भाजप आमदार काँग्रेसच्या संपर्कात! ; जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आस

0

नाशिक : जिल्हा परिषदेत शिवसेनेने गत निवडणुकीत 18 जागा मिळवल्या होत्या. या निवडणुकीत 7 जागा मिळवून 25 वर संख्याबळ आणले. तर भाजपने गतवेळी 4 जागा मिळवत जिल्हा परिषदेच्या सभागृहात जागा केली होती. मात्र आता 11 अधिक जागा मिळवल्या आहेत. या वाढलेल्या जागा शिवसेनेपेक्षा अधिक असल्याने त्याआधारे जि.प. अध्यक्ष निवडीत भाजपने वेगळा प्रयोग करण्याची हालचाल सुरू केली आहे. भाजपचे आमदार काँगे्रसच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या संपर्कात असल्याने भाजपलाही जि.प. अध्यक्षपदाची आस लागल्याची बाब लपून राहिलेली नाही.

जि.प. अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जरी प्रदेश स्तरावर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या चारही प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरू असल्या तरी जिल्ह्यात या चारही पक्षांचे आमदार आणि पदाधिकारी काही केल्या गप्प बसायला तयार नाहीत. भाजपच्या आमदारांनी काँगे्रसच्या पदाधिकार्‍यांना भेटून मदतीची मागणी अध्यक्षपदाच्या खेळीत करणे म्हणजे 15 जि. प. सदस्यांच्या आधारे आकाशाला गवसणी घालण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया देऊन इतर पक्ष भाजपला टीकेचा धनी करताना दिसत आहेत.

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आजचे चित्र राजकीय वर्तुळात प्रदेश पातळीवर होते. त्याचे प्रतिबिंब आज जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातही उमटत होते. कोणीही कोणाला भेटून एकमेकांना जि. प. अध्यक्षपदासाठी समर्थन मागण्याचा बिनदिक्कत प्रयत्न करीत होते. त्यामुळे अनेकांना असे वाटत होत की हेच का ते राजकीय पक्ष जे एकमेकांची औकात सांगून एकमेकांना तुच्छ लेखत होते आणि आज एकमेकांना मदतीसाठी पुन्हा साद घालत आहेत.

देशात आणि राज्यातच नव्हे तर स्थानिक पातळीवर काँगे्रस आणि भाजपचे राजकीय वैर विळा-भोपळ्याप्रमाणे आहे. पण भाजपला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याची धडपड करावी लागणार असल्याने काँगे्रस, राष्ट्रवादी आणि माकप या पक्षांना सोबत घेण्याची वेळ येत आहे. त्यामुळे या पक्षाने राष्ट्रीय स्तरावरचे आपले वेगळेपण आणि काँगे्रस पक्षाला संपवण्याची घेतलेली शपथ, स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सत्ता मिळवताना मागे पडली की काय, असा सवाल आता मतदार करीत आहेत.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापना करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. 18 जागांसह राष्ट्रवादी जिल्हा परिषदेत किंगमेकरच्या भूमिकेत आहे. या पक्षाला चुचकरण्याचे काम इतर पक्षांकडून सुरू आहे. शिवसेनेने तर युतीची भूमिका सोडून राष्ट्रवादीला संभाव्य जोडीदार जिल्हा परिषदेत मानल्याचे तर्कही या पक्षातून सांगितले जाते. तर काँगे्रस पक्षाचे 8 सदस्य असल्याने या पक्षाचे महत्त्व एकगठ्ठा मानले जात आहे. त्यामुळे भाजपने जे काही आखाडे जि.प.मध्ये सत्तेसाठी बांधले असतील त्यात काँगे्रसला दुर्लक्षित करणारा हा पक्ष ठरू शकत नाही. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू-मित्र नसतो तसेच राजकारणात काहीही होऊ शकते या वाक्यांचा वापर करून भाजपचे नेतेही वेगळाच संकेत देत आहेत. त्यामुळे काँगे्रसच्या संपर्कात भाजप असेल तर त्यात वावगे काही नसेल, असे जि.प.वर्तुळातही चर्चेला आहे.

LEAVE A REPLY

*