मटक्यात ‘मावळ्या’ला पोलीस पार्टनर

0

अर्जफाट्याद्वारे ‘गनिमी कावा’

एमआयडीसी-नगर साम्राज्यविस्तार

अहमदनगर (प्रतिनिधी)-पुरोगामी संघटनेशी फारकत घेतल्यानंतर एका स्वयंघोषित छाव्याने ‘मावळे’ निर्माण करीत एमआयडीसीत मटका अड्डा सुरू केला आहे. त्यात पोलीस पार्टनर घेतल्याने तो बिनघोर आहे. या हातमिळवणीमुळे एमआयडीसीपासून नगर शहर-केडगावपर्यंत त्याचा साम्राज्य विस्तार झाला आहे. या साम्राज्य विस्तारात कोणी पोलीस आडवा आला तर अर्जफाटे करून त्याला बेजार करण्याच्या गनिमी काव्याचे तंत्र त्याच्याकडे आहे. नको ती झंझट म्हणून पोलिसही कारवाईकडे कानाडोळा करतात. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनाच घरभेदी शोधून हे मटक्याचे साम्राज्य खालसा करण्यासाठी विडा उचलावा लागणार आहे.

अवैध धंदेवाल्यांशी सलगी, पार्टनरशीप हे नगर जिल्ह्यातील पोलिसांना नवे नाही. नेवासा येथील काही गुंडांशी एलसीबीच्या पोलिसांची पार्टनरशीप तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या कार्यकाळात अशीच चर्चेत आली होती. त्यांनी या कर्मचार्‍यांचा बंदोबस्त ‘हेडक्वॉर्टर’मध्ये करून ही पार्टनरशीप मोडीत काढली. आताही एलसीबीत काम करत असलेल्या पोलीस कर्मचार्‍याने मटक्यात पार्टनरशीप केली. मटक्यातून कमाईचा धंदा जोमात सुरू झाला. अख्खी एमआयडीसी कव्हर केल्यानंतर नगर शहरातही या धंद्याने बस्तान बसविले आहे.  पोलीस पार्टनर असल्याने जुन्या बुकींना मागे टाकत ‘मावळा’ नंबर एकचा बुकी होऊ पाहत आहे. पोलीस पार्टनर असला तरी अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यावर छाप्याची कारवाईसाठी तयारी करायचे, मात्र त्याची ‘टीप’ अगोदरच ‘मावळा’कडे पोहोच व्हायची. त्यामुळे पोलीस छापा पडला तरी हाती फारसे काही लागत नसे. ज्या पोलीस अधिकारी-कर्मचार्‍याचे छाप्यासाठी पुढाकार घेतला त्याच्यामागे हा ‘मावळा’ हात धुवून लागलाच म्हणून समजा. एसपींकडे तक्रार अर्ज करून त्या पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यास परेशान केले जाऊ लागले. त्यामुळे ‘नको तो छापा अन् नको ती झंझट’ असे म्हणून पोलीसही त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळेच हा ‘मावळा’ बुकी नंबर एककडे वाटचाल करत आहे.

  पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना शहरासह जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे मोठे आव्हान आहे. पूर्वीच्या एसपींच्या कार्यकाळात ‘क्रिम’ जिल्हा म्हणून नगरचे नाव राज्यभर झाले. शर्मा यांनी पहिल्याच दिवशी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र जिल्ह्यात फोफावलेले अवैध व्यावसाय मोडीत काढताना त्यांना अगोदर पोलीस प्रशासनालाच सरळ करावे लागणार आहे. शर्मा हे काम हाती घेतील अशी अपेक्षा आम नगरकरांना आहे. पोलीस पार्टनरशीपमध्ये जिल्ह्यात अनेक धंदे सुरू आहे. काही धंद्यात पोलीस पार्टनर नसले तरी ‘रक्षक’ मात्र आहेत. 

  ‘एलसीबी’त ‘जीत’ हासील केल्यानंतर पार्टनर असलेला पोलीस एकदमच ‘फॉर्मात’ होता. मात्र पांगरमल बनावट दारूकांड त्याला भोवले. वरिष्ठांचा वरदहस्त असल्याने निलंबनाऐवजी ‘हेडक्वॉर्टर’चा रस्ता धरावा लागला. आता ‘एलसीबी’त नसलेला हा पोलीस पार्टनर पोलीस प्रशासनातील सगळ्या इत्थंभूत खबरी मात्र ‘मावळा’पर्यंत पोहोच करतो. त्यामुळेच पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचार्‍यांमागे भुंगा लागतो हे उघडगुपित आहे. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी त्याचा शोध घेऊन पोलीस पार्टनरशीप तोडावी लागणार आहे. हे मोठे आव्हान शर्मा कसे पेलवतात, याकडे पोलीस दलासह जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. 

LEAVE A REPLY

*