Type to search

अग्रलेख संपादकीय

मनाविरुद्धचा माफीनामा!

Share

विचारांची हत्या करणार्‍या समाजविघातक शक्तींचे एकेक कारनामे पुरोगामी महाराष्ट्रात उघडकीस येत आहेत. अशावेळी रामाचे नाव धारण करणार्‍या सत्ताधारी भाजप आमदाराचे ‘कदम’ बेफामपणाकडून बेतालपणाकडे सरसावले आहेत. दहीहंडी कार्यक्रमात गोविंदा पथके थरावर थर रचत होती.

त्याचवेळी भाजपच्या ‘रामा’ने मात्र अत्यंत खालचा थर गाठला. महाराष्ट्रातील लेकीबाळींना घरातून पळवण्याची जाहीरपणे धमकी दिली. त्यामुळे अवघा महाराष्ट्र पेटून उठला आहे. चहुबाजूंनी निषेधाचा सूर उमटला. सलग तीन दिवस सर्वत्र निषेध होत आहे; पण भाजप आघाडीने अळीमिळी गुपचिळी धोरण स्वीकारले आहे. तिसर्‍या दिवशी उपचार म्हणून राम कदमांनी ‘ट्विटर’वरून माफीनामा प्रसिद्ध केला आहे.

त्यात विरोधकांवर दुगाण्या झडण्यालाच माफी मानले आहे. निर्ढावलेपणाच्या निर्लज्ज भाषेचा ‘कदमी’ माफीनामा म्हणजे इरसाल नमुना आहे. वक्तव्याचा विपर्यास केल्याचा नेहमीसारखा आरोप विरोधकांवर करून चमडीबचाव धोरण अवलंबले आहे. माफीनाम्यात पश्चाताप वा खेदाचा लवलेशही नाही. कदाचित ‘वरिष्ठां’च्या दबावामुळे हा माफीनामा ‘ट्विटर’वर जाहीर केला असावा. मात्र स्वत:च्या तोंडाळपणाने उधळलेल्या मुक्ताफळांचा गाढवपणा मान्य करण्याची दानत कदमांच्या ‘रामा’कडेसुद्धा नसावी.

उलट आपल्या ‘निर्मळ’पणाचे कौतुक करणारा बेरकीपणा या निर्ढावलेल्या गणंगाने केला आहे. दबाव टाकणार्‍यांनी आतापर्यंत कदमी ‘रामा’च्या माकडचाळ्यांना अभय दिल्यानेच कदाचित त्याची हिंमत वाढली असावी. वाचाळवीरांची भाजपत रेलचेल आहे. हे वाचाळवीर पंतप्रधानांनाही जुमानत नाहीत. अशा उद्दाम नेत्यांचा बेतालपणा भाजपला भविष्यात कुठे नेणार? एखाद्या संवेदनशील घटनेवर सोयीस्कर ‘मौन’ धारण करण्याची कला भाजपच्या बहुतेक नेत्यांनी आत्मसात केली असावी.

गेल्या चार वर्षांत पक्षातील ‘रावण’ आणि ‘दानवां’ची पापे झाकण्याचेच काम भाजपला करावे लागले आहे. भाजपने ते कर्तव्य तितक्याच निर्ढावलेपणे बजावले आहे. ‘कदम कदम बढाए जा…’ हे देशभक्तीपर गीत यावेळी आठवते. ‘तेरी हिम्मत बढती रहे, खुदा तेरी सुनता रहे । जो सामने तेरे अडे, तो खाक में मिलाये जा ।’ अशाही ओळी त्या गीतात आहेत. कदाचित त्या ओळी आठवूनच कदमांचा ‘राम’ कर्दमात घसरला का?

निसरड्या रस्त्यावरची असली वाटचाल 2019 मध्ये भाजपचे ‘सत्तेचे कमळ’ फुलवण्याऐवजी गाळात घेऊन जाणार का? एकेकाळी अयोध्येच्या ‘रामनाम’ जपामुळे भाजपला सत्ता चाखवायला मिळाली. आता मात्र पक्षातील अनेक ‘राम’ रावणाचा अवतार धारण का करीत असावेत हेही एक गूढच आहे. मात्र माफीनामा पक्षप्रतिमा आणखीच काळवंडणारा आहे यात शंका नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!