भावनिकता

0

मनुष्य बुद्धिवान असला तरी तो भावनिकदृष्ट़या संवेदनशील प्राणी आहे. म्हणजेच कुठलीही गोष्ट किंवा निर्णय घेताना तो केवळ वस्तुनिष्ठपणे बुद्धी न वापरता भावनांचा विचारदेखील करतो. त्यामुळे भावनिकता ही फार महत्त्वपूर्ण ठरते. दैनंदिन जीवनामध्ये मनुष्य अनेक प्रसंगातून सामोरे जात असतो.

किंबहूना चांगले-वाईट,सुखी-दुखी, हसरे-बोचरे, या सर्व प्रसंगातून जीवन जगण्यासाठी त्याला बळकटी मिळत असते. एखाद्याने बोलणे, दूसर्‍याने ऐकणे यातून मनाचा-मनाशी संवाद होतो. मनुष्य अनेक वेळा भावविभोर होतो. क्षण कोणतेही असो, सुखाचे-दुखाचे या क्षणांचा त्यांच्या मनावर फार प्रभाव होतो. पुढे जे काही बरे-वाईट घडणार असतं ते या प्रभावामुळेच.

जीवन अधिक सुखकर व्हावे यासाठी प्रत्येकाचा आटापिटा सुरु असतो. एकमेकांकडून फार अपेक्षा ठेवल्या जातात. परंतु जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाही, किंवा अपेक्षित अशा गोष्टी प्राप्त होत नाही तेव्हा मात्र मनावर परिणाम होऊन हताश होण्यापलिकडे मनुष्य काहीच करत नाही. यातून मग दुःख, विरह स्थिती उद्दिपित होते. सांगायचं तात्पर्य हेच की मनावर भावनिकतेचा खोलवर परिणाम होतो. भावनिक संवेदनशीलता म्हणजे आपले अपयश व अहंकार दुखावणे यांना हाताळणे आणि भावनिक कुशलता म्हणजे इतरांची मन:स्थिती ओळखणे आणि आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त करता येणे होय.

जीवनात सर्वांना आनंदाने जगावेसे वाटते. पण ते वाटतं तितकं सोप नाहीये. ताण-तनाव, समस्या,चिंता, भीती, सामाजिक-पारीवारिक जबाबदार्‍या, याही पलिकडे जाऊन तो येणारा दिवस कसा असेल किंवा तो दिवस-वेळ चांगल्या व्यतीत करता यावा म्हणून मनुष्य आजच तजवीज करत असतो. म्हणजे त्याच्या भावना आजच उद्याचा दिवसाकरिता गुंतवणूक करीत असतात. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर आई-वडील आपल्या मुलाकडून अपेक्षा ठेऊन असतात कि मुलगा आमच्या उतार वयात माझं सांभाळ करेल. या चष्म्यातून मुलाकडे बघितलं जातं.

परंतु काहींच्या बाबतीत व काही वेळेस अपेक्षे प्रमाणे घडत नाही. इथे भावनिकता जुळलेली असते. मनासारखं न झाल्यास ते मन दुखावते. असंख्य विचारांनी मन वेढलेलं असतं. इच्छा, दैनंदिन जीवनात योजलेले विविध कामांशी निगडीत विचार तसेच अन्य विचार ही सतत सुरू असतात. समाजात वावरताना मनुष्याला वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. त्या भूमिकेचा गाभा समजून-उमजून त्या प्रमाणे वागावे लागते. स्वत: एका मित्राची भूमिका बजावताना आपले मित्र आपल्याशी कसे वागतात,

त्यापध्दतीने आपण त्यांच्याशी कसे वागायचे,याचा अंदाज आपल्याला घ्यावा लागतो. आईवडिलांशी त्यांचा पुत्र म्हणून वागतानासुद्धा आपण काही सामाजिक आणि काही सांस्कृतिक बाबी आपल्या व्यक्तिमत्त्वात विकसित करीत असतो. ज्या दृष्टीकोनातून आपण स्वत:कडे पाहत असतो तो आपल्याआयुष्यातील विविध अनुभवांतून आपल्यात एकरूप होत असतो. आपल्या नकळत आपले व्यक्तिमत्त्व आयुष्यातली बर्‍यावाईट अनुभवांतून घडत असते. यात अनेकवेळाकमी-अधिकपणा असतो. आपण जी काही कृती करणार आहोत ती मुळातच इतरांना आवडेल की नाही यावर सगळं अवलंबून असत. सगळे अनेकदा वरचरचे चेहर्‍यावरच्या मेकअपसारखे असते. खरा चेहरा कुणाला दिसत नाही. अगदी आपल्यालासुद्धा ओळखीचा वाटत नाही.

सतत आपण स्वतःला मिरवत असतो. आयुष्याच्या प्रामाणिक अनुभवातून प्रगल्भ झाल्यावर आपल्या लक्षात येते की, आपल्याला आपण जसे आहोत तसे वागायला हवे होते. परंतु बर्‍याच वेळा समाजाचे काही अलिखित नियम हे सामाजिक नीतिमूल्यांच्या जपणुकीसाठी असतात. म्हणूनच भावना जपायला शिकले पाहिजे.
– आरिफ आसिफ शेख

LEAVE A REPLY

*