भिंगारच्या लष्करी हद्दीत घुसखोरी

0

मराठवाड्यातील चौघे पोलीसांच्या ताब्यात

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे भारतीय लष्काराच्या हद्दीत फायरिंग रेंजच्या परिसरात सामान्य व्यक्तींना प्रवेश करण्यास मज्जाव असताना, तेथे उस्मानाबादचे चौघे तरुण संशयीतरित्या फिरताना सापडले. त्यांना लष्काराच्या जवानांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या मोबाईलमध्ये काही संशयित माहिती मिळाली आहे. चौघांना पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दैलसा मक्सुम शेख, ख्वाजा मक्सुम शेख (रा. जेवळी, लोहरा. जि. उस्मानाबाद), शहनवाज इस्माईल कुरेशी (रा. नळदुर्ग. तुळजापूर), कारभारी इम्राण मुस्तफा (रा. सय्यद हिवर्गा, जि. उस्मानाबाद) अशी चौघांची नावे आहेत.

 

 

गुरुवारी (दि.10) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास लष्काराच्या फायरिंग क्षेत्रात काही तरुण संशयीतरित्या फिरत असल्याचे जवानांच्या लक्षात आले. त्यांनी तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. या क्षेत्रात प्रवेश नसताना तुम्ही इकडे आलेच कसे. आम्ही नोकरीसाठी भिंगारमध्ये राहतो. धार्मिकविधी आटोपून फिरत असताना सर्वजण चुकून आत आल्याचे त्यांनी सांगितले. लष्कारच्या जवानांनी या तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची नावे विचारली आणि त्यांच्याकडील मोबाईल काढून घेण्यात आले.

 

 

 

जवानांकडून तब्बल चार ते पाच तास चौकशी करण्यात आली. त्यातील एका तरुणाच्या मोबाईलमध्ये एक संशयीत गु्रप सापडला. त्यामुळे उस्मानाबादच्या चौघा तरुणांसह तिघांना भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हे तरुण संशयित दहशतवादी असल्याची माहिती पसरताच भिंगार परिसरात एकच खळबळ उडाली.

 

 

सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी भिंगार पोलीस ठाण्यात दाखल झाले. या माहितीची गुप्तता पाळून सर्वांची सखोल चौकशी करण्यात आली.

 

 

रात्री उशिरापर्यंत चौकशीत एकही धागा पोलिसांच्या हाती लागला नाही. पोट भरण्यासाठी आलेले तरुण भिंगारमध्ये एका खोलीत राहतात. प्रत्येक जातीधर्माचे 15 पेक्षा जास्त तरुण एकोप्याने राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी प्रत्येकाचे जबाब नोंदविले असून त्यांच्याकडील एकही माहिती विसंगतीने आली नाही. असे असून देखील ठराविकच तरुणांना पोलिसांनी आरोपीच्या चौकटीत उभे केले आहे. त्यांच्यावर संगनमताने लष्काराच्या फायरिंग क्षेत्रात विनापरवानगी प्रवेश केल्याचा गुन्हा भिंगार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने करीत आहेत.

 

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपपासून सावधान
शहरात असे अनेक अवैध धंदे करणारे लोक आहेत. त्यांचे पोलीस, लाचलुचपत, आरटीओ, महसूल, पत्रकार अशा खात्यांचे गु्रप आहेत. त्यांच्या माध्यमातून अर्थ पूर्ण माहितीची देवाणघेवाण होते. त्यासाठी विशिष्ट सिम्बॅल पद्धत वापरली जाते. लाचलुचपतचा छापा पडायचा असेल तर ढग गडगडणारे चित्र गु्रपवर टाकले जातात. त्यामुळे शासकीय गुप्ततेची माहिती लाचखोरांना पुरविली जाते. त्यांच्यावर पोलीस प्रशासन आता लक्ष ठेऊन राहणार आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांनी अशा घुसखोरी करणार्‍या ग्रुपमध्ये राहू नये असे आवाहन प्राशासनाकडून करण्यात आले आहे.

 

 

व्हॉट्सअ‍ॅपवर पाकिस्तानचा गु्रप
अटक केलेल्या एका आरोपीच्या मोबाईलवर एक गु्रप पाकिस्तानचा असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र तो धार्मिक नावाने असल्यामुळे या गु्रपला सामिल व्हा असा संदेश आल्यामुळे ही लिंक या तरुणाने लाईक केली होती. अर्थात या ग्रुपमध्ये संशयित असे कोणतेही संदेश मिळून आले नाहीत.

 

नावे पाहून कारवाई
पोलिसांनी ज्या चौघांवर कारवाई केली आहे. त्यांच्यासोबत अन्य जातीधर्माचे सातजण असल्याचे बोलेले जात आहे. मात्र त्यांच्यावर कोणताही कारवाई करण्यात आली नाही. आम्ही भारतीय आहोत. मात्र आमची नावे पाहून आमच्यावरच कारवाई करण्यात आली. एखाद्या जाती-धर्मात जन्माला आलो हा आमचा गुन्हा आहे का? असा प्रश्‍न या तरुणांनी पोलिसांपुढे उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

*