मनोली परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

0

8 घरे फोडून सुमारे  2 लाखाचा ऐवज लांबविला

 

आश्‍वी बुद्रूक (वार्ताहर)ः – संगमनेर तालुक्यातील मनोली येथे गुरुवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत आठ घरात चोरी करून सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 
वातावरणात वाढलेल्या तापमानामुळे ग्रामीण भागात नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर अंगणात झोपत असतात. हीच संधी चोरट्यांनी साधून मनोली येथे गुरुवारी रात्री एक वाजण्याचा सुमारास काशिनाथ यशवंत पाचोरे हे घराबाहेरील ओट्यावर झोपलेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात उचकापाचक करत पेटी व सुटकेस घराबाहेर नेली. त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 55 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. त्यानंतर चोरट्यांनी साईनाथ पाचोरे यांच्या घराकडे मोर्चा वळविला0.

 

पाचोर्‍यांच्या घरी चोरी करून दोन वाजेच्या प्रमोद गोविंद पराड यांचा घरात प्रवेश करून त्यांच्या व मुलाच्या तोंडावर औषधाचा फवारा मारुन शौचालय बांधण्यासाठी दुध डेअरीतून उचल घेतलेले 7 हजार व मुलाच्या पाकीटातील एक हजार असे 8 हजार रुपये चोरून नेले. त्यानंतर पहाटे 3 वाजेच्या सुमारास अनिल वर्पे यांच्या घरात घुसून कपड्यात ठेवलेले 5 हजार चोरून निघत असतांना चोरट्यांनी त्यांचा त्याच घरातील आणखी एका रुमचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र आवाज झाल्याने वर्पे यांना जाग आली. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पोबारा केला.

 

त्याच परिसरातील कैलास पराड यांच्या घरातील कपाट फोडून चोरट्यांनी आठ हजार रुपये तर भाउसाहेब नळे यांच्या घरातील दोन मोबाईल चोरून नेले. यानंतर बाळासाहेब गडाख यांच्या घरी पहाटे चार वाजण्याचा सुमारास घरात घुसून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. मनोली गावामध्ये सुमारे चार तास चोरट्यांचा धुमाकुळ सुरु होता. याबाबत काशिनाथ पाचोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आश्‍वी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश कमाले, पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ बर्वे, कैलास ठोबरे हे करत आहे.

LEAVE A REPLY

*