भारतीय रेल्वे बदलतेय

0

भारतीय रेल्वेच्या नव्या गाड्यांचे रेक (डबे) पाहिले तर भारतीय तंत्रज्ञान फार पुढे गेल्याचे लक्षात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतासाठी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली होती. भारतीय रेल्वेने त्यातून बोध घेतला आहे. तेजससारखी गाडी, इंद्रायणी एक्स्प्रेसचे बदललेले स्वरूप पाहता भारतीय रेल्वेतही कल्पकता आहे, त्याचबरोबर सुविधा दिल्या तर प्रवासी पैसे मोजायला तयार आहेत, याची जाणीव रेल्वेला झाली आहे. श्रीलंकेला आपण यापूर्वीच काही रेक बनवून दिले आहेत. आता आणखी काही देशांना रेक बनवून देण्याचे नियोजन आहे. रेल्वेला निर्यातपूरक धोरणे आखली जात आहेत.

डबेनिर्मिती करणार्‍या कारखान्यांच्या व्यवस्थापकांना परदेश दौरे करण्याची, तिथल्या रेल्वेची गरज अभ्यासण्याची तसेच परकीय स्पर्धेत टिकणारे दर्जेदार डबे निर्यात करण्यासाठी त्यांच्या योग्य निविदा भरून कामे मिळवण्याचे अधिकार देण्यात येणार आहेत. तंत्रज्ञानाची उपलब्धता, कमी दरात मिळणारे मनुष्यबळ आदींचा विचार करता भारतात जागतिक दर्जाची कामे कमी खर्चात होऊ शकतात. दक्षिण आशिया, मध्यपूर्वेतले देश तसेच आफ्रिकेतल्या देशांना भारत चांगल्या दर्जाचे रेक स्पर्धात्मक किमतीत देऊ शकतो.

जगात स्वस्त दरात रेक स्वस्त निर्यात करण्यात भारताचा पाचवा क्रमांक आहे. खर्च कमी करण्याबरोबरच आता पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणूनही रेल्वे निर्यातयोग्य रेक बनवण्याच्या कामाकडे पाहत आहे. जागतिक दर्जाचे रेक जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत 20 ते 25 टक्के कमी खर्चात बनवून देण्याची भारतीय रेल्वेची तयारी आहे. तातडीने निर्णय घेण्याचे अधिकार डबेनिर्मिती कारखान्यांच्या सरव्यवस्थापकांना देण्यात आले आहेत. पहिली डेमू (डिझेल इलेक्ट्रिकल्स मल्टिपल युनिटस्) श्रीलंकेला नुकतीच निर्यात करण्यात आली. त्यातल्य सुविधा आणि नवीन वैशिष्ट्ये जागतिक दर्जाची आहेत. भारतीय रेल्वे डबे तसेच त्याचे अन्य भाग तैवान, फिलिपिन्स, टांझानिया, युगांडा, नायजेरिया, श्रीलंका, अंगोला, बांगलादेश, व्हिएतनाम, मोझांबिक आदी देशांना निर्यात करत असते.

रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनने बनवलेल्या इंजिनविरहित गाडीची अलीकडेच चाचणी घेतली गेली. या गाडीचे नाव ट्रेन 18 असे आहे. तिने ताशी 115 किलोमीटरचा वेग गाठला. मोरादाबाद विभागात ही चाचणी घेतल्यानंतर राजस्थानमधील कोटा विभागात या गाडीने 160 किलोमीटर प्रतितासाच्या अंतराची चाचणीही यशस्वीपणे पूर्ण केली. हा लोहमार्ग दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसचा आहे. चेन्नई इथल्या कारखान्यात ही ‘ट्रेन 18’ बनवण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षितता आयुक्तांचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ही गाडी केव्हाही लोहमार्गावर धावू शकते. ‘ट्रेन 18’ ही गाडी बनवण्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च आला. मोठ्या प्रमाणात उत्पादनाला सुरुवात होईल तेव्हा तिचा खर्च आणखी 20 कोटी रुपयांनी कमी होईल. आयातीच्या तुलनेत या गाडीचा खर्च निम्म्याने कमी झाला आहे. हा प्रवास अजिबात आवाज न करता होणार असल्याने वेळेची 15 टक्के बचत होणार आहे. याच गाडीची स्लीपर कोच आवृत्ती बनवण्यास गती देण्यात येणार असून ती राजधानी एक्स्प्रेसच्या मार्गावर चालवण्यात येणार आहे.

आता जागतिक दर्जाची दोन स्टेशन्स भारतात बांधली जात आहेत. लँडस्केपिंग आणि अन्य सुविधांसह उभी राहणारी ही रेल्वे स्थानके 2019 च्या सुरुवातीलाच तयार झालेली असतील. गांधीनगर (गुजरात) आणि हबीबगंज या दोन्ही स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आहे. सरकारी-खासगी भागीदारी तत्त्वावर हबीबगंज रेल्वेस्थानकाची उभारणी हाती घेण्यात आली.

जर्मनीच्या हेडेलबर्ग स्टेशनच्या धर्तीवर हे काम चालू आहे. इंडियन रेल्वेस्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि बन्सल पाथवे हबीबगंज प्रायव्हेट लिमिटेड या दोन संस्था सरकारी-खासगी भागीदारीतून ही उभारणी करत आहेत. हे साडेचारशे कोटी रुपयांचे काम आहे. त्यातले शंभर कोटी रुपये रेल्वेस्टेशनच्या बांधकामावर तर साडेतीनशे कोटी रुपये अन्य विकासकामांवर खर्च होणार आहेत. नवी मुंबईत जशी व्यापारी आस्थापनांमध्ये रेल्वेस्टेशन्स आहेत तशीच ही स्टेशन्स असतील, परंतु तिथल्या व्यापारी संकुलाचा आणि रेल्वेस्टेशनचा दर्जाही जागतिक असेल. या स्टेशनचा लूक ग्लास डोम पद्धतीचा आहे. स्टेशनमध्ये उतरल्यानंतर नागरिकांना किरकोळ खरेदी, वेगवेगळे खेळ, खाद्यान्न, प्रतीक्षालय आदी सुविधांचा आनंद घेता येईल. एलईडी दिव्यांचा आकर्षक वापर, ग्रीन स्टेशन आणि सांडपाण्याचा पुनर्वापर ही या स्टेशनची वैशिष्ट्ये आहेत.

गांधीनगर रेल्वेस्टेशनवर तीनशे खोल्यांचे पंचतारांकित हॉटेल आहे. हा अडीचशे कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. ट्रांझिट हॉल, दुकाने, कियॉस्क, खाद्यान्नाची वेगवेगळी दालने, प्रवाशांना बसण्यासाठी सहाशे आसने आणखी अनेक सुविधा त्यात आहेत. गुजरातमध्ये पर्यटन तसेच व्हायब्रंट गुजरातसाठी येणार्‍या प्रवाशांसाठी हे आकर्षणाचे केंद्र असेल. या सर्वांमधून भारतीय रेल्वे कात टाकत असल्याचे लक्षात येते.
– प्रा. अशोक ढगे

LEAVE A REPLY

*