मतदार याद्यांची फोड नियमाप्रमाणे ; आयुक्त अभिषेक कृष्णांचे याद्यांच्या घोळावर प्रत्युत्तर

0

नाशिक  : मुख्य निवडणूक आयुक्त अश्विनकुमार यांच्याकडे झालेल्या बैठकीत मतदार यादीतील गहाळ नावांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी राज्यातील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी महापालिकेचा गोंधळ या कामास कारणीभूत असल्याची तक्रार केली आहे. यावर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना विचारले असता मतदार याद्या या नियमाप्रमाणे फोडण्यात आल्या असल्याचे सांगत महापालिकेकडून योग्य प्रकारे काम झाल्याची माहिती दिली.

महापालिका निवडणुकीत अनेक मतदारांची नावे गहाळ झाली. मतदार याद्यांच्या या झालेल्या गोंधळामुळे मोठ्या प्रमाणावर मतदार मतदानापासून वंचित राहिले. त्याची तीव्र दखल घेत निवडणूक विभागाच्या वतीने नावे कशी गहाळ झाली? कुठल्या स्तरावर ती रद्द झाली? किंवा कोणी ती स्थलांतरित केली? याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त अश्विनकुमार यांच्याकडे झालेल्या बेैठकीत चर्चा करण्यात आली. यावर प्रभागरचना करताना महापालिकेच्याच गोंधळामुळे हा घोळ झाल्याची तक्रार राज्यातील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी आयोगाकडे केली. याची दखल घेत मुख्य निवडणूक आयुक्त लवकरच आयुक्तांची बैठक घेणार असल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना विचारले असता ते म्हणाले, जिल्हा प्रशासनाकडे ज्या याद्या आहेत त्या याद्या प्रभागानुसार फोडण्यात आल्या आहेत. त्यात नावे गहाळ होण्याचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. परंतु तेदेखील पत्ते न बदलल्याने किंवा अनुक्रमांक चुकल्याने झाले असेल. यात महापालिकेचा काहीही दोष नाही. ज्या मतदार याद्या जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाल्या त्या याद्या जशाच्या तशा फोडण्यात आल्या.

त्यात पत्ता अपूर्ण असलेल्या किंवा पत्ता चुकलेल्या मतदारांची नावे अन्य केंद्रात गेल्याचे त्यांनी सांगितले. आलेल्या याद्यांबाबत महापालिकेने हरकतीही मागवल्या होत्या. त्यात 650 हरकतींपैकी 300 हरकती निकाली काढण्यात आल्या आहेत. परंतु त्यानंतरही मतदारांची नावे गहाळ झाली असतील तर त्यास महापालिका कशी जबाबदार असू शकेल, असेही त्यांनी सांगितले. कोणत्या मतदारांची नावे गहाळ झाली हे नावासकट जिल्हा प्रशासनाने दाखवावे, असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

जी यादी महापालिकेकडून फोडण्यात आली ती मतदारांच्या पत्त्यानुसार फोडण्यात आली आहे. त्यामुळे त्यात कोणतीही चूक महापालिकेकडून झालेली नाही. नावे गहाळ झाल्याचा मुद्दाही त्यांनी खोडून काढला. दरम्यान, आयुक्तांनी मतदार याद्यांबाबतच्या घोळाचा चेंडू जिल्हा प्रशासनाकडे टोलवल्यानंतर आता जिल्हा प्रशासन आणि महापालिका यांच्यात जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

*