भावी डॉक्टरांना मोलाचे मार्गदर्शन

0
‘समाजाचा सर्वांगीण विकास आरोग्यसेवेवर अवलंबून आहे. विज्ञानाने अफाट प्रगती केली तरी समाजाचा मोठा हिस्सा आरोग्याच्या प्राथमिक सेवांसाठी झुंजत आहे. हे चित्र विदारक आहे. नव्या पिढीतील डॉक्टरांनी ही दरी मिटवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. अशा सेवेची समाजाला नितांत गरज आहे.

भावी डॉक्टरांनी स्वेच्छेने दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचवावी’ असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी दिला. त्यांनी आरोग्यसेवेबाबत समाजातील विषमतेची अचूक दखल घेतली आहे. समाजोपयोगी आरोग्यसेवा पुरवण्याचा सल्ला त्यांनी दिला तो केवळ एका डॉक्टरचा सल्ला नाही तर तो जाणत्या समाजसेवी समाजसुधारकाने केलेला बहुमोल उपदेश आहे.

बंग यांची ‘सर्च’ संस्था गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील लोकांची आरोग्यसेवा करीत आहे. कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू कमी करण्यासाठी ही संस्था विशेष प्रयत्न करते. डॉ. बंग स्वत: काहीकाळ हृदयविकाराने त्रस्त होते. योग्य आरोग्यसेवा उपलब्ध न झाल्यास रुग्णांना काय भोग भोगावे लागतात याचा अनुभव त्यांनी घेतला आहे. त्या अनुभवातून डॉ. बंग यांच्यातील सेवाभावी कार्यकर्ता खडबडून जागा झाला. अमेरिकेतील आमंत्रणे नाकारून देशातील मागास भागातील जनसेवेचे ध्येय त्यांनी निश्चित केले. त्या दिशेने त्यांची वाटचाल अविरत सुरू आहे. शहरांत साखळी रुग्णालये उभी राहत आहेत.

तेथे रुग्णांना अत्याधुनिक उपचार उपलब्ध होत आहेत. तरीही असंख्य शहरवासियांनासुद्धा शासकीय आरोग्यसेवेचाच आधार का घ्यावा लागतो? कारण स्पष्ट आहे. केवळ व्यवसाय म्हणून चालवल्या जाणार्‍या रुग्णालयांकडून या सेवाभावी व्यवसायाला ‘पैसे कमावणारा व्यवसाय’ बनवला गेला आहे. त्यामुळे साखळी रुग्णालयांतील उपचारांचा खर्च सामान्यांना परवडणारा नाही.

केवळ व्यवसाय म्हणून चालवल्या गेलेल्या त्या तारांकित आरोग्यसेवेतून आरोग्य आणि सेवा दोन्हीही बेपत्ता आहेत. एनकेनप्रकारेण ‘नफा कमावणारा उद्योग’ अशा अवकळेचे स्वरूप सध्या तरी डॉक्टरांच्या सेवाव्रती व्यवसायाला आहे. अनेक गैरप्रवृत्तींचा येथे शिरकाव झाला आहे. रुग्णसेवेपासून अलिप्त झालेला व्यवसाय डॉक्टरांना बदनाम करीत आहे. डॉ. बंग यांनी अत्यंत नेमक्या शब्दांत केलेले मार्गदर्शन नाशिक परिसरातील डॉक्टरवर्गाने अवश्य विचारात घ्यावे. नाशिकला वैद्यक व्यावसायिकांची मोठी परंपरा आणि लौकिक आहे.

कदाचित ती लक्षात घेऊनच शासनाने आरोग्य विद्यापीठाच्या स्थापनेसाठी नाशिकची निवड केली असावी. तो लौकिक पुन्हा प्रस्थापित करण्याची जबाबदारी शिरावर घेणार्‍या भावी डॉक्टरांच्या पिढ्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातून तयार होतील व रुग्णसेवेला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून देतील, अशी आशा करावी का?

LEAVE A REPLY

*