मणके विकारग्रस्त गुरुजी खंडपीठात

0

30 जणांनी घेतली उच्च न्यायालयात धाव

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या धोरणातून मणके विकारास वगळण्यात आले आहे. त्यामुळे मणकेविकारग्रस्त शिक्षकांना बदलीत सवलत मिळण्याचा मार्ग बंद झाल्याने शिक्षकांत नाराजी निर्माण झाली आहे. सरकारने तातडीने या निर्णयात बदल करत मणकेविकाराचा बदलीच्या धोरणात पुन्हा समावेश करावा या मागणीसाठी चार शिक्षक संघटनाचे 30 शिक्षकांनी औरंगाबाद खंडपिठात धाव घेतली असल्याची माहिती शिक्षक नेते संजय धामणे यांनी दिली.

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी राज्य सरकारने नवीन धोरण जाहीर केले आहे. यातील विशेष संवर्ग 1 मध्ये मणके विकार असणार्‍या कर्मचार्‍यांना बदलीतून सवलत देण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षकांनी मणकेविकाराने आजारी असल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांकडून मिळवून बदलीतून सवलत मिळण्यासाठी जिल्हा परिषदेकडे अर्ज दिले. दिवसेंदिवस अर्ज वाढत चालल्याने अधिकार्‍यांची डोकेदुखी वाढू लागली. त्यानंतर मात्र राज्य सरकाराने पुन्हा शुद्धीपत्रक काढत मणकेविकारच वगळून टाकला.

याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेस मिळाल्यानंतर शिक्षण विभागाने जवळपास 63 शिक्षकांचे अर्ज बाद केले आहेत. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे पडसाद शिक्षकांतही उमटले आहेत. सरकारने ही सवलत पुन्हा लागू करावी, यासाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून ग्रामविकास विभागाच्या सचिवांनाच पत्र पाठवून मणकेविकाराची रद्द केलेली सवलत पुन्हा लागू करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.

मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने 30 शिक्षकांनी मंगळवारी औरंबाद खंडपिठात धाव घेतली आहे. या खंडपिठात धाव घेतलेल्या शिक्षकांमध्ये धामणे, सुनिल पवळे, संतोष दुसुंगे, नवनाथ तोडमल, अरुण कडूस, संजय काळे यांचा समावेश आहे. विशेष एरेवी एकमेंकांच्या विरोधात भिडणार्‍या चार शिक्षक संघटनाचे पदाधिकारी या प्रकरणावर एकत्र आले आहेत.

LEAVE A REPLY

*