भाजप निघाला बांधावर

0

गुरूवारपासून शिवार संवाद यात्रा :  विस्तारक जाणार गावाकुसाला

अहमदनगर (प्रतिनिधी) –  भाजप दिल्लीतून गल्लीचे लक्ष्य साधणार आहे. त्यासाठी ते सत्तेच्या चाव्या धुंडाळण्यासाठी शेतकर्‍याच्या बांधापर्यंत पोहोचणार आहेत.

गुरूवार (दि. 25) पासून एकाच वेळी संपूर्ण देशात शेतकरी शिवार संवाद यात्रा निघणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यात पोहोचून पक्षाचे ध्यये-धोरणे, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे घेतलेले निर्णय याची माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी 300 विस्तारकांची नेमणूक झाली आहे.

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यभर संघर्ष यात्रा काढली. त्यानंतर राज्याच्या सत्तेचा वाटेकरी असणार्‍या शिवसेनेनेही कर्जमाफीच्या मागणीसाठी संपर्क अभियान हाती घेतले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप सरकारकडून कर्जमाफीवर स्पष्ट बोलण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या अडचणी जाणून घेतल्याचे बोलले जात आहे. भाजप सरकारची भूमिका अधिक स्पष्टपणे शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवार संवाद यात्रा उपक्रम भाजपने हाती घेतला आहे.

यासाठी जिल्ह्यातून 150 जणांची निवड करण्यात आली आहे. ही मंडळी गुरूवार (दि.25) ते रविवार (दि. 28) या काळात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फिरून शेतकर्‍यांच्या बांधावर जावून संवाद साधतील. सरकारने शेती विकासासाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती देणार आहेत. तसेच शेतकर्‍यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत याची टिपणे काढून ते पक्षाच्या वरिष्ठापर्यंत पोहोचवणार आहेत.

याच दरम्यान, भाजपने पंडीत दीनदयाळ जन्मशताब्दी वर्षानिमित्त पक्ष कार्य विस्तार मोहीम हाती घेतली आहे. पक्ष कार्यासाठी स्वेच्छेने काम करू इच्छिणार्‍या कार्यकर्त्यांद्वारे पक्षाचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवले जाणार आहे. या कामासाठीही जिल्ह्यातून 300 विस्तारक निवडण्यात आले आहेत. पंचायत समिती पातळीवर 1 असे 146 आणि नगरपालिका क्षेत्रासाठी 150 विस्तारकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते पक्षाच्या विस्ताराची भूमिका बजावतील. 28 मेपासून ही सर्व मंडळी जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचून पक्षाचे काम खेडोपाड्यात पोहोचवणार आहेत. 15 जूनपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. विस्तारक प्रत्येक गावातील राजकीय व सामाजिक माहिती संकलित करणार आहेत. टप्प्याटप्प्याने अशाच पद्धतीने निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक बूथपर्यंत पोहोचण्याचे नियोजन असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

पक्षाचे विचार, ध्यये धोरण, योजनांची याची सखोल माहिती खडोपाड्यातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचावी. शेतकर्‍यांचे प्रश्‍न त्यांच्या बांधावर जावून समजावून घेत त्यांची सरकारकडून अपेक्षा काय आहे. त्यावर कसा मार्ग काढता येईल, यासाठी शेतकरी संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील घरापर्यंत भाजपचे विचार पोहोचवण्यासाठी विस्तारकांच्या माध्यमातून काम करण्यात येईल. आता दिल्ली ते गल्ली असे लक्ष ठेवण्यात आले आहे.
– भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष, भाजप

माहिती पोहोचणार वरिष्ठांपर्यंत
भाजपचे विस्तारक ग्रामीण भागात सामान्यांना भेटून त्यांच्या पक्षाविषयीच्या भावना, अपेक्षा जाणून घेणार आहेत. या भेटी दरम्यान लोकांशी संवाद साधून माहिती संकलन करण्यात येणार आहे. शासनाच्या योजनेचे लाभार्थी त्या परिसरात आढळले तर त्याबाबतच्या त्यांच्या भावना मोबाइलवर चित्रित करून पक्षाला पाठवायच्या आहेत. मान्यवर व्यक्ती, पुरस्कार विजेते, माजी सैनिक यांची माहिती, सरकारी योजनांसह स्वच्छता अभियान अंमलबजावणीची स्थिती, विविध दाखले मिळण्याची स्थिती, सामाजिक संस्थांच्या माहिती संकलन करण्यात येणार आहे. यावेळी छोटेखानी सभा, चौक सभा घेऊन पक्षाचा विचार, केंद्र व राज्य सरकारांची कामे सांगताना जनतेच्या अपेक्षांचेही संकलन यावेळी करण्यात येणार आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून जमा होणारी सर्व माहितीचे विश्लेषण पक्षाचे वरिष्ठांपर्यंत पाठवण्यात आहे.

तुलना करणार : शिंदे
भाजपने गेल्या अडीच वर्षा केलेली विकास कामे आणि आघाडी सरकारच्या 15 वर्षातील कामांची तुलना करण्यात येणार आहे. शिवार संवाद यात्रा आणि पक्ष विस्तारक कार्यक्रमात भाजपचे सर्व आमदार सक्रिय सहभाग नोंदवणार आहे. सर्व आमदारांचे मतदारसंघ त्यांचे विस्ताराचे क्षेत्र राहणार असून यासह एक गावही स्वतंत्रपणे त्यांना दत्तक घ्यावे लागणार आहे. पालकमंत्री राम शिंदे हे त्यांच्या मतदारसंघासह अकोल तालुक्यातील गाव दत्तक घेणार असल्याची माहिती राम शिंदे यांनी पत्रकारांना दिली. पक्षाचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांना देखील विस्तारच्या आढावा सादर करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

*