मनपाचा ६२८ कोटीचा अर्थसंकल्प – ३४ कोटी ३० लाखाची वाढ ; स्थायी समितीच्या सभेत मंजूर

0

जळगाव |  प्रतिनिधी : सन २०१७-१८ या वित्तीय वर्षासाठी प्रशासनाने ५३३ कोटी ९४ लाखाचा अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, ३४ कोटी ३० लाखाची वाढ करुन ६२८ कोटी २४ लाखाचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला.

महापालिकेच्या अर्थसंकल्पासाठी सभापती डॉ.वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची विशेष सभा झाली. यावेळी व्यासपीठावर शहर अभियंता डी.आर.थोरात, प्रभारी नगरसचिव डी.आर.पाटील उपस्थित होते. मनपाच्या सन २०१६-१७ या वर्षाच्या सुधारीत व सन २०१७-१८ या वित्तीय वर्षासाठी आयुक्त जीवन सोनवणे यांनी दि.२० फेब्रुवारी रोजी ५९३ कोटी ९४ लाखाचा अर्थसंकल्प सादर केला होता.

दरम्यान प्रशासनाच्या अर्थसंकल्पात स्थायी समिती सभापती डॉ.वर्षा खडके यांनी ३४ कोटी ३० लाखाची वाढ केली. त्यामुळे ६२८ कोटी २४ लाखाचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.

jmc

सभापतींची तारांबळ

सभापती डॉ.खडके यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर भाजपचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी साफसफाईच्या मक्त्यात ५ कोटी ऐवजी १० कोटीची तरतुद करण्यात आली आहे. त्याचे नियोजन कसे केले आहे? असा सवाल उपस्थित करताच सभापतींची चांगलीच तारांबळ उडाली.

त्याचवेळी शामकांत सोनवणे, चेतन शिरसाळे, बंटी जोशी, अजय पाटील यांनी चर्चेत सहभाग घेवून हा केवळ अंदाजपत्रक असल्याचे सांगितले. त्यानंतर पृथ्वीराज सोनवणे यांनी मोकाट कुत्रे निर्बिजीकरणासाठी २५ लाखाची तरतुद करण्याची शिफारस केली.

करवाढ नसलेला अर्थसंकल्प

मनपाचा सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कुठलीही करवाढ करण्यात आली नसल्याचे सभापदी वर्षा खडके यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले. तसेच मनपाच्या ध्येयधोरणाचा विचार करुन नागरिकांना द्यावयाच्या जास्तीत-जास्त सोयीसुविधा या बाबींवर सर्व समावेशक विचार करुन अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महसुली उत्पन्नात केली वाढ

मनपा प्रशासनातर्फे आयुक्त जीवन सोनवणे यांनी सादर केलेल्या ५९३ कोटी ९४ लाखाचा अर्थसंकल्पात महसूली उत्पन्नाची ४७ कोटी ४ लाख ३६ हजार ४८४ रुपयाची तरतुद केली होती. प्रशासनाने उत्पन्न कमी दर्शविल्यामुळे स्थायी समिती सभापती डॉ.वर्षा खडके यांनी ३४ कोटी ३० लाख २० हजार ५१६ रुपयाची वाढ केली.

त्यामुळे आता अर्थसंकल्पात उत्पन्नाची ८१ कोटी ३४ लाख ५७ हजाराची तरतुद करण्यात आली आहे.

वाढीव रक्कमेतून अशी केली खर्चाची तरतूद

प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात ३४ कोटी ३० लाखाची वाढ केली आहे. या रक्कमेत खर्चाची तरतुद करण्यात आली आहे. महापालिकेच्या चारही प्रभागांमध्ये नविन रस्त्यांसाठी ६ कोटी ८० लाखाच्या ऐवजी १५ कोटी, गटारींसाठी २ कोटी ६० लाखाच्या ऐवजी १० कोटी, साफसफाईच्या मक्त्यासाठी ५ कोटी ऐवजी १० कोटी, मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी ५ लाख ऐवजी १० लाख, जीआयएस प्रणालीद्वारे मालमत्ता सर्वेक्षणासाठी १० लाख ऐवजी ८ कोटी तसेच उद्यान सुशोभिकरणासाठी २० लाख, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी ५५ लाख आणि मेहरुण तलाव सुशोभिकरणासाठी ५ कोटी असे एकूण ३४ कोटी ३० लाख खर्चाची तरतुद करण्यात आली असल्याचे सभापती डॉ.वर्षा खडके यांनी सांगितले.

महासभेत अंतिम मंजुरी

स्थायी समितीने मंजूर केलेल्या ६२८ कोटी २४ लाखाच्या अर्थसंकल्पाला अंतिम मंजूरी मिळण्यासाठी महासभेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*