मंत्रालयाच्या धर्तीवर प्रशासकीय कामकाज करा ; जि.प. अध्यक्षा सांगळे यांच्या अधिकार्‍यांना सूचना

0

नाशिक : जिल्हा परिषदेत कोणत्याही कामासाठी ग्रामीण भागातून येणार्‍या अभ्यागतांना अनेक वेळा चकरा मारण्याची गरज पडणार नाही, त्याचबरोबर कामाचा कसा निपटरा झाला याची अद्ययावत माहिती थेट दर्शनी भागावर प्रदर्शित करावी. प्रत्येक विभागाचे कामकाज संगणकीकृत करावे. हे सगळे करताना मंत्रालयाच्या धर्तीवर अधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेचे प्रशासकीय कामकाज मार्गी लावावे, अशा सूचना जि.प. अध्यक्षा शीतल सांगळे यांनी पदभार स्वीकारनंतर प्रशासनाला दिल्या.

उपाध्यक्षा नयना गावित यांनी जिल्ह्यातील टंचाई आणि सुकाळ या भागाचा विचार करून मिनी मंत्रालयात सर्वच सदस्यांना सोबत घेऊन दोन्ही भागात विकासकामे व कामकाज करण्याचा मनोदय व्यक्त केला.

जिल्हा परिषदेत आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी शिवसेना आणि काँगे्रस पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यानिमित्त अध्यक्ष कक्ष आणि उपाध्यक्ष कक्षात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही दालनात शुभेच्छा देणार्‍यांची रीघ लागली होती. सकाळी 8 वाजेपासून अध्यक्षा शीतल सांगळे यांनी त्यांच्या कक्षात पती उदय सांगळे यांच्यासह पूजाविधी केला.

त्याचवेळी सिन्नरमधील शिवसेनेचे पदाधिकारी, पंचायत समिती पदाधिकारी, नवनिर्वाचित सदस्य तसेच जिल्ह्यातील सेना पदाधिकारी उपस्थित होते. दुपारनंतर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आ. राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत त्यांनी पदभार घेतला. यावेळी येणार्‍या हितचिंतकांमध्ये जि. प. अधिकारी, खातेप्रमुख यांच्यासह कर्मचार्‍यांची अधिक वर्दळ होती. त्यानंतर उपाध्यक्षा नयना गावित यांच्या कक्षात कलशपूजन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या नातलगांसह आ. निर्मला गावित, काँगे्रसचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेत आज सर्वत्र आकर्षक पुष्परचना करून परिसर सजवण्यात आला होता. अध्यक्षा-उपाध्यक्षांच्या कक्षांकडे जाणार्‍या मार्गावर रांगोळी रेखाटण्यात आली होती. कक्षांच्या प्रवेशद्वारांवर फुलांचे तोरण लावण्यात आले होते. येणार्‍यांचे स्वागत दोन्ही कक्षांत करण्यात येत होते. जिल्हा परिषद परिसरात आज उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले. रावसाहेब थोरात सभागृहात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आल्याने सुमारे तीन महिन्यांनंतर पदाधिकारी, सदस्य आणि पक्ष कार्यकर्त्यांनी येथे गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

*