Type to search

ब्लॉग

ममतांची वाट खडतरच!

Share

भाजपने पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत शानदार कामगिरी केल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे आगामी वाटचालीचा मार्ग ठरवणे ममतांसाठी अवघड झाले आहे.

पश्चिम बंगालमध्ये शिरकाव करण्यासाठी आणि आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करणार्‍या भारतीय जनता पक्षाने अखेर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या गडाला सुरूंग लावला. 2014 मध्ये केवळ 17 टक्के मते आणि अवघ्या दोन जागा जिंकणार्‍या भाजपने यावेळी बंगालमधील 18 जागांवर विजय संपादन केला. भाजपच्या मतांची टक्केवारी वाढल्याचे दिसत असून ममतांच्या विरोधात आक्रमकपणे लढणार्‍या भाजपने मोठा जनाधार मिळवला आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपला राज्यात 40.25 टक्के मते मिळाली. तृणमूल काँग्रेसच्या मतांची टक्केवारी अवघ्या 3 टक्क्यांनी अधिक म्हणजे 43.28 इतकी आहे. पुरुलिया, झरग्राम, दार्जिलिंग, जलपायगुडी आणि अलिपूरद्वार, बांकुरा अशा भागात पक्षाला व्यापक पाठिंबा मिळाला.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला पर्याय म्हणून भाजपला उभे करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी भरपूर मेहनत घेतली. त्याचे फळ भाजपला मिळाले. पश्चिम बंगालमधील जनमताचा कल भाजपकडे झुकलेला पाहून ममता बॅनर्जींना चिंता वाटू लागली आहे. रोजगारांची कमतरता आणि गरिबीशी झुंजणार्‍या बंगाली नागरिकांना भाजपने असे आश्वासन दिले की, सत्तेवर आल्यास ‘एनआरसी’ लागू केला जाईल आणि अवैधरीत्या घुसखोरी करणार्‍या सर्व परदेशी नागरिकांना देशाबाहेर हाकलून दिले जाईल. पश्चिम बंगालमधील जनतेने भाजपच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून पक्षाला भरभरून मतदान केले. ममता बॅनर्जींनी मात्र बंगालमध्ये ‘एनआरसी’ लागू करण्यास कठोर विरोध दर्शवला आहे. ‘एनआरसी’ आपण राज्यात कधीच लागू होऊ देणार नाही, अशी गर्जना त्यांनी केली आहे. ममतांच्या या पवित्र्यानंतर भाजपने असा आरोप केला होता की, बांगलादेशातून अवैधरीत्या घुसखोरी करणार्‍यांनी कोलकात्यात आणि बंगालमध्ये कायस्वरुपी तळ ठोकण्यास ममतांचा काहीच आक्षेप नाही, उलट पाठिंबाच आहे. या प्रचाराचा भाजपला भरपूर फायदा झाला आणि सत्तेच्या रिंंगणातसुद्धा आज भाजप तृणमूल काँग्रेसला प्रखर टक्कर देताना दिसत आहे.

रामनवमीची शोभायात्रा असो वा मूर्ती विसर्जनाचा मुद्दा असो, ममतांच्या हटवादीपणाला भाजपने उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्यामुळे ममतांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. भाजपने तेथील बहुसंख्य हिंदूंच्या मनात अशी धारणा निर्माण करण्यात यश मिळवले की ममता बॅनर्जी पक्षपातीपणे निर्णय घेत असून एका वर्गाला विशेष सवलती बहाल केल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीतील निकालात भाजपकडे लोकांचा ओढा दिसून आल्यानंतर आता 2021 मध्ये राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुका ममतांचा कस पाहणार्‍या ठरणार आहेत. कारण मामला आता थेट ममतांच्या राजकीय अस्तित्वाचा असणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळणारा पाठिंबा वाढत असल्याचे पाहून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आता इतका आत्मविश्वास संचारला आहे की, ममतांची उलटगणती सुरू झाल्याचे कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी म्हटले आहे की, तृणमूल काँग्रेसची उलटगणती सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये 34 वर्षे सत्तेत राहिलेले डाव्यांचे सरकार उलथवून ममता बॅनर्जी यांनी 2011 च्या विधानसभा निवडणुकीत 294 पैकी 184 जागा जिंकल्या होत्या. आता डाव्यांची शक्ती खूपच क्षीण झाली असली तरी 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मोठे आव्हान ममतांसमोर असेल आणि आपला गड वाचवण्याबरोबरच अस्तित्वाची लढाई त्यांना करावी लागेल. केंद्रात पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यामुळे नरेंद्र मोदी यांची ताकद आणखी वाढली असून ममता बॅनर्जी यांची शक्ती क्षीण झाल्यामुळे त्यांच्या मोदीविरोधाची धारही आता कमी होईल. आता दोन्ही पक्षांमधील संघर्ष आणखी वाढेल आणि राज्यात राजकीय हिंसाचार वाढेल, अशी भीतीही काहीजण व्यक्त करीत आहेत.

अशा स्थितीत भविष्यातील राजकारणात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मोदी विरोध सोडून भाजपसमोर शरणागती पत्करणे आणि पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष बनणे हा एक मार्ग ममता बॅनर्जींपुढे असू शकतो. हा मार्ग बिहारमध्ये नितीशकुमारांनी अवलंबला आहे आणि लोकसभा निवडणुकीत त्यांना त्याचा फायदाही मिळाला आहे. याउलट राज्यात काँग्रेसशी हातमिळवणी करून भाजपविरुद्ध आणखी तिखट धोरण अवलंबण्याचा दुसरा मार्ग ममतांसमोर असू शकतो. काँग्रेसच्या जोडीने आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये त्या पूर्ण ताकदीनिशी उतरू शकतात. राज्यात जवळजवळ संपुष्टात आलेले डावे पक्षही अशा आरपारच्या लढाईत भाजपविरोधात ममतांना साथ देऊ शकतील.

लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतरच्या परिस्थितीची तुलना केल्यास ममतांपुढील आव्हाने आणि अडचणी वाढणार, हे निश्चित आहे. संपूर्ण देशभरात विरोधी पक्ष हताश आहेत आणि भाजप उत्साहात आहे. अशावेळी ममतांना पुढील मार्ग ठरवणे आणि त्यासाठी योग्य निर्णय घेणे अवघड जाणार आहे.
– सरोजिनी घोष, कोलकाता

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!