Type to search

ब्लॉग

मधमाशा नामशेष होणार?

Share

सर्वसामान्यांना मध तयार करण्यासाठी उपयुक्त असल्यामुळे मधमाशा माहीत असतात. विशेषतः बांधलेल्या पोळ्याला आपला चुकून धक्का लागला तरी कडाडून दंश करत असल्यामुळेही त्या माहीत असतात. मधमाशांची पोळी जाळून म्हणजेच मधमाशांना जाळून मध मिळवणे ही नेहमीची पद्धत असते. परंतु म्हणून आजपर्यंत मधमाशाच नामशेष होतील, असे कोणाला वाटले नव्हते. परंतु आता या मधमाशा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जगातल्या नामशेष होणार्‍या प्रजातींच्या यादीत मधमाशांचे नाव समाविष्ट आहे. मधमाशांचा मोठ्या प्रमाणात नाश होतो तो शेतीत वापरल्या जाणार्‍या कीटकनाशकांमुळे. या कीटकनाशकांत विषारी रसायने असतात आणि ती कीटकांच्या मेंदूवर परिणाम करतात. मधमाशा ही कीटकनाशके त्यांच्या पोळ्यापर्यंत घेऊन जातात. त्यामुळे मध दूषित होतोच परंतु त्याहूनही हानिकारक परिणाम मधमाशांच्या वसाहतींवर होतो. ही विषारी द्रव्ये त्यांच्या वसाहती नष्ट करतात. यालाच कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर (सीसीडी) असे म्हटले जाते आणि तो मधमाशांसाठी अतिशय घातक ठरतो. कारण सीसीडीमध्ये पोळी सोडून मधमाशा परागंदा होतात. फक्त राणी माशीच पोळ्यात राहते. मात्र पोळ्यात किंवा आसपास मेलेल्या मधमाशा आढळत नाहीत. त्यामुळे मधमाशांचे सामाजिक जीवन नष्ट होते.

याचे गंभीर परिणाम लक्षात घेऊन सध्या निओनिकोटिनॉईडस् या नावाने ओळखल्या जाणार्‍या कीटकनाशकांवर युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे. काही संशोधनातून सीसीडीशी या कीटकनाशकांचा संबंध असल्याचे दिसून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

मधमाशांच्या स्मृतीवर आणि संवेदनक्षमतेवर ही कीटकनाशके विपरीत परिणाम करतात. त्यामुळे त्या अन्नाचा शोध घेऊ शकत नाहीत. 2013 मध्ये जेफ्री एस. पिटीटीस या अमेरिकन संशोधकाने असे दाखवून दिले की, विशिष्ट प्रकारची बुरशीनाशके पोटात गेल्यामुळे मधमाशा आपली पोळी सोडून परागंदा होतात. संशोधकांच्या मते, पर्यावरणातल्या बदलामुळे आणि विशेषतः प्रदूषणामुळे मधमाशांमध्ये वसाहतीच्या व्यवस्थापनाविषयी तणाव निर्माण होतो आणि त्या वसाहती सोडून निघून जातात. याखेरीज व्यापारी परागीभवनासाठी मधमाशांना स्थलांतरित करणे आणि मधमाशांना दाटीवाटीने पैदाशीच्या जागी आणणे यामुळेही मधमाशा नष्ट होत चालल्या आहेत. याशिवाय मोबाईल हे मधमाशा नामशेष होण्याच्या शक्यतेमागचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. स्वीत्झर्लंडमधल्या फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संशोधकांनी हे सिद्ध केले आहे. या साधनांमधून बाहेर पडणारे प्रवाह मधमाशांना सैरभैर करतात. त्यांना दिशा समजेनाशा होतात आणि अखेरीस त्या मरण पावतात.

जंगलतोड, वातावरणातला बदल आणि औद्योगिक प्रदूषण हीदेखील मधमाशा नष्ट होण्यामागची महत्त्वाची कारणे असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. काही प्रमाणात आजार, परजीवी कीटक आणि तणाव ही कारणेही असतात, परंतु वरील कारणांच्या तुलनेत या नैसर्गिक कारणांमुळे मधमाशांच्या संख्येवर घातक परिणाम होत नाहीत. विशेषतः 2006 पासून मधमाशांच्या पोळ्यांची संख्या कमी होत चालल्याचे संशोधकांच्या लक्षात आले आणि अमेरिकन कृषी विभागाने तसे जाहीर केलेे. मधमाशा फक्त मधासाठीच नव्हे तर शेतीसाठीही अत्यंत उपयुक्त असतात. कीटकवर्गातल्या मधमाशा पिकांच्या परागीभवनासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. जगातले सुमारे 70 टक्के कृषी परागीभवन कीटकांवर अवलंबून असते आणि 70 ते 100 टक्के पिकांचे परागीभवन मधमाशांद्वारे होते. त्यातही मधमाशांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या मानवी शरीराला हानिकारक ठरणार्‍या कोणत्याही रोगांच्या किंवा जंतूंच्या वाहक नसतात. कोणत्याही प्रकारच्या बुरशी, विषाणू किंवा जिवाणूंचे वहन त्यांच्या शरीराद्वारे होत नाही. म्हणूनच त्यांचे परागीभवन स्वच्छ प्रकारात मोडते. शिवाय त्या तयार करत असलेला मध अनेक व्याधींवर उपयुक्त असतो.

सृष्टीतला प्राचीन कीटक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कारण मधमाशांची सर्वात जुनी ज्ञात प्रजाती 10 कोटी वर्षांपूर्वीची आहे. मधमाशांचे सामाजिक जीवन हा अनेक संशोधकांच्या आश्चर्याचा विषय आहेच शिवाय या प्रगत कीटकांमधली संवादवहनाची क्रियाही अद्याप पूर्णपणे उलगडली नसली तरी विस्मयजनक मानली जाते. सुरुवातीला अनेक वर्षे मधमाशांच्या वसाहतीतल्या प्रमुख मधमाशीला राजा मधमाशी असे म्हटलेे जात होते. परंतु सतराव्या शतकात जान स्वामेरडॅन या निसर्ग संशोधकाने ती मादी असल्याचे दाखवून दिले आणि मग या माशीला राणी माशी असेे म्हटलेे जाऊ लागले. मात्र सध्या प्रदूषणामुळे आणि भरमसाठ प्रमाणात पोळी जाळल्यामुळे तसेच कृत्रिम मधनिर्मितीमुळे या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेेत. त्यामुळे अन्नधान्य उत्पादनाला धोका उत्पन्न होणार आहे.

पर्यावरण संरक्षणात सजीवांचे संरक्षणही अंतर्भूत आहेच. कारण विविध जैवसाखळ्या या पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक असतात. म्हणूनच अनेक कीटकांसह मोठ्या प्राण्यांपर्यंत सर्व सजीव हे सृष्टीचे अविभाज्य भाग आहेत. मधमाशा हा लहानसा कीटक सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
वैष्णवी कुलकर्णी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!