मन्याळ्यातील शेतकरी सातव्या दिवशी विहिरीबाहेर

0

सहकारमंत्र्यासोबत
बैठकीचे आश्वासन

कोतूळ (वार्ताहर) – अकोले तालुक्यातील मन्याळे येथे विषाची बाटली सोबत घेऊन कर्जमाफीसाठी विहिरीत उपोषणाला बसलेल्या भैरवनाथ जाधव या शेतकर्‍याने अखेर सातव्या दिवशी उपोषण सोडले. मंगळवार दि. 16 मे रोजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या समवेत पतसंस्था पदाधिकार्‍यांची बैठक घेण्याचे आश्वासन यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिल्यानंतर जाधव यांनी उपोषण मागे घेतले. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी काल सायंकाळी 5.30 वाजता मन्याळे येथे उपोषणस्थळी भेट दिली.
गेल्या सहा दिवसांपासून उपोषणावर तोडगा निघत नव्हता. त्यामुळे प्रशासन कोंडीत सापडले होते. जाधव यांनी काल (दि. 12) निर्णय न झाल्यास कोरड्या विहिरीत विषा घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.
खासदार सदाशिव लोखंडे यांनी विहिरीच्या काठावरून जाधव यांच्याशी चर्चा केली व उपोषण मागे घेण्यास सांगितले. यावेळी उपोषणार्थीने आपली भूमिका मांडली. नंतर खा. लोखंडे यांनी तहसीलदार व यशोमंदिर पतसंस्थेच्या पदाधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यातून मार्ग काढण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याबरोबर मुंबई येथे मंगळवारी संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जाधव यांची पत्नी व दोन्ही मुलाशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. ते विहिरीच्या बाहेर आले. जाधव यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परभणी येथून आलेल्या दत्ता रेगे या तरुणाला व जाधव यांना खासदार लोखंडे यांच्या हस्ते लिंबू पाणी देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, उपसभापती मारुती मेंगाळ, युवा नेते सतीश भांगरे, प्रदीप हासे, महेश नवले, भाऊसाहेब वाकचौरे, नगरसेवक प्रदीप मंडलिक, बोरीचे सरपंच संजय साबळे, सखाराम लांडे, अमित कुर्‍हाडे, रावसाहेब खतोडे, रोहिदास धुमाळ, अंजनाबाई जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
तहसीलदार मनोज देशमुख, पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके, सहायक निबंधक ए. आर. गायकवाड हे तळ ठोकून होते. तालुका वैद्यकीय अधिकारी इंद्रजीत गंभिरे यांच्या पथकाने आज जाधव यांची आरोग्य तपासणी केली होती. काल दिवसभरात उपोषणार्थीला भेट देणार्‍यांची संख्या जास्त होती. आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनीही उपोषणस्थळी भेट दिली होती, काल जिल्हा परिषद सदस्य किरण डॉ. किरण लहामटे, रमेश देशमुख, युवा नेते सतीश भांगरे, भाजपा जिल्हा सरसरचिटणीस जालिंदर वाकचौरे, शेतकरी नेते दशरथ सावंत, भूमिपुत्र संघटनेचे कार्यकर्ते, दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनीही भेट दिली.

LEAVE A REPLY

*