भावी संकेत देणारे भाषण!

0
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा परवा नाशिक दौरा झाला. नवीन नाशिकमधील त्यांची प्रचारसभा तरुण नेतृत्वाबद्दल आशा वाढविल इतकी प्रभावी ठरली. आदित्य ‘संवाद’ खूप छान साधतात, अशी प्रतिक्रिया सभास्थानी ऐकायला मिळाली. भारत हा जगातील तरुण देश म्हणून ओळखला जातो. राजकारणाची सूत्रे तरुण नेतृत्वाकडे सोपवली जावीत, अशी अपेक्षा तरुणाईकडून ठिकठिकाणी व्यक्त होत असते.

शिवसेना नेतृत्वाचा तरुण चेहरा म्हणून आदित्य ठाकरेंकडे पाहिले जाते. नाशिकमधील त्यांचे पहिलेच भाषण शिवसैनिकांचा उत्साह वाढवणारे होते, अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून व्यक्त होत होती. ‘जनतेला खासदार संसदेत जाणारा हवा की जेलमध्ये जाणारा?’ असा प्रश्‍न आदित्य यांनी सभेत बोलताना विचारला.

या प्रश्‍नाचे मतदार काय उत्तर देतील हे कळायला अजून अवकाश आहे. मात्र हा प्रश्‍न विचारून आदित्य यांनी काही वेगळे संकेत दिले असावेत का? अशी चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच युतीच्या मनोमिलनाची चर्चा सुरू झाली. त्यासाठी अनेक बैठका झाल्या. बहुतेक बैठकांना आदित्यही उपस्थित होते असे बोलले जाते. बैठकांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत.

तथापि लोकसभा आणि विधानसभा जागावाटपाचा मुद्दा त्या चर्चांच्या केंद्रस्थानी होता. लोकसभेची निवडणूक संपता-संपता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. शिवसेनेला लोकसभेपेक्षा विधानसभेच्या जागांमध्ये जास्त रस आहे. लोकसभेसाठी युती करताना विधानसभेचेही जागावाटप निश्‍चित व्हावे यावरच चर्चा बरीच रेंगाळली होती. पुन्हा युतीचे सरकार स्थापन झाल्यास मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे असावे यावर शिवसेना ठाम होती. त्याबद्दल नेमके काय ठरले हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री या दोघांनी त्या मुद्याबाबत ठाम उत्तरे टाळली आहेत. मात्र शिवसेनेने ती इच्छा कधीही लपवून ठेवलेली नाही;

पण तो निर्णय विधानसभा निवडणुका पार पडल्यावरच घेतला जाईल असेही बोलले गेले. आदित्य ठाकरे यांनी उल्लेख केलेला परवाच्या सभेतील प्रश्‍न अनेक श्रोत्यांना त्यादृष्टीने वेगळे संकेत देणारा वाटला. मुख्यमंत्रिपद कोणाकडे जाईल हे विधानसभा निवडणुकीनंतरच ठरणार असले तरी महाराष्ट्राचे गृहमंत्रिपद कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेकडेच ठेवण्याचे ठरले असावे असा एक सूचक संकेत त्या प्रश्‍नातून निश्‍चित व्यक्त होतो, असे अनेक शिवसैनिक सभेनंतर आपसातील चर्चेत ठासून सांगत होते. ते अगदीच निराधार कसे मानावे?

LEAVE A REPLY

*