत 236 तर आठवी ते दहावापर्यंत 120 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इमारतीचे आयुष्यमान मोजले तर ते केव्हाच संपले आहे. मात्र तरीही याच जीर्ण झालेल्या इमारतीमधून मुले शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. शिक्षकांनी पगारातून वर्गणी जमा करून काही वर्गखोल्यांना रंगरंगोटी केली आहे.
…………..
महापालिकेकडून शाळा दुरूस्तीसाठी निधी मिळावा अशी मागणी शिक्षण मंडळाने केली आहे. मात्र शिक्षण मंडळाची ही मागणी नेहमीसारखी फाईलबंद झाली आहे. शिक्षकांनीही निधी मागणे सोडून दिले आहे.
…………

स्ट्रक्चरल ऑडिटची गरजच नाय?
कोणत्याही इमारतीचे आयुष्यमान हे जास्तीजास्त 25 वर्षापर्यंत असते. त्यापेक्षा जास्त वर्षाची इमारत ही धोकादायक असल्याचे सांगण्याला अभियंत्यांची गरजच नाही. महापालिकेच्या शाळेची ही इमारत आता साठीच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पॅनलवरील अभियंत्यांनी त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशीही परिस्थिती नाही. इमारतीचे आयुष्यमान केव्हाच संपले आहे.

LEAVE A REPLY

*