भोकर साखर लूट प्रकरणातील 16 जणांपैकी

0

5 जणांच्या पोलीस कोठडीत वाढ
तर 11 जणांना न्यायालयीन कोठडी

 

भोकर (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात साखरेचा ट्रक लूट प्रकरणातील खोकरचे सरपंच रामचंद्र पटारेंसह पाच जणांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून अकरा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून यापुर्वी यातील अकरा जण न्यायालयीन कोठडीत आहेत तर तीन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृह अहमदनगर येथे करण्यात आलेली आहे.

 

श्रीरामपूर नेवासा राज्य मार्गावर भोकर शिवारात बोलेरो गाडी आडवी घालून ड्रायव्हरला बांधून ठेवून ट्रकच्या पुढच्या काचा फोेडून, चाकाची हवा सोडून साखरेने भरलेला ट्रक अडवून त्यातील साखरेच्या 320 पैकी 319 गोण्या लंपास झाल्या आहेत. ही घटना गुरुवार दि. 1 जूनच्या रात्री शेतकरी संप काळात घडलेली आहे. यात पोलिसांनी तीस जणांना अटक केलेली आहे.

 

 
या सोळा जणांना काल श्रीरामपूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डोंबीडवार यांच्या समोर हजर केले असता यातील खोकरचे सरपंच रामचंद्र गंगाधर पटारे, गणेश चांगदेव जाधव, मच्छिंद्र जालींदर जाधव, सतीश रखमाजी जाधव व गणेश विठ्ठल अभंग यांना सोमवार दि. 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर सचीन जाधव, शशीकांत कासार, सुकदेव भोंडगे, संदीप निंबाळकर, मच्छिंद्र जाधव, प्रसाद जाधव, भाऊसाहेब पवार, अर्जून भोंडगे, गणेश जाधव, विद्यानंद जाधव व सुनील वाकडे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

 

 
तर स्वप्नील कांबळे, बापूसाहेब खेडकर, गणेश चौधरी, सोमनाथ कासार, बाबुराव गायकवाड, ज्ञानेश्‍वर शिंदे, ज्ञानदेव अभंग, पांडुरंग अभंग, गणेश अभंग, राधाकिसन अभंग, बापुसाहेब अभंग यांची यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याने आता एकूण 22 जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.तर तीन आरोपी अल्पवयीन आहेत. सरकारच्यावतीने अ‍ॅड. श्रीमती चंद्रकला पगारे ह्या काम पाहत आहेत.
यावेळी तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक वसंतराव पथवे यांनी अद्याप तपास बाकी आहे. साखर जप्त करणे बाक़ी आहे, ही साखर पळविताना वापरण्यात आलेली वाहने जप्त करावयाची आहेत तसेच आणखी आरोपी असण्याची शक्यता असल्याने त्यांचा शोध घेणे बाकी असल्याने मुख्य आरोपीसह पाच जणांना पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याची बाजू मांडली.
दरम्यान या प्रकरणाची तपास चक्रे जोरात सुरू असून तालुका पोलीस भोकर, खोकर, मुठेवाडगाव व माळवाडगाव येथे उर्वरीत आरोपींचा शोध घेत आहेत. त्यात काहींना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले परंतु ज्यांचा या प्रकरणाशी संबंध जुळत नाही अशांना चौकशी करून सोडण्यात येत आहेे. त्यात काही बाहेरगावी गेल्याचे आढळून येत असल्याचे पो.नि.वसंतराव पथवे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*