भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय

0
 बर्मिंगहॅम । दि. 15 वृत्तसंस्था – चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसर्‍या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने बांगलादेशला पराभवाची धूळ चारत दणदणीत विजय मिळवला. यामुळे आता टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला रंगणार आहे.
बांगलादेशने दिलेल्या 265 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 40.1 षटकांमध्येच 9 गड्यांनी विजय मिळवला.
भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो मुंबईकर रोहित शर्मा.चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात जडेजा पहिलाच गोलंदाज ठरला आहे की ज्याने सलग 10 षटके टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला.

ज्यामध्ये त्याने 48 धावा देत 1 गडी बाद केला. बांगलादेशने दिलेले आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाच्या फलंदाजांनी धुव्वाधार फटकेबाजी केली.

मात्र सलामीवीर शिखर धवन 46 धावांवर बाद झाला. त्याला बांगलादेशी कर्णधार मश्रफी मुर्तझाने बाद केले. मुंबईकर रोहित शर्माने आपली फटकेबाजी सुरूच ठेवत खणखणीत शतक झळकावले.

रोहित शर्माला साथ दिली ती विराट कोहलीने. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक झळकावून आपण जगातले पहिल्या क्रमांकाचे फलंदाज का आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केले. कोहलीने 42 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

दरम्यान, दुसर्‍या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये शतकी भागीदारीही झाली.टीम इंडियाकडून शिखर धवनने 34 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 46 धावा केल्या.

रोहित शर्माने 129 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकारासह 123 धावा केल्या तर विराट कोहलीने 78 चेंडूत 13 चौकारांसह 96 धावा केल्या.

टीम इंडियाने 40.1 षटकात विजयाचे आव्हान पूर्ण केले. तत्पूर्वी टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशला 264 धावांपर्यंतच मजल मारता आली.

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशला एकामागोमाग एक असे झटके दिले. बांगलादेशचा पहिला बळी शून्यावर गेला. त्यानंतर बांगलादेशच्या तमिम इक्बालने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र 70 धावांवर असताना त्याला केदार जाधवने त्रिफळाचित केले.

तर मुश्फिकूर रहिमला झेलबाद केले. जसप्रीत बुमराहने केलेल्या जबरदस्त बाऊंसरच्या मार्‍यामुळे बांगलादेशच्या फलंदाजांना खेळणेकठीण जात होते.

बांगलादेशकडून तमिम इक्बालने 82 चेंडूत 70 धावा केल्या. मुश्फिकूर रहिमने 85 चेंडूत 61 धावा केल्या. सब्बीर रेहमानने 21 चेंडूत 19 धावा, शकीब उल हसनने 23 चेंडूत अवघ्या 15 धावा केल्या तर मोसद्दिक हुसैन 25 चेंडूत 15 धावा करून तंबूत परतला.

भारताकडून भुवनेश्वर कुमारने 10 षटकात 53 धावा देत 2 बळी घेतले. बुमराहने 10 षटकात 40 धावा देत 2 बळी घेतले.

केदार जाधवने 6 षटकात 22 धावा देत 2 बळी घेतले, तर रवींद्र जडेजाने 10 षटकात 48 धावा देऊन 1 बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक – बांगलादेश : 264/7 (50 षटके)फलंदाज : तमिम इक्बाल (70), सौम्य सरकार (0), शब्बीर रहमान (19), मुश्फिकूर रहिम(61), शाकीब अल हसन (15), मेहमुदुल्लाह (21), मोस्देक हुसैन (15), मशरूफे मुर्तजा (30*), तस्कीन अहमद (10*)अतिरिक्त : 23

गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार (10-1-53-2), जसप्रीत बुमराह (10-1-39-2), रविचंद्रन अश्विन (10-0-54-0), हार्दिक पंड्या (4-0-34-0), रवींद्र जडेजा (10-0-48-1), केदार जाधव (6-0-22-2)

भारत : 265/1 (40.1 षटके)फलंदाज :  रोहित शर्मा (123*), शिखर धवन (46), विराट कोहली (96*)अतिरिक्त : 0

गोलंदाजी : मशरफे मुर्तजा (8-0-29-1), मुस्तफिजूर रहमान (6 -0-53-0), तस्कीन अहमद (7-0-49-0), रूबैल हुसैन (6-0-46-0), शाकीब अल हसन (9-0-54-0), मोस्देक हुसैन (2-0-13-0), मेहमुदुल्लाह (1-0-10-0), शब्बीर रहेमान (1.1-0-11-0)

LEAVE A REPLY

*