भोकरमध्ये तिसर्‍या आघाडीचा उदय

0

ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना वेग

 

भोकर (वार्ताहर) – आमचा विरोध कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा पार्टीला नसून त्यांच्या मनातील विकृतीला आहे. या विकृतींना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आम्ही गावातील ज्येष्ठांना बरोबर घेऊन जगदंबा परिवर्तन विकास महाआघाडीची स्थापना करत असल्याची माहिती शिवराजे ग्रुपचे संस्थापक संचित गिरमे यांनी दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना वेग येऊ लागला असून जनतेला पर्याय म्हणून तिसर्‍या आघाडीची घोषणा यावेळी गिरमे यांनी केली.

 

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक यांना पर्याय म्हणून तिसर्‍या महाआघाडीची स्थापना नुकतीच श्रीक्षेत्र जगदंबा मातेच्या साक्षीने करण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब भोईटे होते. तर अशोकचे माजी संचालक खंडेराव पटारे, माजी सरपंच दत्तात्रय खेडकर, मारूती शिंदे, दीपक काळे, वाल्मिक जाधव, दत्तात्रय जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.

 

 

भोकर गावच्या परिसरातील इतर गावांच्या तुलनेत गावच्या विकासाला कुठेतरी पायखुट बसल्याचे दिसत आहे. हा थांबलेला विकास करण्यासाठी एकदा आम्हाला संधी द्या, दररोज हिशोब देऊ. गावातील बेराजगारांसाठी काम करायचे आहे. ज्यांनी विकास खुंटविला त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. गावात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. आम्हाला चांगली माणसे घेऊन काम करायचे आहे.

 

 

गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी येत असतानाही विकास खुंटलेला आहे. आजची विचारधारा छोटी दिसत असली तरी त्यात वाढ होणार आहे. यावेळी गावात नक्की बदल होणार आहे, आम्हाला एकदा संधी द्या, आम्ही गावचा कायापालट करू, असे आश्‍वासन यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना दिले. यावेळी मारूती शिंदे, वाल्मीक जाधव, भाऊसाहेब भोईटे आदींनी मनोगत व्यक्त केले.

 

 

यावेळी ज्ञानदेव कोल्हे, मुन्ना शेख, मजीम शेख, जगन्नाथ पटारे, लक्ष्मण जाधव, गोरख अमोलिक, मारुती डुकरे, निवृत्ती पटारे, कचरू चव्हाण, अण्णासाहेब भाईटे, ज्ञानदेव लोखंडे, सोपान बर्डे, दिनकर आहेर, रावसाहेब बर्डे, गोविंद आहेर, दीपक बर्डे, कणगरे, मनोहर आहेर, सुरेश आहेर, अशोक आहेर आदींसह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान गावात पिढ्यान्पिढ्या नव्हेतर गेल्या अनेक वर्षांपासून येथे सत्ताधारी माजी आमदार भानुदास मुरकुटे विरूद्ध तत्कालीन माजी खासदार स्व. गोविंदराव आदिक व सध्या माजी आमदार जयंतराव ससाणे गट अशी पारंपारिक लढाई आतापर्यंत होत आलेली आहे. मात्र गेल्या सोसायटी निवडणुकीपासून येथे युवा पिढी पुढे येऊन राजकीय सूत्रे हातात घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

 

ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच सभापती दीपक पटारे यांचे निकटवर्ती म्हणून परिचित असलेले शिवराजे ग्रुपचे संस्थापक संचित गिरमे यांच्या पुढाकाराने व अशोकचे माजी संचालक खंडेराव पटारे तसेच सोसायटीचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तिसरी आघाडी स्थापना होताना दिसत असल्याने अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या आहेत.

LEAVE A REPLY

*